वडने (जि.धुळे) येथील दिलीप रामदास पाटील आपल्या सहा एकरांत सुमारे १६ वर्षांपासून सेंद्रिय प्रमाणित शेती करीत आहेत. निंबोळी अर्क, बायोडायनॅमिक कल्चर,गांडूळखत आदींची निर्मिती ते शेतात करतात. देशी, पारंपरिक वाणाच्या मिरचीच्या उत्पादनासोबत पावडर निर्मितीही त्यांनी सुरू केली आहे. सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षक म्हणून काम करताना गोऱ्हे पैदास केंद्रही चालविण्यातही त्यांनी पुढाकार घेतला आहे. धुळे जिल्ह्यातील वडने येथील दिलीप पाटील यांनी सेंद्रिय शेतीत आपली ठळक ओळख तयार केली आहे. तीन बंधूंमध्ये पूर्वी १८ एकर जमीन होती. विभक्त झाल्यानंतर सहा एकर शेती त्यांच्या वाट्याला आली. सुमारे १६ वर्षांपासून ते सेंद्रीय शेतीत कार्यरत आहेत. विशेष म्हणजे प्रमाणीकरण संस्थेकडून आपली शेती त्यांनी प्रमाणित करून घेतली आहे. सेंद्रिय शेतीतील सुविधा
सेंद्रिय शेतीतील वाटचाल दिलीप यांनी कृषी पदविकेचे शिक्षण घेतले. त्यानंतर शासनाच्या एकात्मिक कीड व्यवस्थापन उपक्रमात सर्वेक्षक म्हणून त्यांनी काम सुरू केले. हा अनुभव घेत असताना सेंद्रिय शेती अधिक शाश्वत आहे असे लक्षात आले. त्यासंबंधीचे शिक्षण, माहिती मिळविली. अनेक भागातील प्रयोग पाहिले. तज्ज्ञांच्या सतत संपर्कात राहिले. शेतीशाळा प्रकल्पातही ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून कार्यरत झाले. यातून ज्ञानवर्धन झाल्यानंतर आल्यानंतर या पद्धतीने शेती सुरू केली. शेती करीत असताना विविध उत्पादनांचे सहज मूल्यवर्धन कसे करता येईल, नफा कसा वाढेल, चार जणांना काम कसे मिळेल यावर काम सुरू केले. प्रशिक्षण केंद्र अशातच शासनातर्फे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची जबाबदारी मिळाली. शेतात ५० टक्के अनुदानावर एक हजार चौरस फुटाची इमारत उभारली. खानदेश व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तिथे प्रशिक्षणाची सोय झाली. दहा १० गटांच्या प्रशिक्षणासाठी ५० हजार रुपये मिळायचे. सुरुवातीची दोन वर्षे उपक्रम सुरू होता. नंतर मानधन मिळणे बंद झाले. तरीही शासनाकडून आलेले गट, विविध गावांमधून सेंद्रिय शेतीच्या पाहणीसाठी आलेले गट यांना पाटील मार्गदर्शन करीत असतात. अनेक शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींनी त्यांच्या सेंद्रीय शेतीची पाहणी केली आहे. घरच्याघरी निंबोळी अर्काची निर्मिती पाटील आवर्जून निंबोळी अर्काची निर्मिती घरच्याघरी करतात. त्यासाठी आवश्यक निंबोळ्या परिसरातील भागातून जूनच्या कालावधीत वेचून घेतात. सात रुपये प्रतिकिलो असा दर वेचणीसाठी मजुरांना देतात. सुमारे २५० ते ३०० लीटर अर्क पिकांसाठी वापरण्यात येतो. काही अर्क शेतकऱ्यांना पुरवण्यात येतो. अर्क तयार करण्यासाठी मजुरांची मदत घेण्यात येते. दरवर्षी बायोडायनॅमिक कंपोस्ट खतही २५ ते ३० टन तयार केले जाते. मात्र त्याची विक्री न करता शेतासाठीच वापर होतो. सुमारे १२ ते १३ टन गांडूळखत वर्षांला तयार होते. यापूर्वी काही खताची विक्रीही केली. दरवर्षी एक क्विटंलपर्यंत गांडूळ कल्चरची विक्री घरबसल्या होते. शेतकरी शेतात येऊन ४०० रुपये प्रति किलो दराने खरेदी करतात. मिरचीची पावडर पाटील लाल देशी मिरचीची लागवड जून व जुलैमध्ये करतात. एकरी सात टनांपर्यंत त्याचे उत्पादन मिळते. काढणी अन्य मिरचीच्या तुलनेत उशिरा म्हणजेच पाच महिन्यात सुरू होते. काही प्रमाणात हिरव्या मिरचीची काढणी करून बाजारात विकी करतात. ही मिरची सेंद्रिय प्रमाणित असल्याने पुणे येथील एका कंपनीने पाटील यांच्यासोबत खरेदीचा करार केला. आता चार वर्षांपासून मिरची पावडर तयार करण्यात येत आहे. पारंपरिक पद्धतीने म्हणजे उखळ-मुसळच्या साह्याने (कांडप) भरडली जाते. २६ रुपये प्रति किलो या दराने ही प्रक्रिया एका व्यावसायिकाकडून करून घेण्यात येते. त्यानंतर पॅकिंग केले जाते. पाटील यांनी ३५० रुपये प्रति किलो या दराने मागील वर्षी पाच क्विंटल मिरची पावडरीची विक्री देखील केली आहे. उर्वरित ओली लाल मिरची ३२०० रुपये प्रति क्विंटल दराने विकली आहे. ओळखीच्या व्यक्ती, अधिकारी, नातेवाइकांकडून या मिरचीला मागणी आहे. जनावरांचे संगोपन पाटील देशी गोऱ्हे पैदास केंद्रही चालवितात. सुरुवातीला त्यांच्याकडे ३५ गायी होत्या. आता सततच्या दुष्काळी स्थितीमुळे गायींची संख्या १७ वर आली आहे. गेल्या चार-पाच वर्षांत १६ गोऱ्ह्यांची पैदास केली. त्यांची प्रत्येकी १५ ते १६ हजार रुपयांत विक्री केली आहे. दरवर्षी विक्रीतून उत्पन्न घेण्यात येते. संपर्क- दिलीप पाटील, ८२०८८९६९३०, ९४०४९७०६१९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.