Pali News : पश्चिम घाटाचा विस्तीर्ण पट्टा, विपुल जैवविविधता व डोंगरदऱ्यांनी वेढलेला आणि ऐतिहासिक वारशांचा ठेवा म्हणून रायगड जिल्हा ओळखला जातो; मात्र येथे वारंवार लागणाऱ्या मानवनिर्मित व काही प्रमाणात नैसर्गिक वणव्यांमुळे जैवविविधता, वनसंपदा व पशू-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिवाय, मालमत्तादेखील नष्ट होते.
सध्या ठिकठिकाणी वणवे लागण्यास सुरुवात झालेली आहे. पावसाळ्यात जिल्ह्यातील डोंगर, माळरान, किल्ले, गड, जंगल या सर्व ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात छोटी झुडपे व गवत उगवते. पावसाळ्यानंतर ही झुडपे व गवत सुकतात. अशा माळरान, डोंगर व शेतात सुकलेल्या झुडूप व गवताला नैसर्गिकरीत्या वणवा लागतो, तर काही नागरिक कळत-नकळत आगी लावतात. या आगीचे रूपांतर प्रचंड नैसर्गिक व कृत्रिम वणव्यात होते.
दरवर्षी जिल्ह्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर असे वणवे लागतात. परिणामी, या आगीत झाडे-झुडपे, पशू-पक्षी, सूक्ष्मजीव तसेच सरपटणारे प्राणी यांचा जळून मृत्यू होतो. त्यामुळे सजीवसृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक वास्तू आणि किल्ल्यांवर हे वणवे लागत आहेत.
त्यामुळे ऐतिहासिक वास्तूंंचे नुकसान होत आहे. वणवे लागल्यामुळे किल्ले व ऐतिहासिक वास्तूंवरील मोठ्या प्रमाणात वनसंपदादेखील नष्ट होत आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या पशू-पक्ष्यांची अन्नपाण्यासाठी वाताहत होत आहे. येथे राहणारे मोर, माकड व भेकर हे प्राणी अन्न-पाण्यासाठी दाहीदिशा भटकतात. सध्या अशा वणव्यांना मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे.
वन विभागाकडून जनजागृती व प्रबोधन
बहुतांश वणवे हे मानवनिर्मित असतात. नोव्हेंबरअखेरपासून व मार्चनंतर पानगळ सुरू झाल्यावर जिल्ह्यात वणवे लागतात. यावेळी पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळे पक्षी, त्यांचा अधिवास, त्यांची पिल्ले आणि अंडी नष्ट होतात.
तसेच, वणव्यामुळे महत्त्वाची जैवविविधता धोक्यात येते. मधमाशी तसेच इतर कीटक, रानफुले, मृदा आदींनादेखील प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या वणव्याची झळ बसते. वणवे रोखण्यासाठी वन विभागाकडून जनजागृती व प्रबोधन केले जाते. जाळरेषा काढली जाते, अशी माहिती वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी दिली.
संबंधित प्रशासनाचे प्रयत्न अपुरे
कृत्रिम वणव्यांमुळे संपूर्ण सजीवसृष्टी धोक्यात येते. पर्यावरणाचा ऱ्हास होतो. त्यामुळे वणवे रोखण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून विविध उपाय व जनजागृती केली जाते. तसेच, काही वेळेला विद्यार्थी पथनाट्य सादर करतात; मात्र हे प्रयत्न अपुरे आहेत. या उपायांबरोबरच स्थानिक लोकांना व आदिवासींना वणव्याचे दुष्परिणाम सांगून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. यासाठी गावसमिती निर्माण केली पाहिजे.
प्रामुख्याने वनविभाग, निसर्गप्रेमी व आदिवासी विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच, दृकश्राव्य माध्यमांद्वारे वणव्यांमुळे होणारी हानी सर्वांसमोर आणली गेली पाहिजे. लोकांनीदेखील स्वयंस्फूर्तीने वणवे रोखणे व स्वतः लावणार नाही, यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. याबाबत वन विभागाच्या माध्यमातून प्रबोधन व जनजागृती करत असल्याचे कोलाड येथील पर्यावरण व वन्यजीव रक्षक सागर दहिंबेकर यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.