BJP Dominance : महाराष्ट्रावरील भाजपची मांड पक्की

Maharashtra Assembly Elections Result : २०१४ च्या निवडणुकीत मोदीलाटेतही मिळाले नाही त्याहून अधिक यश या विधानसभा निवडणुकीत मिळवून भाजपने महाराष्ट्रावरील मांड पक्की केली.
Mahayuti (Grand Alliance)
Mahayuti (Grand Alliance)Agrowon
Published on
Updated on

Mumbai News : २०१४ च्या निवडणुकीत मोदीलाटेतही मिळाले नाही त्याहून अधिक यश या विधानसभा निवडणुकीत मिळवून भाजपने महाराष्ट्रावरील मांड पक्की केली. शरद पवार यांच्या प्रचाराचा झंझावात, उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती आणि लोकसभा निवडणुकीमुळे काँग्रेसला मिळालेल्या आत्मविश्वासाला सुरुंग लावत भाजपने आपलेच महाराष्ट्रातील रेकॉर्ड तोडले.

तर, शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची याचा निकालही या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनेतेने लावला. जातीय समीकरणे, शेतीचे प्रश्न आणि पक्षफुटीनंतर लावण्यात आलेला गद्दारीचा या सर्वांचे निकालही लावला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वरकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती लढली असली तरी महायुतीतील तीनही पक्षांनी आपली स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करत निवडणुकीच्या सर्व तंत्रांचा वापर करत बाजी मारली.

२०१९ च्या निवडणुकीत भाजप पूर्ण आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे गेली होती. भाजप आणि शिवसेनेतील सुप्त संघर्षाची किनार या निवडणुकीत होती. त्यामुळे उमेदवारांच्या पाडापाडीचे प्रकार घडले. त्यामुळे स्वबळावर सत्तेत येण्यासाठी भाजपने आखलेले मनसुबे प्रत्यक्षात आले नाहीत. भाजपला १०५ जागांवर विजय मिळविता आला.

त्यापाठोपाठ शिवसेनेने ५६, पक्षांतरामुळे खंगललेल्या राष्ट्रवादीने चमकदार कामगिरी करत ५४, तर अस्तित्वहीन झालेल्या काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या. १४५ ही सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्या गाठण्यात भाजपला अपयश आल्याने शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करता येत नव्हती. मात्र, सत्तेतील निम्म्या वाट्यावर शिवसेना आडून राहिली आणि पुढील काळात नवी समीकरणे उदयाला येऊन महाविकास आघाडी अस्तित्वात आली.

Mahayuti (Grand Alliance)
Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

शरद पवार यांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. एरवी मातोश्रीतून आदेश देणारे ठाकरे पहिल्यांदाच सत्तेच्या पदावर बसले होते. आदित्य ठाकरे हे वरळीतून पहिल्यांदाच निवडून आले आणि मंत्रीही बनले. पवारांचे राजकीय पर्व संपले असे देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान सांगून घात करून घेतला असे म्हटले होते. त्याचा पुरेपूर बदला घेण्यात मुरब्बी पवारांना यश आले.

मात्र, हे यश फार काळ टिकले नाही. कोरोना महामारीनंतर राज्यसभा निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसची काही मते फुटली. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनतील असे अंदाज बांधले होते. मात्र, अचानक त्यांनीच एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करून आपण पक्षकार्यात गुंतू असे जाहीर केले.

काही मिनिटांतच त्यांना उपमुख्यमंत्री होण्याचा आदेश आला. फडणवीस यांनी हा आदेश पाळत अवमान सहन करूनही पद स्वीकारले. त्यानंतर वर्षभरात अचानक २ जुलै, २०२२ रोजी अजित पवार भर दुपारी ५४ आमदार घेऊन सत्तेत सामील झाले. पुढील काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिले. दोन्ही पक्षांच्या आमदार अपात्रतेचे प्रकरण अजूनही सर्वोच्च न्यायालयात आहे.

न्यायालयात न्याय मिळत नसल्याने आम्ही जनतेच्या न्यायालयात न्याय मागू असे शरद पवार आणि उद्धव ठाकरे सांगत होते. त्यांच्या सभाही जंगी होत होत्या. जागावाटपाच्या कुरबुरी सोडल्या तर सर्वच पातळ्यांवर महाविकास आघाडीत समन्वय होता.

राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, हिमाचल प्रदेश, तेलंगणाचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे मंत्री, काँग्रेसची राष्ट्रीय पातळीवरील फौज, आरोपांचा तोफखाना, शरद पवार यांनी शेवटच्या टप्प्यात जंगी सभांमध्ये फुटीर नेत्यांचा ‘गद्दार’ असा केलेला उल्लेख, राहुल गांधी यांनी शेवटच्या दिवशी ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेची खिल्ली उडवत मोदी आणि अडाणी यांच्या एकीवर केलेला प्रहार या सर्व गोष्टी पाहता महाविकास आघाडीला पोषक वातावरण तयार झाले होते.

Mahayuti (Grand Alliance)
Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ५० हून अधिक आमदार फुटले. त्या आमदारांना निवडून आणू असे सांगत त्यांनी विश्वास दिला. त्यासाठी आवश्यक रसदही त्यांनी पुरविली. गेल्या अडीच वर्षांत एकनाथ शिंदे यांनी या आमदारांचा एकही शब्द खाली पडू दिला नाही. ज्यांना मंत्रिपदे दिली नाहीत त्यांची योग्य बडदास्त ठेवली. सढळ हाताने राज्यकारभार करणारे शिंदे लोकांत मिसळणारे नेते अशी प्रतिमा तयार झाली.

