Organic Fertilizer Adulteration : रसायनांची भेसळ करीत विकली जातात जैविक खते

Organic Fertilizer : एका कंपनीचा परवाना निलंबित; दर्जेदार खत निवडीचे आव्हान कायम
Organic Fertilizer
Organic FertilizerAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Organic Fertilizer Use : पुणे ः रासायनिक घटकांची भेसळ करीत प्रभावी जैविक खत असल्याचे भासवत शेतकऱ्यांना फसविण्याचे प्रकार राज्याच्या काही भागात सुरूच आहेत. कृषी विभागाने अलीकडेच एका कंपनीवर कारवाई करीत परवानादेखील निलंबित केला आहे.
विषमुक्त अन्न ही संकल्पना ग्राहकांमध्ये रुजत असल्यामुळे सेंद्रिय शेतीमालाकरिता मागणी वाढते आहे. त्यामुळे सेंद्रिय किंवा जैविक शेतीकडे ओढा असलेले प्रयोगशील शेतकरी जैविक निविष्ठा वापरावर भर देतात. त्याचा फायदा घेत रासायनिक घटकांची सर्रासपणे सेंद्रिय निविष्ठांमध्ये भेसळ करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण निविष्ठा ओळखण्याचे शेतकऱ्यांपुढील आव्हान कायम आहे.

‘‘भेसळीचे प्रमाण वाढलेले नाही. उलट, गैरप्रकार दिसताच कारवाई करण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढले आहे. त्यामुळे भेसळखोरांना आळा बसलेला आहे. जैविक खतात रासायनिक खत मिसळून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा एका प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात कंपनीचा परवाना निलंबित करण्यात आला असून, फौजदारी गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. मात्र शेतकऱ्यांनी नामांकित कंपन्यांची व बाजारात सर्वत्र उपलब्ध असलेल्या जैविक निविष्ठा वापरण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे फसवणूक टळू शकते,’’ अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Organic Fertilizer
Fertilizer Adulteration : विद्राव्य खतात चक्क ‘मिठा’ची भेसळ!

एका जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकाने सांगितले, की नव्या कंपन्या अचानक अवास्तव दावा करणारे उत्पादन बाजारात आणतात. त्यात विक्रेत्यांना कमिशन वाढवून दिलेले असते. त्याचा खप होण्यासाठी कंपन्या वेगवेगळ्या ‘स्कीम्स’ आणतात. त्यामुळे कंपन्यांना नफा मिळतो; परंतु सेंद्रिय शेतीत गुंतलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. गुणवत्ताहिन निविष्ठांमध्ये जैविकऐवजी रासायनिक घटक असतात. रासायनिक घटकांचे उर्वरित अंश आढळून आल्यास सेंद्रिय शेतीमालाची विक्री करणे अवघड होते. रासायनिक घटकामुळे शेतीमालाची हानी होते. परंतु शेतकऱ्याला भेसळीचा थांगपत्ता लागत नसल्यामुळे पीक नुकसानीचे कारण भलतीकडेच शोधत असतो.

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, खतामधील भेसळ रोखण्यासाठी गुणनियंत्रण यंत्रणेला अधिक दक्षता घेण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील तीन कंपनीच्या खतामध्ये मोठ्या प्रमाणात अप्रमाणित घटक आढळून आले. त्यानंतर या तीनही कंपन्यांचे परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेतला गेला. लातूरच्या एका कंपनीने खते आणि कीटकनाशके या दोघांमध्येही गैरप्रकार केले होते. त्यामुळे सहा महिने या कंपनीचा परवाना निलंबित केला गेला. क्रियाशील घटक कमी टाकून इतर घटक (फीलर्स) वाढवून शेतकऱ्याला निविष्ठा विकण्याचा प्रकार काही कंपन्या करतात. अशा दोन कंपन्या कृषी विभागाच्या जाळ्यात आल्या. यातील एक कंपनी सांगलीमधील तर दुसरी कंपनी हैदराबादमधील आहे. क्रियाशील घटक कमी प्रमाणात आढळल्यामुळे परवाना निलंबित केला असल्याचे या कंपन्यांना कळविण्यात आले आहे.


कठोर कायद्याशिवाय भेसळ थांबणार नाही
कृषी खात्याच्या एका माजी गुणनियंत्रण संचालकाने सांगितले, की सध्याच्या कायद्यांच्या चौकटीत राहून खतामधील भेसळ कधीही रोखता येणार नाही. कठोर शिक्षा करणारा कायदा राज्य शासनाने मंजूर करायला हवा. सरकारनेच नवे कायदे करण्याचा प्रयत्न केला. परंतु लॉबीच्या दबावामुळे कायद्याची विधेयके धूळ खात पडली आहेत, अशी टीका या संचालकाने केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com