Mother Of Books
Mother Of Books Agrowon

Mother Of Books : वाचनवेड लावणारी ‘भीमाई’ झाली ‘पुस्तकांची आई’

Books Reading Movement : जेवण व वाचन अशी सवय ग्राहकांना जडली. त्यातूनच ७३ वर्षांची ‘भीमाई’ आता ‘पुस्तकांची आई’ म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

जऊळके दिंडोरी (ता. दिंडोरी, िज. नाशिक) येथील भीमाबाई जोंधळे यांनी हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना वाचनाची गोडी लागावी म्हणून विविध पुस्तके टेबलावर मांडली. जेवण व वाचन अशी सवय ग्राहकांना जडली. त्यातूनच ७३ वर्षांची ‘भीमाई’ आता ‘पुस्तकांची आई’ म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

भीमाईच्या माहेरी एकत्रित मोठे कुटुंब होतं. पाचवीपर्यंत तिचं शिक्षण झालं. ११ व्या वर्षी लग्न झाले. मुलंबाळ झाली; मात्र कुटुंबात पती व भाऊबंदकीचा त्रास वाट्याला आला. पती व्यसनी असल्याने शेती गेली. अवघी दोन एकर शेती उरली. त्यामध्ये द्राक्ष बाग होती. बाग बहरली असतानाच रसायन मिश्रित पाणी गेल्याने बाग जळून गेली. नुकसान होण्याला कारणीभूत असलेल्या कंपनीविरोधात ‘तिने’ लढा उभारला. अपयश वाट्याला आले; पण भीमाई खचली नाही.

Mother Of Books
Reading Skill : वाचाल तर वाचाल, शिकाल तरच टिकाल

आपल्या आईच्या संघर्षाचा वारसा मुलगा प्रवीणने याने जपला. दहावीपासूनच तो पेपर वाटायचा. पुढे मुलगा पदवीधर झाला. २००६ मध्ये त्याचा विवाह प्रीती हिच्याशी झाला. उत्पन्नाचे स्रोत कमी असल्याने भीमाबाई (भीमाई) यांनी ओझर मिग येथील दहावा मैल परिसरात मुंबई आग्रा महामार्गालगत ३० डिसेंबर २०१० मध्ये चहाची टपरी सुरू केली. पुढे पैसे जमवून २०१५ मध्ये ‘रिलॅक्स कॉर्नर’ नावाने छोटाशी शाकाहारी खाणावळ सुरू केली.

त्या वेळी ग्राहक मोबाइल खेळत बसायचे. ही सवय बदलण्यासाठी त्यांनी मुलाला भेट मिळालेली पुस्तके हॉटेलमध्ये टेबलवर मांडली. त्यामुळे ग्राहक मोबाइल बाजूला ठेवून पुस्तके चाळू लागली, तर काही वाचनात हरवू लागली. हे वाचन वेड पाहून हॉटेलच्या भिंती कवितांनी रंगल्या. पुस्तकांचा संग्रह वाढत जाऊन हजारो पुस्तकांनी हॉटेल भरले. त्यामुळे भेट देणाऱ्या लोकांनीच या हॉटेलचं नामकरण ‘पुस्तकांचे हॉटेल’ असे केले, असं भीमाबाई सांगतात.

पहाटे ४ वाजेपासून त्यांचा दिनक्रम सुरू होतो. मुलगा वर्तमानपत्र वितरणाचे काम करतो. तर भीमाबाई व सूनबाई प्रीती हॉटेलची जबाबदारी पाहतात. यापूर्वी नोटाबंदी झाली, तेव्हा अनेकांकडे पैसे नसायचे, त्या वेळीही ‘लेकरांनो खाऊन जा, पैसे कधीही द्या’ असे त्या सांगायच्या.

कोरोना संकटकाळातही त्यांचा सेवाभाव अनेकांनी अनुभवला. त्यामुळे भुकेल्यांसाठी ‘अन्नपूर्णा’ म्हणूनही भीमाबाई यांची ओळख आहे. थकल्या भुकेल्याची सेवा केली, म्हणूनच देवाने मला आतापर्यंत डॉक्टरांकडे जाऊ दिलं नाही, असेही भीमाबाई अभिमानाने सांगतात. आता त्यांनी हॉटेलच्या बाजूला एक छोटीशी आमराईसुद्धा फुलवली आहे. सावित्रीबाई शिकली म्हणून मी शिकले असे त्या अभिमानाने सांगतात.

Mother Of Books
Reading Movement : वाचन चळवळ : कृतियुक्त अनुभव

साहित्यवेड्या कुटुंबाचे असेही साहित्य प्रेम

हॉटेलमध्ये कथा, कादंबऱ्या व कवितासंग्रह, विविध दिवाळी अंक पाहायला मिळतात. साहित्यिकांचा सन्मान व्हावा व साहित्यिक संदर्भ उजळून निघावे या अर्थाने भीमाबाई यांनी फुलवलेल्या बागेला ‘अक्षरबाग’ हे नाव कुसुमाग्रज यांच्या कविता संग्रहावरून देण्यात आले आहे. विं. दा. करंदीकर यांच्या ‘मृदंग’ या कवितासंग्रहाच्या नावाने वाचनकट्टा येथे सुरू करण्यात आला आहे.

तर तसेच वि. स. खांडेकर यांच्या ‘अमृतवेल’ या कादंबरीच्या नावाने पुस्तकदालन येथे खुले करण्यात आले आहे. वाचन चळवळीच्या कार्याची दखल घेऊन भीमाबाई जोंधळे यांना ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ सन्मान’ हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर राष्ट्रीय व राज्यस्तरावरील ५२ पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. अनेक वाचक, ग्राहक येतात, भेटी देतात. त्यांची सही घेऊन सोबत फोटो काढतात, हे सर्व वाचन आणि पुस्तकांमुळे घडू शकले, असे त्या आवर्जून सांगतात.

भीमाबाई जोंधळे ९९२२९४६६२२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com