
डॉ. शंभू प्रसाद, शिरीष जोशी
आजवरच्या अनुभवांवरून असे दिसून येते, की अमूल किंवा राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी) यांनी सत्तरच्या दशकात स्थापन केलेल्या जिल्हा दुग्ध उत्पादक कंपन्यांप्रमाणे किंवा ‘सह्याद्री’सारख्या एफपीओंनी ज्या प्रकारे बाजारपेठेशी संबंध जोडले आहेत असे संबंध सर्व एफपीओ (शेतकरी उत्पादक संघटना) तयार करू शकत नाहीत.
जरी पहिल्या प्रकारच्या एफपीओ बियाण्यांपासून प्राथमिक प्रक्रियेपर्यंत चांगले काम करत असल्या आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनाला ‘बाजारासाठी तयार’ करत असल्या तरीही लहान एफपीओंकडून शेतीमाल खरेदी करून मूल्य साखळीत वरच्या स्तरावर जाऊ शकतील अशा दुसऱ्या प्रकारच्या एफपीओंची देखील गरज असते.
खासगी क्षेत्रातील अनेक खरेदीदार बाजारपेठेत असतील तर त्यांच्यामधील स्पर्धा पहिल्या प्रकारच्या एफपीओंमधील शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळवून देऊ शकते. ‘कृषिधन’सारख्या काही एफपीओंनी अनेक बचत गटांना एकत्र केले आहे. ही प्रक्रिया त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये केली आहे. या प्रक्रियेला अनेक वर्षे लागतात.
त्याच प्रमाणे, राम रहीमसारख्या एफपीओने स्वतःला सेफ हार्वेस्ट या कंपनीशी जोडले आहे. बंगळूरमधील ही कंपनी ग्राहकांना रासायनिक कीटकनाशके नसलेला शेतीमाल पुरवते. आणि त्यासाठीचा शेतीमाल ही कंपनी लहान शेतकऱ्यांकडून खरेदी करते.
राम रहीम या एफपीओने आपल्या लहान शेतकऱ्यांना अशा प्रकारे बचत गटांच्या एकत्रीकरणातून सेफ हार्वेस्ट कंपनीसाठी उत्पादन निर्माण करण्यात यश मिळवले आहे. प्रकार एकच्या एफपीओ स्वतःला प्रकार दोनच्या एफपीओमध्ये रूपांतरित करू शकतात. पण त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न लागतात आणि गुंवणुकीची देखील गरज असते. या प्रक्रियेसाठी लागणारी इकोसिस्टिम आज तरी उपलब्ध नाही.
त्यामुळे प्रकार एकच्या एफपीओंना आधार देण्यासाठी प्रकार दोनच्या एफपीओ तयार करण्याची गरज अपरिहार्य आहे. सामान्यतः प्रकार एकच्या एफपीओमधील शेतकऱ्यांच्या उत्पादनात धान्य, फळे, भाज्या, नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोड्यूस (NTFP) म्हणजे वनोपज, परसातील पोल्ट्री/ शेळीपालन/ डेअरी आणि कापूससारख्या पिकांचे मिश्रण असू शकते.
काही वस्तू उदाहरणार्थ, महुआची फुले, जी जवळच्या प्रदेशात विकली आणि वापरली जातात, त्यांना मोठ्या प्रमाणात एकत्रीकरण किंवा प्रक्रियेची आवश्यकता नसू शकते. तथापि, इतर उत्पादनांवर प्रक्रिया करून मूल्य साखळीत वर जाण्याची संधी आहे. आणि यासाठी मालावर प्रक्रिया करणे, जास्त जोखीम स्वीकारणे आणि फक्त दूरच्या शहरी बाजारपेठांपर्यंतच नाही तर अगदी निर्यातीपर्यंत पोहोचणे देखील आवश्यक ठरू शकते.
