Custard Apple Diseases : सीताफळ काळे पडण्यामागील कारणे, उपाययोजना

Blackening of Custard Apple : वातावरणातील बदल, अनियमित पाऊस आणि पर्जन्यमानातील तफावत इ. कारणांमुळे सीताफळाची फळे देठाजवळ काळे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा फळांना बाजारात दरही कमी मिळतात.
Custard Apple
Custard Apple Agrowon
Published on
Updated on

Custard Apple Management : वातावरणातील बदल, अनियमित पाऊस आणि पर्जन्यमानातील तफावत इ. कारणांमुळे सीताफळाची फळे देठाजवळ काळे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा फळांना बाजारात दरही कमी मिळतात. सीताफळ काळे पडण्यामागील नेमकी कारणे लक्षात घेऊन संभाव्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.

सी ताफळ हे कोरडवाहू किंवा बांधावरील आणि सर्वच प्रकारच्या जमिनीत येणारे महत्त्वाचे फळपीक आहे. कमी पाणी, कमी खर्चात आणि अत्यल्प मशागतीत अधिक फायदा मिळवून देणारे फळपीक म्हणून सीताफळ ओळखले जाते. साधारणपणे जून महिन्यात सीताफळामध्ये नैसर्गिक बहर येतो. परंतु पाण्याची उपलब्धता असल्यास लवकर म्हणजे उन्हाळाच्या सुरुवातीस बहर धरता येतो.

उन्हाळी बहराची फळे जुलै ते ऑगस्ट, तर नैसर्गिक बहराची फळे ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान काढणीस तयार होतात. अलीकडील काळात होत असलेले वातावरणातील बदल पाहता, दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी-जास्त, तसेच अनियनित झाल्यामुळे सीताफळाची फळे देठाजवळ काळी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

अशा फळांना बाजारात दरही कमी मिळतात. त्यामुळे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. सीताफळ काळे पडण्याचे कारण लक्षात घेऊन संभाव्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.

फळसड ः
  रोगकारक बुरशी ः कोलेटोट्रीकम ग्लिओस्पोराइड्स.
  आर्द्रतायुक्त दमट हवामानात रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. तर कोरड्या हवामानात रोगाचे प्रमाण कमी असते.
  उष्ण हवामान, २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आणि ८० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता या बाबी पोषक ठरतात.
  बुरशीचे बीज अंकुरण्यासाठी किमान ४ ते ६ तास झाडाच्या पृष्ठभागावर पाण्याच्या थेंबांची आवश्यकता असते. अशा हवामानात रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात रोगाचे प्रमाण जास्त असते.
  वाढीच्या कोणत्याही अवस्थेतील झाडावर प्रादुर्भाव दिसून येतो.
  कळ्या आणि लहान फळे रोगास जास्त बळी पडतात. प्रादुर्भावामुळे कळ्या व लहान फळे, तसेच त्यांची देठे काळी होऊन गळून पडतात.
  मध्यम सुपारीच्या आकाराची फळे (१५  ते २० मिमी व्यास) गळून न पडता लटकून राहतात. काही वेळेस रोगाची सुरुवात फळाच्या पृष्ठभागापासून होते. नंतर फळांवर काळपट चट्टे पडून ते एकमेकांत मिसळतात आणि संपूर्ण फळ काळे पडते. काही वेळा फळाचा केवळ काही भागच काळा पडतो. रोगग्रस्त फळाच्या काही भागाची वाढ होत नाही. फक्त निरोगी हिरवट भागाची वाढ होऊन ती फळे वेडीवाकडी होतात. अशी फळे पिकत नाहीत, वाळून कडक होतात.

