

Nagpur News: जागतिक दुग्धोत्पादनात भारताची आघाडी आहे. महाराष्ट्राचा देखील त्यात मोठा वाटा असून या राज्याचे वार्षिक दुग्धोत्पादन १६ दशलक्ष टन इतके प्रचंड आहे. त्यावरूनच महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य दुग्ध उत्पादक राज्यांपैकी एक असल्याचे सिद्ध होते. यामागे पशुविज्ञान विद्यापीठासोबतच पशुपालक, यशस्वी सहकारी दुग्ध संस्था यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंगळवारी (ता. ४) केले.
महाराष्ट्र राज्य पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (माफसू) बाराव्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. या वेळी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्री पंकजा मुंडे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, कुलगुरू डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी, राज्यपालाचे सचिव प्रशांत नारनवरे यांची उपस्थिती होती.
राज्यपाल पुढे म्हणाले, की कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय हे आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्यात ६० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या ही शेती, शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळेच जनावरांचे आरोग्य आणि उत्पादकता ही शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात सुमारे तीन कोटींपेक्षा अधिक जनावरे, गाई, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्या आहेत.
जी दूध, मांस व अन्य पशू उत्पादनांद्वारे राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देतात. ‘माफसू’ने या क्षेत्रात भरीव योगदान देत देशी गोवंशाच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) आणि भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा (ईटीटी) प्रभावी वापर केला आहे. त्याद्वारे ४७ वासरे जन्मली आहेत व ९७ गाईंमध्ये गर्भधारणा झाली. राज्यात १.५ लाखाहून अधिक दुग्ध सहकारी संस्था आणि दूध संकलन केंद्राचे विस्तृत जाळे आहे.
या प्रणालीमुळे लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो. त्याच्या जोडीला मत्स्य व्यवसायाचे देखील योगदान आहे. राज्यात ७२० किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे. त्यामुळेच राज्य १४ दशलक्ष टनांहून अधिक वार्षिक मासळी उत्पादनात योगदान देत आहे. पशुपालन हा व्यवसाय नाही तर ग्रामीण जीवनाची लाइफलाइन असल्याचे मत या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
राज्याला पहिल्या क्रमांकावर नेणार
पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्री पंकजा मुंडे यांनी पदवीमुळे प्रत्येकाची जबाबदारी आणखी वाढल्याचे सांगितले. महाराष्ट्र हा जैवविविधतेमुळे प्रत्येक भागात वेगळेपण जपणारा आहे. याच महाराष्ट्राला पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय क्षेत्रात लौकिक मिळवून देत दुग्ध, मांस व मत्स्य या उत्पादनात पहिल्या क्रमांकाचे राज्य अशी ओळख देण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही श्रीमती मुंडे म्हणाल्या.
मत्स्य उत्पादनावर भर
कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी ‘माफसू’च्या उपलब्धतेविषयी आपल्या भाषणातून माहिती दिली ते म्हणाले, की बारामती, बीडला नव्या पशुवैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे. मोर्शी (अमरावती) येथे मत्स्य व्यवसाय महाविद्यालय प्रस्तावित आहे. ठाणे, सांगली केव्हीकेचे काम प्रगतीवर असून नागपूर केव्हीके कार्यान्वित झाले आहे. मेळघाट म्हशीची नोंदणी करण्यात आली आहे. शैक्षणिक आढावा सादर करुन त्यांनी येत्या काळात मत्स्य उत्पादन वाढीवर लक्ष्य केंद्रित करणार असल्याचे सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.