एकमेव आदर्श मॉडेल नाही
गुजरातमधील जगप्रसिद्ध अमूल मॉडेल हे गावातील डेअरी सहकारी संस्था, जिल्हा दूध संघ आणि दूध संघांच्या शिखर बाजार संघटना यांच्या साखळीवर आधारित आहे. हे मॉडेल अनेक उत्पादकांना एका खरेदीदाराशी म्हणजे अमूलशी जोडणारे आहे. पण असे मॉडेल दुधासारख्या वर्षभर नियमित निर्मिती होणाऱ्या उत्पादनासाठी योग्य ठरू शकते.
पण वर्षातील केवळ काही काळातच होणाऱ्या हंगामी उत्पादनांसाठी ते मॉडेल सोयीचे नाही. धान्य, भाजीपाला, फळे असे हंगामी उत्पादन असलेल्या प्रकार दोनच्या एफपीओंसाठी हे अमूल मॉडेल अजिबात उपयोगी नाही. या एफपीओंचे काम वेगळ्या प्रकारे चालते. इथे प्रकार एकच्या संस्थेला प्रकार दोनच्या अनेक एफपीओंशी व्यवहार करावा लागू शकतो.
दुसरीकडे, सेफ हार्वेस्टसारख्या संस्थेला त्यांच्या मुख्य उत्पादनांच्या खात्रीशीर पुरवठ्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकार एकच्या एफपीओंकडून खरेदी करावी लागू शकते. त्यामुळे अमूलच्या मॉडेलमधील ‘अनेक ते एक’ असा येथील संबंध नसेल. इथे प्रकार एकचे एफपीओ आणि प्रकार दोनच्या एफपीओमधील संबंध ‘अनेक ते अनेक’ असे असतील.
संभाव्य पर्यायी मॉडेल
अमूल मॉडेलपेक्षा वेगळे असलेले हे मॉडेल यशस्वी होण्यासाठी असलेली पूर्वअट म्हणजे या मॉडेलमधील पहिल्या आणि दुसऱ्या या दोन्ही प्रकारच्या एफपीओ स्वतंत्रपणे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असणे गरजेचे आहे. यातील गृहीतक असे आहे की कोरडवाहू क्षेत्रातील प्रत्येक पिकाचे प्रति शेतकरी उत्पादन कमी असते, कारण प्रत्येक शेतकरी आपल्या नुकसानीची जोखीम कमी करण्यासाठी आपल्या शेतात विविध पिके घेतो. आणि म्हणून एका उत्पादनाचे पुरेसे उत्पादन मिळवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांशी जोडले जाणे आवश्यक असते. शेतकऱ्यांची संख्या वाढायची असेल तर अर्थातच पहिल्या प्रकारच्या एफपीओंची संख्या वाढवावी लागेल.
दुसऱ्या प्रकारच्या एफपीओंशी जोडल्या गेलेल्या पहिल्या प्रकारच्या एफपीओंची संख्या पुरेशी मोठी असेल तरच विविध पिके घेण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरू शकते. कारण तसे झाले तरच प्रकार दोनच्या एफपीओंकडे किफायतशीर ठरण्यासाठीचा पुरेसा शेतीमाल असू शकतो. साधारणपणे पहिल्या प्रकारच्या चारशे ते पाचशे एफपीओ दुसऱ्या प्रकारच्या फक्त दोन ते चार एफपीओंशी जोडल्या गेलेल्या असाव्या लागतील. अर्थात उत्पादनाचा प्रकार आणि इतर घटकानुसार या प्रमाणात काही बदल असू शकतो.
हे धोके टाळावेत
प्रकार दोनच्या एफपींओनी आपल्यासाठी नेमके व्यवहार्य व्यवसाय मॉडेल कोणते हे ओळखणे आवश्यक आहे. त्यांनी बाजारातील काही मोठ्या यशस्वी कंपन्या कोणते व्यवसाय मॉडेल निवडतात याच अभ्यास केला पाहिजे. उदाहरणार्थ प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल, आयटीसीसारख्या मोठ्या कंपन्या फक्त स्वतःची उत्पादने विकण्यासाठी दुकाने उघडत नाहीत. अमूलने तसा प्रयत्न केला. अशा दुकानात फक्त अमूलची उत्पादने विकली जातात. पतंजलीने देखील असे केले आहे. पण अमूल किंवा पतंजली या दोघांनाही यात फारसे यश मिळालेले नाही. दुकानात येणाऱ्या ग्राहकांना वेगवेगळ्या ब्रॅण्डची वेगवेगळी उतपादने हवी असतात. म्हणून प्रकार दोनच्या एफपीओंनी फक्त स्वतःच्याच ब्रॅण्डची उत्पादने विकण्यासाठी दुकाने उघडण्यापूर्वी हजारदा विचार करायला हवा.
