Pune News : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता.२०) मतदान झाले. यंदा राज्यात ६५ टक्के विक्रमी मतदान झाले असून सर्वात कमी मतदान हे मुंबई शहरात झाले आहे. तर सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले असून त्यापाठोपाठ गडचिरोली जिल्ह्यात ७२.१५ टक्के मतदानाची नोंद झील आहे. वाढलेल्या मतदानावरून आता सर्वच राजकीय पक्ष आपलीच सत्ता येईल असा दावा व्यक्त करत आहेत. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्ता महायुतीची येणार असून राज्यातील महिला आणि शेतकऱ्यांनी आपल्याला पसंती दिल्याचा दावा केला आहे.
राज्यात मतदान पार पडल्यानंतर विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. या अंदाजात भाजप नेतृत्वातील महायुतीला सत्ता मिळेल असे संकेत देण्यात आले असून भाजप राज्यातील मोठा पक्ष ठरेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर भाजप सत्ता स्थापनेसाठी कामाला लागलेली असून जोरदार तयारी केली जात आहे. पण प्रत्यक्षात सत्ता कोणाची येणार हे २३ तारखेलाच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान राज्यातील वाढलेल्या मतांचा टक्केवारीवरून बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून वाढलेल्या मतदानातील टक्केवारीचा आम्हालाच फायदा होईल, असे म्हटले आहे. राज्यातील मतदानाची टक्केवारी वाढली असून ती भाजपच्या फायद्याची आहे.
राज्यातील लाडक्या बहीणींनी आणि शेतकऱ्यांनी आम्हाला मतदान केले आहे. यंदा मतांचा जो टक्का वाढला आहे त्याचा फायदा आम्हाला होईल,असा विश्वास देखील बावनकुळेंनी व्यक्त केला आहे. तसेच सत्ता स्थापनेसाठी लागणारा आकडा आम्ही पार करू. सध्या आमचे १०५ आमदार असून यंदा यापेक्षा अधिक आमदार आमचे असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा यांचाही परफॉर्मन्स चांगला राहिलं. आमच्या तिघांच्या मिळून बहुमतापेक्षा जास्त जागा निवडून येतील” असा दावा देखील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
शेतकऱ्यांचा रोष
राज्यात सत्ता आमचीच येईल असा दावा करताना बावनकुळेंनी महिला आणि शेतकऱ्यांनी आपल्या महायुतीला मतदान केल्याचे म्हटले आहे. पण प्रचारादरम्यान राज्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कापूस, सोयाबीन आणि इतर शेतमालाच्या पडलेल्या भावावर चकार शब्दही काढलेल्या नाही. फक्त आम्ही हे केलं इतकाच कित्ता गिरवला.
राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत आल्यास सोयाबीनला ६ हजार हमीभाव देऊ असे आश्वासन महायुतीने दिल्याचे ते म्हणाले. पण शेतकऱ्यांसाठी केंद्र किंवा पंतप्रधान म्हणून एखादी घोषणा त्यांनी केली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष दिसत होता. याचा फटका लोकसभेप्रमाणेच विधानसभेत बसण्याची शक्यता असतानाच फडणवीस यांनी भावांतर सारखे गाजर दाखवल्याची टीका विरोधकांनी केली होती.
फडणवीस यांचा ही दावा
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मतदानाची टक्केवारी वाढली की याचा फायदा हा भाजपलाच होतो असे म्हटले आहे. तर यावर पलटवार करताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी,
२३ तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू. महाविकास आघाडीला १६० ते १६५ जागा मिळतील. लोकशाहीत होणारे मतदान हे गुप्त असते. लोक नेहमी आपले मत उघडपणे मांडत नाहीत. यावेळी महाराष्ट्रात असेच घडले आहे. हरियाणामध्ये एक्झिट पोलनुसार काँग्रेस जिंकत होती पण काय झालं हे तुम्ही पाहिलेच आहे. लोकसभेच्या एक्झिट पोलनुसार पीएम मोदींच्या भाजप सरकारला ४०० पेक्षा जास्त जागा मिळत होत्या. पण काय झालं? असाही सवाल त्यांनी केला आहे. तर यावेळी राऊत यांनी, महाविकास आघाडीचा कोण मुख्यमंत्री असेल? नाना पटोले यांना मुख्यमंत्री बनवायचा असेल तर राहुल गांधी आणि खर्गे आणि सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलं पाहिजे,असंही संजय राऊत यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.