प्रचंड ऊर्जा घेऊन रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या शिंदे यांचे अनेक निर्णय आणि कृती वादग्रस्त ठरल्या मात्र, बहुमताचा आकडा असल्याने त्यांनी फारसे जुमानले नाही. आधी चाचपडत राज्यकारभार करणाऱ्या शिंदे यांनी मांड जुळवून राज्यावर लक्ष्य केंद्रित केले. १०५ आमदार असून भाजपने ९ मंत्र्यांवर अपमानाचे कढ गिळले होते. तर संख्याबळ कमी असूनही शिवसेना आणि राष्ट्रवादीला समान वाटा मिळाला होता.

शिवसेनेच्या आमदारांना पर्याय असल्याने त्यांनी मंत्रालयात जो धुमाकूळ घातला तो भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते निमूटपणे पाहत होते. या निकालाने शिवसेना कुणाची हा प्रश्न निकाली काढत आता शिंदे यांनी निर्विवाद नेतृत्वावर शिक्कामोर्तब करून घेतला आहे. तर मागील सभागृहात संख्याबळ असूनही केवळ नऊ मंत्र्यांवर कसरत केलेल्या भाजपला आता पूर्णपणे सत्ता हाकण्याची संधी मिळणार आहे. भाजपचा विजयी वारू सुसाट धावल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना सत्तेतील वाटा कसा आणि किती मिळणार याकडेही लक्ष्य लागून राहिले आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांनी पक्ष पुन्हा उभा करू, तरुणांना संधी देऊन नव्याने सत्तेत येऊ असे वारंवार सांगितले. पवार यांचे वय पाहता त्यांनी याआधी केलेले चमत्कार कसे घडतील असे बोलले जात होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांनी कमी जागा लढवून जास्त जागा जिंकत अनेकांना पाणी पाजले होते. त्यामुळे विधानसभेत सर्वाधिक लक्षवेधी ठरलेले पवार हेच किंगमेकर असतील असे सांगितले जात होते. त्यांच्या सभांना होणारी गर्दी पाहता परिवर्तनाची लाट असल्याचे वरकरणी दिसत होते. मात्र, अजित पवार यांनी मिळविलेल्या जागा पाहता पक्ष आपलाच आहे हे त्यांनी सिद्ध केले.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मध्य प्रदेशच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना घोषित केली आणि त्यासाठी ४७ हजार कोटी रुपयांची तरतूदही केली. या योजनेचे किमान चार हप्ते महिलांच्या खात्यात जावेत यासाठी हरियाना, जम्मू काश्मीर यांच्यासोबत महाराष्ट्राची निवडणूक घेणे टाळले. त्याबरोबर घाऊक पद्धतीने महामंडळांवरील नियुक्त्या केल्या. शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजबिल माफ केले. तसेच वयोश्री योजना, तिर्थाटन योजना, तरुणांसाठी भत्ता योजना अशा अनेक लोकप्रिय योजना सुरू केल्या. त्याचे प्रत्यक्ष लाभही दिले. त्याचा मोठा फायदा महायुतीला झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहेत.

शरद पवार, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी शासनाच्या वाहनांमधून पैसे नेल्याचे आरोप केले. मराठवाड्यात मनोज जरांगे यांच्या आरक्षण आंदोलनामुळे लोकसभेला एकतर्फी निकाल दिला. मात्र, सोयाबीन आणि कापसाच्या घसरत्या भावाचा मुद्दा सध्या ऐरणीवर होता. तसेच शक्तिपीठ, भक्तिमार्ग आणि अन्य महामार्गांमध्ये संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींचा प्रश्न ऐरणीवर होता. शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील, समरजित घाटगे यांच्यासह भाजपमधील काही नेत्यांना गळाला लावत तगडे आव्हान उभे केले होते. मात्र, निकालानंतर महाविकास आघाडीने उभे केलेले आव्हान मोडून काढत महायुतीच्या बाजूने निकाल दिला.

हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावी

राज्यात लाडकी बहीण, वयोश्री, शेतकऱ्यांना मोफत वीज या लोकप्रिय योजनांचा वरकरणी परिणाम दिसत असला तरी हिंदुत्वाची सुप्त लाट ही निकालात परिवर्तित झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतदानाचा मुद्दा स्पष्टपणे मांडला. जाहीर सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ असे नारे देत होते. त्यावर प्रचंड टीका झाली. मात्र, तळागाळात हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करत मशागत केल्याने जनमत प्रत्यक्ष मतांत परिवर्तित करण्यात भाजपला यश आले.

अपक्ष, वंचित, मनसेची धूळधाण

या निवडणुकीत अपक्षांची भूमिका निर्णायक असेल असे सांगितले जात होते. मात्र, निकालानंतर अपक्षांना नाकारात भाजपच्या बाजूने स्पष्ट कौल मतदारांनी दिला. वंचित बहुजन आघाडी, रासप, मनसे आणि बच्चू कडू, संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या आघाडीची पूर्णपणे धूळधाण उडाली. प्रत्यक्ष बच्चू कडू यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. राज ठाकरे यांनी आपला मुलगा अमित याला माहीम मतदारसंघातून मैदानात उतरवले. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्याच निवडणुकीत १३ आमदार निवडून आणलेल्या ठाकरे यांचा आता विधानसभेत एकही प्रतिनिधी नसेल. दुटप्पी भूमिका घेतल्याचा फटका ठाकरे यांना बसला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com