Pune News : उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील जंगलात एप्रिल महिन्याच्या २५ तारखेनंतर आग लागण्याच्या आणि लावण्याच्या घटना समोर येत आहेत. या घटना थांबलेल्यानसून उत्तराखंडची जंगले आग ओकत आहेत. येथील कुमाऊँच्या जंगलात पुन्हा आगीने रौद्र रूप धारण केले असून सोमेश्वर रांगेतील जंगलाला लागलेली आग विझवताना एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याचवेळी चंपावतच्या लोहघाट शहराजवळील बनगावचे जंगल दोन दिवसांपासून धुमसत आहे.
सध्या उत्तर भारतात उष्णतेचा प्रकोप दिसून असून येथे उष्णतेची लाट आणि कडक उन्हामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. उत्तराखंडची राजधानी डेहराडूनच्या उष्णतेने गेल्या १० वर्षांचा विक्रम मोडला असून येथील तापमान ४१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. जे सामान्य तापमानापेक्षा सहा अंशांनी जास्त होते. तर वाढत्या तापमानाचा फटका येथील जंगलांना बसताना दिसत आहे.
उन्हाचा तडाखा वाढत असतानाच कुमाऊँच्या जंगलातील आग पुन्हा भीषण बनली आहे. सोमेश्वर रांगेतील जंगलातील आग विझवताना एका तरूणाला आपला जीव गमवावा लागला असून महेंद्र सिंह डांगी (वय-४०) असे आहे. जो सोमेश्वर जंगलातील खाई पट्ट्यात लागलेली आग विझवायला गावातील लोकांच्या बरोबर गेला होता. गावातील लोक आगीवर नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करत होते. जेंव्हा सर्व गावी परत आले तेंव्हा महेंद्र दिसला नाही. यावरून पुन्हा शोध घेतला असता महेंद्र याचा अर्धा जळालेला मृतदेह सापडला. जंगलाला लागलेल्या आगीमुळे आतापर्यंत या रेंजमध्ये पाच जणांना जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान जंगलात लागलेली आग राणीखेत येथील वसतिगृह व लोकवस्तीच्या परिसरात पोहचली असून ती लष्कराचे जवान आणि वनविभागाच्या पथकाने आटोक्यात आणली. मात्र गेल्या १५ दिवसापासून येथील आग धुमसत असून यात आता पाचव्या व्यक्तिचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालेली आहे.
तसेच चंपावतच्या लोहघाट शहराजवळील बनगावचे जंगल दोन दिवसांपासून धुमसत असून येथे वनौषधींसह उटीश, पाईन, देवदार, ओक, आदी प्रजातींची झाडे जळून खाक झाली आहेत. जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे रेंजर दीपक जोशी यांनी सांगितले आहे. तर रामनगर वनविभागाच्या फतेहपूर रेंजमध्ये आणि नैनिताल जिल्ह्यातील बेतालघाट ब्लॉकच्या जंगलात लागलेली आग आटोक्यात आणली गेली आहे.
वन विभागाचे म्हणणे काय?
येथे धुमसत असलेल्या आगीवरून वनविभागाने सांगितले की, कुमाऊंमध्ये गेल्या २४ तासांत आगीची फक्त एक घटना समोर आली आहे. वास्तव चित्र मात्र याच्या उलटे असून कुमाऊंमध्ये अल्मोडा, चंपावत आणि नैनिताल जिल्ह्यात दोन दोन ठिकाणी जंगलाला आग लागली आहे
यावरून अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक निशांत वर्मा यांनी सांगितले की, शुक्रवारनंतर गढवालमधील जंगलात आग लागण्याच्या ९, कुमाऊंमध्ये १ आणि वन्यजीव क्षेत्रात १ घटना समोर आली आहे. १७ मे पर्यंत कुमाऊंमध्ये जंगलाला लागलेल्या आगीत ८१७ हेक्टर क्षेत्रातील वनसंपत्तीचे नुकसान झाले असून १०८६ घटनांमुळे १४६७ हेक्टर जंगल बाधित झाले आहे
आगीच्या भष्यस्थानी पडून मृत्यूमुखी पडलेल्या महेंद्र सिंह डांगी प्रकरणी देखील एका अज्ञातावर गुन्हा दाखल केला जाईल. तर पीडित कुटुंबाला लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल.
- दीपक सिंग, डीएफओ, वनविभाग, अल्मोडा.
६७ घटनांची नोंद
दरम्यान हिमाचलमध्ये देखील पुन्हा जंगलांनी पेट घेण्यास सुरूवात केली असून येथे ६७ ठिकाणी आग लागली. गेल्या २४ तासांत राज्यभरात आग लागण्याच्या ६७ घटनांची नोंद झाली असून ४६७.७५ हेक्टर वनसंपत्तीचे नुकसान झाले आहे.
२,७०५.८४ हेक्टर वनजमिनीचे नुकसान
वनविभागाच्या आकडेवारीनुसार धर्मशाळा वनपरिमंडळात शुक्रवारी संध्याकाळपासून शनिवार संध्याकाळपर्यंत आगीच्या सर्वाधिक २५ घटनांची नोंद झाली आहे. मंडी सर्कलमध्ये १३, हमीरपूरमध्ये १०, बिलासपूरमध्ये १, चंबामध्ये १, नाहानमध्ये ११, शिमल्यात २, सोलनमध्ये ४ घटना घडल्या. तर उन्हाळी हंगाम सुरू झाल्यापासून राज्यात आगीच्या एकूण ३८१ घटनांची नोंद झाली असून यामध्ये २,७०५.८४ हेक्टर वनजमिनीचे नुकसान झाले आहे. यात गेल्या वर्षी पावसाळ्यात केलेल्या वृक्षारोपण क्षेत्राचाही समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाने खडसावले
नैनितालच्या जंगलात लागलेली आगही आटोक्यात येण्याचे नाव घेत नसून यावर प्रशासन फक्त आम्ही प्रयत्न करत असल्याचे म्हणत आहे. यावरून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी उत्तराखंडमधील जंगलातील आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने उचललेल्या पावलांवर खडेबोल सुनावले आहेत. तसेच मौल्यवान जंगलांना आगीच्या धोक्यांपासून संरक्षित केले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.