Globalization Impact: बडा घर पोकळ वासा

Rural Economic Change: जागतिकीकरणाने ग्रामीण भागातील वैभवशाली पारंपरिक घराण्यांना मोठा धक्का दिला आहे. पूर्वीचे मोठे घराणे आणि जमिनींचे सामर्थ्य आज लहान तुकड्यात विखुरले असून, सामाजिक आणि आर्थिक स्थितीतील परिवर्तनामुळे आज अनेकांची परिस्थिती खूप बदलली आहे. अनेक जण जरी एकाच नावाने दरजेदार जीवन जगले तरी आज त्यांची पुढील पिढी संघर्ष करत आहे.
Globalization
GlobalizationAgrowon
Published on
Updated on

सोमनाथ कन्नर

Village Changes: साधारण १९८० नंतर ग्रामीण भागाला पार अवदसा आली आणि गावांचं वैभव झरझर ओसरत गेलं, असं वारंवार बोललं जातं. पूर्वीचे दिवस फार छान होते, अशी समजूत जागतिकीकरणानंतर जवळपास प्रत्येक माणसात घट्ट रुजली आहे.

या इथून नजर पोहोचेल तिथपर्यंत आमचीच शेती होती किंवा हे शेत पूर्वी आमचंच होतं... ही सगळी जमीन आता जर आपल्या ताब्यात असती तर आम्ही गावात काय पंचक्रोशीत एक नंबरला असतो... असले उमाळे देणारे प्रत्येक गावात तुम्हाला दिसतील. अमुकजी आमच्या घरी सालगडी होता. आमच्या घरून ताक नेऊन खायचा तो. त्याच्या लग्नाला आम्हीच मदत केली होती. आता तो कारमध्ये फिरतोय... असल्या आठवणी अनेक ओसाड गावचे पाटील पारावर बसून उकरून काढताना दिसतात.

जुनं फार चांगलं होतं आणि आता पूर्वीसारखं काहीही राहिलं नाही, अशा स्मरणरंजनात रमणारा समाज वर्तमानात अपयशी असल्याचं लक्षण असतं. सध्या ग्रामीण भागाला या स्मरणरंजनाची बाधा झालेली दिसून येते. अर्थात, जुनं सगळं गुलछबू होतं असं वाटणारा जो वर्ग आहे; तो गावात पूर्वी चांगल्या भरगच्च जमिनी आणि असाम्या असणारा होता. आज हा वर्ग मोठ्या प्रमाणात नैराश्यात गेला आहे.

गावाकडच्या वैभवशाली इतिहासातील सुबत्तापूर्ण कुटुंब पद्धतीचं उत्तम उदाहरण म्हणजे गावातल्या या मोठमोठाल्या जुन्या असाम्या आहेत. यांच्या भावक्या, नातेवाईक मंडळी हा सगळा गोतावळा आज मात्र एकाच मापात सैरभैर दिसतो. लेकी लाखो रुपये खर्चून सरकारी नोकरीवाल्यांच्या घरी दिल्यात; पण यांच्या पोराला पोरगी द्यायला भिकारीही तयार नाहीये अशी स्थिती आहे.

Globalization
Village Culture : उत्सवांचा लळा तोचि गावाचा विरंगुळा

गाव यांच्या पुढं भरभर निघून गेलं. यांच्याकडे राबणारे आज पक्क्या घरांमध्ये जाऊन राहतायेत. त्यांची मुलं चिकाटीने शिकली, हुद्द्यावर लागली. गोऱ्यागोमट्या सुना-नातवंडांसह ते अधूनमधून गावाकडं येतात तेव्हा या जुन्या असाम्यांच्या वाड्यांमध्ये दीड-दीड खण जागेत पार्टिशन भिंती घालून राहणारे वंशज हे सगळं निर्विकारपणे पाहतात.

