
डॉ. युवराज बालगुडे, डॉ. प्रदीप दळवे, सुनील नाळे
कमी-जास्त तसेच अनियमित पर्जन्यमानामुळे सीताफळाच्या देठाजवळ काळे डाग पडतात. याचे प्रमाण मागील काही वर्षात वाढले आहे. यामुळे सीताफळाला कमी दर मिळून मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सीताफळ काळे पडण्यामागील कारणे व करावयाच्या उपाययोजना याबाबत योग्य माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य होईल.
पिठ्या ढेकणाचा (मिलिबग) प्रादुर्भाव
ही कीड पाने, कोवळ्या फांद्या, कळ्या आणि कोवळी फळे यातून रस शोषण करते. त्यामुळे पाने व फळांचा आकार वेडावाकडा होतो. झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. नवीन फुटींची व पानांची वाढ खुंटते. फळांची वाढ अयोग्य होऊन आकार वेडावाकडा होतो.
रसशोषण करताना ही कीड शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ स्त्रवते. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. परिणामी पाने, फळे काळी पडतात. अशा फळांना बाजारभाव मिळत नाही.
जून ते ऑगस्ट या पावसाळी हंगामात आणि नोव्हेंबर ते मार्च या पावसाळ्यानंतरच्या काळात ही कीड जास्त कार्यक्षम असते.
उपाययोजना
पिठ्या ढेकणाची पिले खोडावरून झाडावर चढतात. त्यासाठी उपाय म्हणून खोडावर १५ ते २० सेंमी रुंदीची प्लॅस्टिक पट्टी बांधून त्यावर ग्रीस लावावे. त्यामुळे किडीची पिले ग्रीसला चिकटून मरून जातात. आणि या किडीस वेळीच आळा बसतो.
परभक्षी मित्रकीटक क्रिटोलिमस मॉन्ट्रोझायरी प्रति एकरी ६०० या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा बागेत झाडावर सायंकाळी सोडावेत. भुंगेरे सोडल्यानंतर कोणत्याही रासायनिक कीटकनाशकाची बागेत फवारणी करू नये.
लेकॅनिसिलियम लेकॅनी (व्हर्टीसिलीयम लेकॅनी) हे मित्रबुरशीवर आधारित कीटकनाशक ५ ग्रॅम अधिक फिश ऑइल रोझीन सोप ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आर्द्रतायुक्त हवामान असल्यास ही फवारणी करावी.
किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी, प्रादुर्भाव दिसल्यानंतर प्रथम बुप्रोफेजिन १.५ मिलि त्यानंतर बिव्हेरिया बॅसियाना हे जैविक कीटकनाशक ६ ग्रॅम त्यानंतर ॲझाडिरेक्टीन (१०००० पीपीएम) ३ मिलि आणि शेवटी लेकॅनिसिलियम लेकॅनी (व्हर्टीसिलीयम लेकॅनी) ६ ग्रॅम अधिक गाईचे दूध ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून १० दिवसांच्या अंतराने चार फवारण्या घ्याव्यात.
टी मॉस्किटो बग किडीचा प्रादुर्भाव
मुख्यत्वे चहा, कॉफी तसेच कोकणातील काजू पिकावरील डासासारख्या दिसणाऱ्या ‘टी मॉस्किटो बग’ या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव आता सीताफळावरही नव्याने आढळून येत आहे.
किडीची पिले व प्रौढ सीताफळाच्या झाडांची कोवळी फूट, कळ्यांचा व फुलांचा देठ, कोवळी व पक्व फळे या भागामधून रस शोषून घेतात. किडीची पिले व प्रौढ ज्या ठिकाणी सोंड घुसवून रस शोषण करतात, त्या ठिकाणच्या पेशी सदर कीटकांच्या लाळेतील विषारी विकरांच्या कार्यामुळे मरून जातात. कालांतराने या पेशी काळ्या पडून कठीण होतात. कालांतराने ठिपक्यांचा आकार मोठा होऊन तो भाग करपल्यासारखा काळा पडतो.
किडीने रसशोषण करताना केलेल्या जखमांमधून फळसड रोगाच्या बुरशीचा (कोलोटोट्रीकम ग्लिओस्पोराइड्स) प्रवेश होऊन पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार शेंडेमर, शेंडे करपणे, कळ्या जळणे, फळे देठाजवळ काळी पडणे व सडणे यासारखी लक्षणे दिसून येतात.
उपाययोजना
ही कीड सीताफळाच्या बागेत कमी प्रमाणात आढळून आली, तरी आर्थिक नुकसान पोहोचविण्याची क्षमता या किडीमध्ये जास्त आहे. त्यामुळे व्यवस्थापनासाठी बागेचे नियमित सर्व्हेक्षण अत्यंत गरजेचे आहे. कोवळ्या फुटीवर ५ ते ८ टक्क्यांपर्यंत किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, ही आर्थिक नुकसानीची पातळी असे समजून कीड व्यवस्थापनाचे उपाय करावेत.
सीताफळाच्या बागेत स्वच्छता राखावी.
नियोजनबद्ध एकात्मिक अन्नद्रव्ये व सिंचन व्यवस्थापन करावे.
बागेत कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
सीताफळ पिकात या किडीच्या नियंत्रणासाठी लेबल क्लेम नाहीत. तथापी किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास संबंधित कीटकशास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन उपाययोजना करावी.
कीटकनाशकांची फवारणी करताना काढणीपश्चात कालावधी तपासून पाहावा.
वाऱ्यामुळे फळे काळी पडणे
ज्या बागेभोवती वारारोधक झाडांची लागवड केलेली नाही, अशा बागेमध्ये जोरदार वाऱ्यांमुळे झाडाची पाने, फांद्या फळांच्या पृष्ठभागावर घासली जातात. या घर्षणामुळे फळाचे वरील आवरण काळे पडते. अशा फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही.
उपाययोजना ः
वाऱ्यांपासून फळांचे आणि बागेचे संरक्षण होण्याकरिता बागेच्या बांधावर वारारोधक झाडांची लागवड करावी.
कॅल्शिअम कमतरतेमुळे फळे काळी पडणे
बागेतील जमिनीत कॅल्शिअमची कमतरता असल्यास सीताफळाची वरची पाने गडद हिरवी होऊन नंतर पिवळी होतात. फळे तोंडाकडील बाजूस काळी पडतात. अशा फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही.
उपाययोजना
माती परीक्षण करून त्यानुसार बागेस कॅल्शिअमयुक्त रासायनिक खतांचा वापर करावा.
- डॉ. युवराज बालगुडे, ९८९०३८०६५४
(वनस्पती रोग शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके (अंजीर व सीताफळ) संशोधन प्रकल्प जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.