
Pune News: ‘‘देशी गोवंश ही आपली संस्कृती असून, त्यांच्या संवर्धन व रक्षणासाठी गोवंश हत्याबंदी कायदा अधिक बळकट करण्याबरोबरच, गोशांवरील भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना देशी गोवंश पालनातून अधिकचे उत्पन्न कसे मिळेल, यासाठी गोमय उत्पादन व संशोधनावर पशुसंवर्धन विभाग विचार करत आहे,’’ असे प्रतिपादन पशुसंवर्धन व पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ‘गोवंश हत्याबंदी कायदा अंमलबजावणी आणि सुधारणा’ या विषयावर शनिवारी (ता.१) आयोजित अधिवक्ता कार्यशाळेत मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. या वेळी गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, पशुसंवर्धन आयुक्त प्रवीणकुमार देवरे, गोवंश हत्या बंदी कायद्यातील विविध तज्ज्ञ आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. या वेळी मंत्री मुंडे यांच्या हस्ते ‘१९६२ महापशुधन संजीवनी’ तत्काळ प्रतिसाद केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
मंत्री मुंडे म्हणाल्या, की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला माता मानले जाते. महाराष्ट्र सरकारनेदेखील गाईला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे. पशुधन आणि पशुपालक यांच्यामध्ये भावनिक आणि संवेदनशील नाते असते. शेतकरी आणि पशुपालक आपल्या पशुधनाला घरातील अपत्यासारखे जपत असते.
मालक किंवा एखादे पशुधन गमावले तर मालक आणि गाय, बैल, श्वान आपल्या मालकाच्या विरहाने व्याकूळ होत असते. अशी ही आपली संस्कृती असून ती जोपासणे आपले कर्तव्य आहे. यासाठी आपण देशी गोवंश हत्या बंदी कायदा अधिक कडक आणि बळकट करणार आहोत. यामध्ये शेतकरी आणि गोरक्षकांना त्रास होणार नाही अशीदेखील तरतूद केली जाणार आहे.’’ या वेळी शेखर मुंदडा यांनी प्रास्ताविकात देशी गोवंश संवर्धन, हत्या कायदा अंमलबजावणी यावर विविध मागण्या सादर केल्या.
‘मला आता मांसाहारी व्हावंसं वाटतंय’
‘‘मी मांसाहार सोडून आता शुद्ध शाकाहारी झाली आहे. मात्र पशुसंवर्धनमंत्री झाल्यापासून विविध बैठकांमध्ये चिकन, मटण, अंडी, कडकनाथ कोंबडी, विविध मासे यावर चर्चा असते. ही चर्चा ऐकून मला देखील आता मांसाहारी व्हावंसं वाटतं आहे,’’ असे मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
‘पशुधन वाढविणे हे माझे मिशन’
‘‘जगात, देशात आणि राज्यात आता पौष्टिक अन्नासाठी चिकन, मटण, अंडी, कडकनाथ कोंबडी, मासे यांच्या मागणीत वाढ होत आहे. शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय आणि नागरिकांच्या प्रोटिनची गरजेसाठी पशुधन वाढविणे माझे मिशन असल्याचेही मंत्री मुंडे म्हणाल्या.
‘गोशाळांचे मूल्यमापन व्हावे’
गोवंश संवर्धनासाठी राज्य सरकारच्या वतीने गोशाळांना अनुदान दिले जाते. मात्र प्रत्येक पैशांची विनियोग योग्यरीत्या होती की नाही यासाठी दिलेल्या अनुदानाचे आणि गोशाळांचे मूल्यमापन होणे गरजेचे असल्याचेही मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. १६५ गोशाळांना अनुदान दिल्याचेही त्यांनी सांगितले.
‘पर्यावरण ऱ्हासाचा भस्मासूर’
झपाट्याने झालेल्या औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे गावखेडी संपत चालली आहेत. गावागावांतील संस्कृती संपत चालली आहे. या विकासामुळे पर्यावरणाच्या ऱ्हासाचा भस्मासूर झाला आहे. गावखेड्यातील पर्यावरण संवर्धनासाठी देखील प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.