उपाययोजना ः
  बागेतील जमिनीची नांगरट आणि खणणी करावी. जमीन चांगली तापू द्यावी, जेणेकरून जमिनीतील रोग आणि किडींच्या अवस्था नष्ट होतील.
  बागेत कायम स्वच्छता राखावी.
  छाटणीवेळी झाडावरील रोगग्रस्त फळे, फांद्या, पाने, छाटून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.
  बहराचे पाणी देण्यापूर्वी किंवा पावसाळ्यापूर्वी पाणी देण्यासाठी झाडांभोवती वाफे करून सेंद्रिय व रासायनिक खतांच्या शिफारशीप्रमाणे मात्रा द्याव्यात. त्यामुळे झाडामध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फळधारणेनंतर १५ दिवसांनी, १ टक्का बोर्डो मिश्रण (चुना १ किलो अधिक मोरचूद १ किलो प्रति १०० लिटर पाणी) किंवा
  मॅन्कोझेब २ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम १ ग्रॅम (टँक मिक्स)
  प्रति लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या घ्याव्यात.
(ॲग्रेस्को शिफारस आहेत.)
पिठ्या ढेकूण (मिलीबग) ः
  पाने, कोवळ्या फांद्या, कळ्या आणि कोवळी फळे यातून रस शोषण करते. त्यामुळे पाने, फळांचा आकार वेडावाकडा होतो.
  झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.
  नवीन फुटींची व पानांची वाढ खुंटते.
  कीड शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ स्रवते. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. परिणामी, पाने, फळे काळी पडतात.  
  जून ते ऑगस्ट आणि नोव्हेंबर ते मार्च या काळात कीड जास्त कार्यक्षम असते.
उपाययोजना ः
  किडीची पिले खोडावरून झाडावर चढतात. त्यासाठी झाडाच्या खोडावर १५ ते २० सेंमी रुंदीची प्लॅस्टिक पट्टी बांधून त्यावर ग्रीस लावावे. त्यामुळे पिले ग्रीसला चिकटून मरून जातात.
  परभक्षी मित्रकीटक क्रिटोलिमस मॉन्ट्रोझायरी एकरी ६०० या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा झाडावर सायंकाळच्या वेळी सोडावेत. हे मित्रकीटक सोडल्यानंतर कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करू नये.
  लॅकेनोसिलियम लेकॅनी (व्हर्टिसिलियम लेकॅनी) ५ ग्रॅम अधिक फिश ऑइल रेझीन सोप ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आर्द्रतायुक्त हवामान असल्यास ही फवारणी करावी.
  अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू फळपिके प्रकल्प, यांच्या वार्षिक गटबैठकीत सादर केलेले प्रयोगाचे निष्कर्ष प्रभावी आढळले असले, तरी त्याला अद्याप ॲग्रेस्को शिफारस मिळालेली नाही.
     प्रथम बुप्रोफिजीन १.५ मिलि त्यानंतर बिव्हेरिया बॅसियाना ६ ग्रॅम, त्यानंतर ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) ३ मिलि आणि अखेरीस लॅकेनोसिलियम लेकॅनी (व्हर्टिसिलियम लेकॅनी) ६ ग्रॅम अधिक गाईचे दूध ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करावे. तयार द्रावणाच्या ४ फवारण्या १० दिवसांच्या अंतराने घ्याव्यात.
वाऱ्यामुळे फळे काळी पडणे ः
ज्या बागेभोवती वारारोधक झाडांची लागवड केलेली नाही, अशा बागेमध्ये जोरदार वाऱ्यांमुळे झाडांची पाने, फांद्या या फळांच्या पृष्ठभागावर घासल्या जातात. या घर्षणामुळे फळावरील आवरण काळे पडते. अशा फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही.

उपाययोजना ः
  बागेच्या बांधावर वारारोधक झाडांची लागवड करावी.
कॅल्शिअम कमतरतेमुळे फळे काळी पडणे
बागेतील जमिनीत कॅल्शिअमची कमतरता असल्यास, झाडाची वरील भागातील पाने गडद हिरवी होऊन नंतर पिवळी होतात. फळे तोंडाकडील बाजूस काळी पडतात.  
उपाययोजना ः
  माती परीक्षण करून त्यानुसार बागेस कॅल्शिअमयुक्त रासायनिक खतांचा वापर करावा.
स्टोन फ्रूट ः
ही एक प्रकारची विकृती आहे. सीताफळाची काही फळे झाडावरच काळी पडून वाळून जातात. ती पिकत नाहीत व तशीच झाडावर लहान स्थितीत पानगळ होईपर्यंत राहतात. अशी फळे दगडासारखी टणक दिसतात. म्हणून त्यांना ‘स्टोन फ्रूट’ असेही म्हणतात. फळे वाढीच्या काळात अन्नद्रव्यांसाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. आणि अन्नद्रव्यांचा तुटवडा भासलेल्या फळांमध्ये ही विकृती दिसून येते. फळांची पूर्ण वाढ होत नाही. ती आकाराने लहान राहतात. कडक होऊन त्यांचा रंग काळसर तपकिरी होतो.
उपाययोजना ः
  बागेस सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा.
  बहर धरण्याच्या काळात पाण्याचा योग्य प्रमाणात व वेळी वापर करावा.
  बागेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा किंवा बाजरीसारखी आंतरपिके घ्यावीत.
- डॉ. युवराज बालगुडे,  ९८९०३८०६५४
- नितीश घोडके,  ९९६०९८१५४८

(अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू फळपिके (अंजीर व सीताफळ) संशोधन प्रकल्प जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com