Residue Free Produce : ‘रेसिड्यू फ्री’ शेतीमाल क्षेत्रातील ‘भुदरगड’

Residue Free Agriculture Product : पुणे जिल्ह्यातील भिवरी (ता. पुरंदर) येथील ‘भुदरगड नॅचरल फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी’ने रासायनिक अवशेषमुक्त (रेसिड्यू फ्री) शेतीमालाचे उत्पादन हे मुख्य उद्दिष्ट ठेवले आहे.
Agriculture Product
Agriculture ProductAgrowon

गणेश कोरे

Natural Farmers Producer Company : रासायनिक अवशेषमुक्त (रेसिड्यू फ्री) शेतीमालाला अलीकडील काळात मोठे महत्त्व आले आहे. त्याची बाजारपेठही जगभरात व देशात विस्तारत आहे. अशावेळी पुणे जिल्ह्यातील भिवरी (ता. पुरंदर) येथील ‘भुदरगड नॅचरल फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी’ने देखील हेच प्रमुख उद्दिष्ट ठेवून त्यानुसार कंपनीचे कामकाज, व्यूहरचना व वाटचाल सुरू केली आहे. शेतकऱ्यांना एकत्र आणून लागवडीपासून ते विक्री व निर्यातीसाठी पायाभूत सुविधा व मार्गदर्शन यंत्रणा उभारण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.

सन २०१९ मध्ये कंपनीची स्थापना केली. मूळ भुदरगड (जि, कोल्हापूर) येथील व सध्या पुणे स्थित बाळासाहेब सोळांकुरे पाटील हे कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. कंपनीचे पाच संचालक व ४०५ सभासद आहेत. सभासदांमध्ये पुणे भागातील ७० टक्के व कोल्हापूर व अन्य भागांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे.

उच्चशिक्षितांची कंपनी

कृषी किंवा विज्ञान क्षेत्रातील पदवी- पदव्युत्तर वा उच्चशिक्षितांची संख्या हे वैशिष्ट्य कंपनीने जपले आहे. त्याचबरोबर शशिकांत भोर, लहू पोमण असे प्रगतिशील व अभ्यासू शेतकरी कंपनीत आहेत. कंपनीची धुरा महिला संचालकांवर जास्त देण्यात आली आहे.

यामध्ये स्नेहल कारकर या रसायन व कृषी विषयातील द्विपदवीधर आहेत. कोमल कोंडे यांनी कृषी व्यवसाय व्यवस्थापनातील पदवी (बीएस्सी-ॲग्री एमबीए) घेतली आहेत. प्रियांका नाईक कॉमर्सच्या विषयातील द्विपदवीधर आहेत.

Agriculture Product
Kolhapur Police : चक्काजाम आंदोलन प्रकरण, राजू शेट्टींसह 2 ते 2500 जणांवर गुन्हा दाखल

पीकनिहाय गट

भुदरगड कंपनीच्या वतीने रसायनमुक्त आणि निर्यातक्षम फळे आणि भाजीपाला उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहेत. त्यासाठी पीकनिहाय प्रत्येकी ३० शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये अंजीर, डाळिंब, केळी, पेरू आणि द्राक्ष, सीताफळ आदींचा समावेश आहे.

यातील शेतकऱ्यांना सक्षम केल्यानंतर गाव व क्लस्टरनिहाय गट तयार केले जातील. कंपनीचे अध्यक्ष स्वतः पुढाकार घेऊन सभासदांना सेंद्रिय शेती व प्रमाणीकरणासाठी विविध तज्ज्ञांकरवी मार्गदर्शन देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

उभारले थेट विक्रीचे जाळे

कंपनीने राज्यातील विविध भागांतील प्रगतिशील शेतकऱ्यांना सभासद करून घेतले आहे. कंपनीचे तज्ज्ञ शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन मार्गदर्शन करतात. कोरोना काळात सभासद शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल कंपनीने पुणे व मुंबई येथील निवासी सोसायट्यांना थेट विकला. त्यातून नऊ लाखांची उलाढाल केली.

यामध्ये महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या शेतकरी ते ग्राहक विक्री व्यवस्थेची मदत झाली. याच महामंडळाची ‘कॉपशॉप’ योजना आता कोरोनोनंनतर थांबली असली, तरी राजयोग सोसायटी, वडगाव धायरी, पुणे येथे मागणीनुसार ग्राहकांना काही माल थेट विकण्यात येतो. कृषी विभाग, हवेली यांच्या माध्यमातून ‘विकेल ते पिकेल’ या योजनेच्या माध्यमातूनही सभासदांचा माल सोसायट्यांमधून चांगल्या दराने विकला जात आहे.