त्याचप्रमाणे, प्रकार दोनच्या एफपीओंनी आपाल्याकडे पुरेशा मोठ्या प्रमाणात माल आणि वैविध्य नसताना स्वतःच मालाचे वितरण करणे टाळले पाहिजे. उत्पादन ते ग्राहकापर्यंत त्याचे वितरण या मूल्यवऱ्याधन साखळीतील जास्तीत जास्त मूल्य आपल्याकडून झाले तरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते असे जरी शेतकरी कंपन्यांना वाटत असले तरी तसे करणे व्यवहाऱ्याय नसते. कारण या मूल्यवर्धन साखळीतील इतर घटकांमुळे विविधता आणि क्षमताही वाढते. एफपीओंनी आपले व्यवसाय मॉडेल निवडताना त्यातील तुलनात्मक फायदा आणि व्यवस्थापनातली गुंतागुंत लक्षात घेणे आवश्यक आहे.
काही दशकांपूर्वी जेव्हा पिशव्यांमधून दूध विकण्याची कल्पना अजून नवीन होती तेव्हा ती कल्पना वापरून छोट्या शहरात डेअरी व्यवसाय करण्यात एक प्रसिद्ध स्वयंसेवी संस्था खूप यशस्वी झाली होती. पण मोठ्या शहरात दूध विक्रीचा असा प्रयत्न सपशेल फसला. त्यात त्या संस्थेला मोठा तोटा झाला. याचे कारण या मोठया शहरात आधीच दुधाचे चाळीस ब्रॅण्ड प्रस्थापित झाले होते.
आणि त्यांच्या स्पर्धेत टिकणे या संस्थेला शक्य झाले नाही. आपण हे विसरतो, की अमूलचे आगमन आर्थिक उदारीकरणापूर्वीच्या भारताच्या अजून पूर्ण विकसित न झालेल्या बाजारात झालेले होते. अमूलला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खासगी कंपन्यांच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागले नाही. एफपीओंना आपल्यापासून दूरच्या बाजारातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या आपल्या स्वप्नांना आळा देखील घालता आला पाहिजे कारण ते स्वप्न नेहमी व्यवहारात उतरेलच असे नाही.
व्यवहाऱ्याय मॉडेल्सचा शोध
एफपीओंनी ठरवलेल्या व्यवसाय मॉडेल्सचे कठोर परीक्षण करण्याची गरज आहे. अशा मॉडेल्सवर आधारित एफपीओ वर्षानुवर्षे कार्यरत असल्या तरी त्याचा अर्थ त्या जशाच्या तशा इतर संदर्भात देखील यशस्वी ठरतील असे नाही. अशा वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या एफपीओंचा बारकाईने केलेला अभ्यास या मॉडेलचे दुसऱ्या मॉडेलच्या तुलनेत नेमके काय फायदे आहेत हे समोर आणेल. आणि हे मॉडेल खरोखरच वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या संदऱ्याभात पुनरावृत्ती करण्यायोग्य आहेत का हे ठरवता येईल.
एका संदर्भात यशस्वी झालेले मॉडेल इतर संदर्भांत जसेच्या तसे लागू पडेलच असे नाही. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातले सह्याद्री या एफपीओचे उदाहरण घेता येईल. ही एफपीओ फळे, भाज्या अशा जास्त मूल्य असलेल्या शेतीमालाचे करारानुसार उत्पादन शेतकऱ्यांकडून करून घेते, त्यावर प्रक्रिया करते आणि त्याची निर्यातदेखील करते. प्रगत देशात निर्यात करण्यासाठी पाळावयाचे निकष, अटी या अतिशय काटेकोरपणे पाळायच्या असतात. आणि सह्याद्रीने ते कौशल्य प्राप्त केले आहे. त्यांनी द्राक्षाच्या साठवणूक, प्रक्रिया यासाठी ज्या साधन सुविधा (कोल्ड स्टोअरेज आणि इतर उपकरणे, यंत्रे) निर्माण केल्या, त्याचा वापर त्यांनी वर्षभर उत्पादन होणाऱ्या फळे आणि अपारंपरिक भाज्यांवरील प्रक्रियेसाठी केला.