कधीकाळी राजकारणात यांचा वरचष्मा होता. सत्ता यांच्या हातात होती. त्याचा एक वेगळा आब आणि माज होता. आता मात्र पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. आरक्षणामुळे आणि स्वजातीतल्या गटबाजीमुळे राजकारणात या मंडळींना वारंवार ‘बॅकफुट'वर जावं लागलं. एकेकाळी या मंडळळींकडे मोठा जमीनजुमला होता. आता पुढच्या पिढ्यांमध्ये जमिनींच्या वाटण्या झाल्यामुळे बहुतेकांचे सातबारे लहान लहान तुकड्यांवर आले. सामायिक विहिरीवर एकाच दमात बटण दाबून अर्ध्या तासात पाणी काढून सगळ्यांनी एकमेकांची अडवणूक करून ठेवलीय.

ज्या विहिरी कधीकाळी वीस-वीस एकर पोसत होत्या, त्या विहिरींवर दोन एकरही ओलित निघेना झालंय. समन्वयाचा अभाव आणि फाजील स्वाभिमान अंगी असल्याने प्रत्येकाने लाख-लाख रुपये खर्च करून स्वतंत्र विहिरी खोदून ठेवल्या. स्वतंत्र मोटारी, पाइपलाइन करून घेतल्या. पैसे बहुतांश व्याजाचेच काढलेले असल्याने कर्जाचं मीटर सुरू झालं. अतिरिक्त विहिरींमुळे जमिनी चिबड झाल्या. जुन्या पाटीलक्या अंगी असल्याने कुणाच्या बांधावर मजुरीला जायची यांना अर्थातच लाज वाटते. जमीन पडीक पडली तर अपमान वाटतो.

ती वहिती करण्यासाठी लाखभर रुपये जवळ हवेत, ते मात्र नाहीत. सरकारी बँका एकरी वीस हजारांच्या वर उभं करत नाहीत म्हणून आता खासगी बँकांकडे मोर्चा वळला असून, ‘मॉर्गेज' करून लाखोंचा बोजा करून ठेवलाय. तडजोडी करून संसार सुरू आहेत. पोरांची शिक्षणं अशीच कुठं तरी सांदीकोपऱ्यातल्या कॉलेजात झाली असल्याने त्यांची असून, अडचण अन् नसून खोळंबा अशी गत झालेली दिसते.

मोजक्या जणांकडे पाच-पन्नास एकरांचा सातबारा आहे. अर्थात, हा स्वतः कमावलेला नसून मागील पिढीच्या शे-पाचशे एकरांवरून तो एवढ्यावर आला आहे. पाण्याचा पत्ता नाही. पूर्वजांनी गुऱ्हाळात हजार हजार कढया आदनं काढल्याचा आणि शेकडो क्विंटल कापूस जिनिंग फेडरेशनला घातल्याचा इतिहास आहे. त्यामुळे आज थेंबभर पाणी नसतानाही ऊस लावायची, पूर्वजांसारखी शेती करायची हौस मात्र टिकून आहे. गोरगरिबाला पूर्वीसारखी मदतही करायचा कंड अजूनही गप्प बसू देत नाही. पण त्या नादात लाखभर खर्च करून बारा हजार उत्पन्न हाती येतंय याची जाणीव नाहीये.

पोराला शेतीत न घालता काहीतरी उद्योग टाकून द्यायचा, असं डोक्यात असल्यास कृषी सेवा केंद्र आणि हार्डवेअर याशिवाय तिसरा उद्योग कुणाला सूचत नाही. या दोन्ही धंद्यांना फारसं कौशल्य लागत नसल्याने हे बहुजनांचे लाडके उद्योग ठरलेत. नुसत्या शेतीच्या आधारावर कुणी पोरगी देत नसल्याने एखाद्या धंद्यात पडल्यावर कुणी सोयरिकीला उभं करेल या आशेने बाजाराच्या मोठ्या गावात रोडच्या कडेने प्लॉट घेऊन सगळ्यांनी कृषी सेवा केंद्र आणि हार्डवेअर टाकण्याचा सपाटा लावला आहे. आता ग्राहक कमी अन् दुकानं जास्त अशी परिस्थिती होऊन बसली आहे. आधी किरकोळ विक्री करणारे मारवाडी दरम्यानच्या काळात यांनाच ठोक माल विकून गब्बर झाले.