गोदाम, प्रतवारी व विक्री यंत्रणा

ग्राहकांना चांगल्या प्रतीचे, निवडलेले असे रसायन अवशेषमुक्त धान्य, भाजीपाला, फळे, प्रक्रिया केलेला शेतीमाल देण्यासाठी कंपनीने यंत्रणा वा शृंखला उभारली आहे. त्यासाठी कुंजीरवाडी आणि खेड शिवापूर (ता. हवेली, जि. पुणे) येथे भाडेतत्त्वावर गोदामे घेतली आहेत. त्या ठिकाणी सभासद आणि बिगर सभासदांकडून घेतलेल्या विशेषतः भरडधान्यांची (मिलेट्‍स) स्वच्छता, प्रतवारी व पॅकिंग होते. स्थानिक महिला बचत गटाची मदत त्यासाठी घेण्यात येते. नाचणी, ज्वारी व बाजरी आदी मिलेटसची निवासी सोसायट्यांना वार्षिक १९ लाख रुपयांची थेट विक्री यंदा केली.

बाळासाहेब सोळांकुरे-पाटील,

७५५८३०४३१७ ९९२२२०४३१७

Agriculture Product
Residue Free Milk : ‘रेसिड्यू फ्री’ दुधाचे आता होणार उत्पादन

कृषी पर्यटनाची देखील मार्गदर्शन

कृषिपूरक अशा कृषी पर्यटन विकासासाठीही कंपनीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळासाठी त्यांनी या विषयात यापूर्वी शेतकरी व शेतकरी कंपन्यांसाठी मार्गदर्शन प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत. कृषी पर्यटन संस्था उभारणीसाठीही प्रशिक्षणाच्या अनुषंगाने प्रशिक्षण त्यांनी दिले आहे.

सन्मान

अहिल्यादेवी कृषी संशोधन संस्थेचा २०१९ चा कृषिभूषण पुरस्कार त्यांना मिळाला आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, मुंबईतर्फे आंतरराष्ट्रीय ‘फूड फेस्टिव्हल’ (दुबई) येथे २०२० मध्ये विशेष गौरव पुरस्कार त्यांना लाभला आहे. कृषी क्षेत्रातील उद्योजक, शेतकरी कंपन्यांना दुबई, टर्की, इंडोनेशिया, मॉरिशस येथे विक्री व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. कंपनीतर्फे मलेशिया येथील ‘फूड फेस्टिव्हल’मध्ये ही भाग घेण्यात आला आहे.

निर्यात सुविधा केंद्राची उभारणी

भिवरी (ता. पुरंदर), जि.पुणे येथे स्मार्ट प्रकल्पांतर्गत एक कोटी ६० लाख रुपयांच्या निधीतून ३० टन क्षमतेचे पॅकहाउस, सहा टन क्षमतेचे प्रीकूलिंग, ५० टन क्षमतेचे कोल्ड स्टोअरेज अशा सुविधा असलेले निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात येत आहे. त्याचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. ‘स्मार्ट’अंतर्गत ५३ लाख रुपयांचे अनुदान, तर बॅक ऑफ महाराष्ट्रद्वारे २० लाखांचे ‘एआयएफ’ योजनेअंतर्गत कर्ज घेण्यात आले आहे.

काही निधी सभासदांच्या ‘शेअर्स’द्वारे उभारण्यात आला आहे. दोन निर्यातदार कंपन्यांसोबत करार केले आहे. त्या माध्यमातून दुबई मलेशिया सिंगापूर या देशांत थोड्या प्रमाणात भेंडी, तोंडली, शेवगा, अंजीर व आंबा आदी मालाची विमानमार्गे चार वर्षांपासून निर्यात सुरू आहे. महिन्याला प्रत्येकी १३०० किलोच्या दोन निर्यातवाऱ्या होतात. हे सुविधा केंद्र सौरऊर्जेवर संचलित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ए ग्रेड मालाच्या निर्यातीसह अन्य मालाची प्रक्रिया करण्याचा कंपनीचा हेतू आहे. दुबई येथे निर्यातीसाठी विद्या चोरगे- थिटे यांचे सहकार्य आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com