याउलट सरकारला जो शेतीमाल शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी करायचा असतो त्या शेतीमालाची सरकारसाठी खरेदी करणारी एजन्सी म्हणून काही एफपीओ फेडरेशनने अतिशय चांगले काम करत आहेत. या त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन त्यांनी सरकारच्या कल्याणकारी योजनांसाठी पुरवठादार म्हणून उभे राहण्यासाठी त्यांना खरेदी, साठवणूक आणि प्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले पाहिजे.
या पुढचा टप्पा असा असू शकतो की या एफपीओ मोठया खासगी कंपन्यांसाठी शेतकऱ्यांकडून शेतीमालाची खरेदी करतील. सेफ हार्वेस्ट सारख्या एफपीओंना मदतरूप ठरत आलेल्या कंपन्या या प्रक्रियेत मोठी भूमिका बजावू शकतात. म्हणजे अशा एफपीओंचे आदर्श मॉडेल हे सह्याद्री असू शकत नाही. प्रोत्साहन मिळाले तर सर्व एफपीओ या सह्याद्री किंवा राम रहीमसारख्या एफपीओप्रमाणे बाजारात प्रगती करतील ही भाबडी आशा सोडून देण्याची गरज आहे.
व्यवसाय मॉडेलच्या पलीकडील घटक
बाजारपेठेशी थेट संबंध येणाऱ्या दुसऱ्या प्रकारच्या एफपीओंची भूमिका शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ध्येय साधण्यासाठी महत्त्वाची आहे. केवळ शेतीमालाचे एकत्रीकरण करणे आणि कॉर्पोरेट्सना त्याची विक्री केल्याने एफपीओ किंवा शेतकऱ्यांना मदत होणार नाही. खरे तर दुसऱ्या प्रकारच्या एफपीओ बाजारपेठेला जास्त स्पर्धाशील करू शकतात. आणि त्यासाठी सरकारची मदत विविध प्रकारची असू शकते. उदाहरणार्थ राइस मिल स्थापन करणे, फळांचा गर (पल्प) बनवणे किंवा अन्न प्रक्रियासारखे युनिट उभारणे अशा स्वरूपात ती मदत असू शकते. एफपीओ आणि सरकार यांच्या संयुक्त उपक्रमांच्या नवीन मॉडेल्सचा सक्रिय शोध घेणे देखील यासाठी उपयुक्त ठरू शकते. असे उत्पादन युनिट्स दुसऱ्या प्रकारच्या एफपीओंसाठी तसेच बाजारातील खासगी कंपन्यांसाठी उत्पादन करू शकतात. काही वेळेस जर एफपीओंनी आपल्या मालावरील प्रक्रियेचे आउटसोर्सिंग केले, म्हणजे ते काम दुसऱ्यांकडून करून घेतले तर अशा एफपीओ जास्त लवचिक आणि स्पर्धाशील बनू शकतात.
देशात दहा हजार एफपीओ तयार झाल्या पाहिजेत, या उद्देशाने जी योजना तयार झाली आहेत त्या योजनेत दुर्दैवाने प्रकार दोनच्या एफपीओंचा समावेशच नाही. आणि एफपीओच्या फेडरेशनसाठी कोणती शासकीय मदत देखील मिळत नाही. दुसऱ्या प्रकारच्या एफपीओंना प्रोत्साहन मिळण्यासाठी शासनाच्या निधीची आणि विशिष्ट योजनांची गरज आहे. त्याची जुजबी मांडणी या लेखात केली आहे. ही लेखमाला ज्या रिव्हायटलायजिंग रेनफेड अॅग्रिल्कचर नेटवर्कच्या अहवालावर आधारित आहे, त्यामध्ये याची सविस्तर मांडणी केलेली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.