Globalization
Village Development : ग्राम विकास आणि जिल्हा नियोजन समितीची कार्ये

बरं या पाटीलमंडळींना व्यापाराचा अनुभव नसल्याने अन् तोंडओळखीचा पसारा जास्त असल्याने उधारीत सगळा आतबट्ट्याचा व्यवहार होऊन बसला आहे. येत्या काही वर्षांत हा धंद्याचा फुगाही फुटलेला दिसेल. शेती आणि उद्योग असा दुहेरी तडाखा बसलेली पिढी पुन्हा पाय धरू शकेल की नाही याबाबत शंका आहे. इतिहासाचा जाज्वल्य वारसा असलेल्या या घटकाची जागतिकीकरणात वर्तमानात परवड झालीये. भविष्याची चिंता तीव्र सतावते आहे.

हे सगळं असूनही कौटुंबिक आणि राजकीय कुरघोड्या मात्र महाभारतही फिकं पडेल अशा पद्धतीने सुरू आहेत. लग्नपत्रिकेत नावं टाकलं की नाही यावर बारीक लक्ष आहे. कुटुंबसंस्थेत प्रचंड विषमता आली पण नितीने वागणं अजून सोडवत नाही. लांडीलबाडी रक्तात नाही. स्वाभिमान ओसंडून वाहतोय पण पैसा कमावण्यासाठी आवश्यक कौशल्य शिकण्याची तयारी अजूनही नाहीये. कॉम्प्युटर पहिला की डोकं बंद पडतंय. सरकारी योजनांचे फॉर्म भरायला पन्नासच्या जागी शंभर देऊन परस्पर काम करून घेणं सुरू आहे.

काहींनी मुंडकी मोडून कोट्यवधी कमावल्याची उदाहरणे डोळ्यासमोर आहेत. पण बापजाद्यांचं नाव राखण्यासाठी संसार राखरांगोळी करून गावगाडा करायची या मंडळींची तयारी थोडीही कमी झालेली नाही. एखाद्याच्या लग्नात पाचशेपेक्षा कमी आहेर करायला कमीपणा वाटतो. वाडा, महिरपी नक्षीच्या माड्या, सालगडी, शर्यतीचे बैल, कुस्त्यांचे आखाडे, गाई, बैलबारदाना यांचं आकर्षण मात्र अजूनही पिढ्यान् पिढ्या तसंच टिकून आहे. तसं पाहायला गेलं तर एका दृष्टीने काहीच कमी नाहीये पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर काहीच शिल्लक नाहीये. खरं तर अनुदान, पीकविम्याच्या जोरावर उसनं अवसान आणून सगळा गाडा हाकणं सुरू आहे. पण खानदानीपणाची फाटकी वस्त्रे पार झुरून फाटायला आली असून नागडेपणा यायची वेळ आली आहे.

यावर समाजशास्त्र पुस्तकातून अन अर्थशास्त्र व्यवहारातून शिकणं हाच एकमेव पर्याय आहे. पोरं जन्माला घालताना सातबारा किती आहे हा हिशेब विसरून त्यांना कौशल्य शिक्षण देता येईल का, हा विचार आधी करावा लागेल. त्याच त्या अपयशी नातेवाइकांमध्ये सोयरिकी करणं थांबवावं लागेल. चाकोऱ्या सोडून निर्णय घ्यावे लागतील. पत्रिकांमध्ये नावाच्या अन् आडनावाच्या मध्ये पा. (पाटीलचा शॉर्टफॉर्म) लिहिणं बंद करून आहे ते स्वीकारून कामाला लागावं लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com