Village Culture : उत्सवांचा लळा तोचि गावाचा विरंगुळा

Cultural Heritage : मायमाउलींनी चूल, मूल आणि शेती भोवतीचा व्यवहार कधीतरी बंद ठेवावे, गावात पैपाहुणा यावा यासाठीच आमच्या पूर्वजांनी गावात विविध उत्सवांची परंपरा चालू केली आहे.
Village Goddess Pilgrimage
Village Goddess PilgrimageAgrowon
Published on
Updated on

Festival Traditions : शहरांमध्ये लोकांसाठी करमणुकीची नाना साधने, विरंगुळ्याची ठिकाणे असतात. दऱ्याडोंगरात आम्हा शेतकऱ्यांकडे यापैकी काहीही नाही. गावाचा पार हाच काय तो रोज भेटीगाठीचे एक ठिकाण असतो. गावातील कष्टाच्या दिनक्रमात बदल व्हावा, शेतकऱ्यांनी कधी तरी काम बंद ठेवावे, मायमाउलींनी चूल, मूल आणि शेती भोवतीचा व्यवहार कधीतरी बंद ठेवावे, गावात पैपाहुणा यावा यासाठीच आमच्या पूर्वजांनी गावात विविध उत्सवांची परंपरा चालू केली आहे.

हे उत्सव आमच्या जीवनातील उत्साह वाढवतात. आम्हाला काबाडकष्टातून थोडा विसावा देतात. त्यामुळे गाव एकत्र येते. उत्सवांच्या निमित्ताने पंचक्रोशीतील शेतकरी एकत्र येतात. घरच्यादारच्या गप्पा होतात. त्यातून एकमेकांना मदत करण्याचे नियोजन लोक करतात. चर्चेतून सुख-दुःख, नात्यागोत्यातील घडामोडी कळतात. याच चर्चेतून लग्नाच्या गोष्टीसुद्धा होतात. त्यामुळे गावकऱ्यांना उत्सवांचा लळा असतो.

गावदेवीची यात्रा, अखंड हरिनाम सप्ताह, नवरात्र, गणेशोत्सव, होळी, रंगपंचमी, दिवाळी, दसरा असे किती तर उत्सव गावाची रंगत वाढवतात. हे सारे उत्सव शेतीच्या नियोजनाशी जोडलेले असतात. आता आमच्या गावातील उत्सवांची परंपरा सांगतो. जूनमध्ये पावसाला सुरुवात होताच शेवटच्या आठवड्यात भाताची रोपं टाकली जातात. त्यानंतर आषाढी एकादशी येते. त्यानंतरची पोर्णिमा जाताच गावशीवेवरील लक्ष्मीआईचे पुजन करतो.

Village Goddess Pilgrimage
Village Culture : गाव, गोतावळा आणि गावकी

यावेळी सारे शेतकरी पुरणपोळीचा नैवेद्य तयार करतात आणि वाजतगाजत गावदेवीकडे निघतात. गावाच्या आजूबाजूला असलेल्या साऱ्या देवस्थानांकडे नैवेद्य ठेवत ही वाजंत्री पुढे जाते. शेवटी लक्ष्मीआईला दहीभाताचा नैवेद्य दाखवला जातो. मानाच्या शेतकरी कुटुंबातील सदस्य पाच घागरी पाणी भरून आणतात. त्यातून लक्ष्मीला स्नान दिले जाते. मानाचा शेतकरी देवीसमोर एक लिंबू हातात धरून उभा असतो.

सारे जण या लिंबाखालून पुन्हा गावात येतात. ते लिंबू मग शिवेबाहेर सोडून दिले जाते. या परंपरेचा अर्थ असा, की आम्ही सारे शेतकरी गावदेवीला सांगतो, की आता खरिपाच्या हंगामाची वाट पाहत आहोत. गावावर, पिकावर काही संकट येऊ देऊ नको. आमची इडापिडा गावाच्या शिवेबाहेरच राहू दे. त्यानंतर मग सारे भात लागवडीच्या कामाला लागतात.

पुढे नागपंचमी येते. त्या वेळी पुन्हा गावातील महिला नटूनथटून एकत्र येतात. देवळात मातीचा नाग बनवला जातो. नागोबाचे पूजन केले जाते. नागाला आम्ही शेतकरी पूर्वापार पूजत आलेलो आहोत. कारण, तो आमच्या जीवनात सर्वत्र सामावलेला आहे. नागामुळेच शेतामधील उंदीर, घूस, बेडूक रोखले जातात. नाग नसता तर साऱ्या शेताची उंदरांनी चाळण केली असती. जंगलात नाग चावताच मृत्यू येतो.

Village Goddess Pilgrimage
Rural Culture : शिवारदैवतं झाकोळून गेली आहेत

त्यामुळे वाघाप्रमाणेच नागाला जंगलवासीय बिचकून असतात. त्यामुळेच या प्राण्यांना देवाचे रूप दिलेले आहे. हेतू हा की कोणी उगाच या प्राण्यांची खोडी काढू नये व त्यातून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. नागपंचमीला पुन्हा शेतकरी महिला विविध खेळ खेळतात. त्यानंतर गौरी-गणपती येतात. गौरीच्या सान्निध्यात पुन्हा शेतकरी महिला चार-पाच दिवस गुंतून पडतात. जागरण करतात. खेळ खेळतात. गावच्या गणपतीला सारा गाव गोळा होतो. वाजत गाजत गणेश विसर्जन होते.

त्यानंतर येतो दसरा. त्यानिमित्ताने गाव पुन्हा एकत्र येते. गावदेवीचे घट बसल्याशिवाय शेतकऱ्याच्या घरातदेखील घट बसत नाहीत. यानिमित्ताने गावदेवीची मिरवणूक निघते. त्यात सारा गाव सहभागी होतो. त्यानंतर सारे शेतकरी घरी येतात. घराच्या कुलदैवतासमोर घट बसवतात. गावात नवरात्राचे नऊ दिवस खूप आनंदात जातात. गावकरी जोशात असतात. ते ढोल,

लेझिम खेळतात, दसऱ्याला सोने लुटतात. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. त्यानंतर येते दिवाळी. सारे शेतकरी पुन्हा दुःख विसरून दीपोत्सव साजरा करतात. ते होताच येते ती कोजागिरी पोर्णिमा. सारा गाव पुन्हा देवीसमोर जमतो. दूध उकळवले जाते. त्याचा नैवेद्य दिला जातो. आणि मग काकडा कसा करायचा याचे नियोजन होते. काकडा चालू होताच सारा गाव भक्तिभावाने न्हाऊन निघतो. काकड्याची समाप्ती कार्तिक पोर्णिमेला असते. समाप्तीच्या दिंडीची सुरुवात माझ्या दारासमोरून होते. दिंडीचे पूजन होते. दिंडी गावभर फिरते. भाविक मोठ्या संख्येने येतात. कीर्तन भजन होते. महाप्रसाद होतो.

आम्हाला जत्रेपेक्षाही असे धार्मिक उत्सव आवडतात. जत्रा, तमाशा, कुस्त्यांचे फड अनेकदा वादविवादाला निमंत्रण देतात. उत्सव मात्र नेहमी शांतता, एकोपा आणि समाधान देतात. प्रत्येक गावात उत्सवाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. त्या साऱ्या प्रथपरंपरा जपल्या पाहिजे. कारण तीच गावाची संस्कृती आहे. त्यातच गावाचा आनंद, एकोपा सामावलेला आहे.

(शब्दांकन : मनोज कापडे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com