Fertilizer Adulteration : विद्राव्य खतात चक्क ‘मिठा’ची भेसळ!

खत उद्योगातील एका कंपनीच्या ब्रॅण्डची हुबेहूब नक्कल करत फसवणूक
Fertilizer
FertilizerAgrowon

सोलापूर ः खत उद्योगातील (Fertilizer Industry) ब्रॅण्ड असणाऱ्या एका कंपनीच्या खताच्या ब्रॅण्डची हुबेहूब नक्कल करत १२ : ६१ : ० या विद्राव्य खतामध्ये चक्क मिठाची भेसळ (Salt Adulteration In Soluble Fertilizer) केल्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यात उघड झाला आहे. कृषी विभागाच्या (Department Of Agriculture) पथकाने या खताच्या बॅगा आणि त्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. तसेच पोलिसांकडे फिर्यादीही दाखल केल्या आहेत. पण एकूण सर्व प्रकार पाहता खताच्या या भेसळीत टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात एका अज्ञात शेतकऱ्याने पुणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाला फोन करून त्यासंबंधीची तक्रार दिली होती. मोहोळ येथे बनावट १२ : ६१ : ० या विद्राव्य खताची विक्री होत असून, तक्रारदाराने स्वतः दोन बॅग खरेदी केल्याचेही सांगितले होते. त्यानुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी अशोक पवार यांनी पुण्यातून येऊन पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. त्यासंबंधी रीतसर फिर्यादही दिली. त्यानंतर वैभव काळे (रा. मोहोळ) व राहुल शेंडगे (रा. ढोकबाभुळगाव, ता. मोहोळ) या संशयितांवर गुन्हा दाखल करत चौकशीसाठी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.

Fertilizer
Food Adulteration ...अशी ओळखा अन्नपदार्थांतील भेसळ

त्यानंतर दोनच दिवसांनी पुन्हा उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी येथेही असाच प्रकार उघडकीस आला. तेथेही पाच शेतकऱ्यांनी वांगी येथील सुनील सुपाते या व्यक्तीकडून हे खत खरेदी केल्याचे सांगितले. आता या प्रकरणात सुपाते याच्याविरुद्धही सोलापूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यावरून आता जिल्ह्यात अन्य भागात हे खत कोठे, कोठे वाटप झाले आहे, ते लवकरच उजेडात येईल.

Fertilizer
Dairy Development: राष्ट्रीय डेअरी योजनेत दूध भेसळ रोखण्यावर भर

टोळी कार्यरत, कृषी विभाग अनभिज्ञ

सध्या तरी दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुढे पोलिस तपासात त्यासंबंधीची माहिती समोर येईलच. पण हे काम केवळ एक-दोघाचे नाही, तर यामध्ये टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे. तसेच या वर्षी नव्हे, तर गेल्या चार-पाच वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू असल्याचे समजते. पण एवढी वर्षे हा प्रकार राजरोस सुरू असतानाही कृषी विभाग याबाबत अनभिज्ञ राहिल्याबद्दल शंका व्यक्त होत आहे.

होय, त्यात मीठच, संशयिताची कबुली

मोहोळ येथील प्रकरणात वैभव काळे याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केली, तेव्हा मोहोळमध्ये नाईकवाडी वस्ती येथे पत्रा शेडमध्ये बनावट खत तयार करून त्याची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. तिथे मिठाच्या काही गोण्याही आढळल्या. त्याच्याकडे त्याबाबत विचारणा केली असता, हे मीठच आपण एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या पोत्यात भरून विक्री करत असल्याचे त्याने सांगितल्याचे तंत्र अधिकारी अशोक पवार यांनी ‘अॅग्रोवन’ला सांगितले.

बनावट खताच्या १४ बॅगा, पॅकिंग साहित्य जप्त

वैभव काळे याच्याकडून पांढऱ्या रंगाच्या बनावट खत असलेल्या ३२ हजार रुपयांच्या पाच बॅगा, बॅगा सीलिंग करण्याच्या ११ हजार रुपये किमतीच्या दोन मशिन, वजन काटा, दोरा असा एकूण ५० हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. तसेच सावळेश्‍वर (ता. मोहोळ) आणि पडसाळी (ता. उत्तर सोलापूर) येथे विक्री झालेल्या सहा शेतकऱ्यांकडील नऊ अशा एकूण १४ बॅगा जप्त करण्यात आल्या आहेत.

(क्रमशः)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com