FPO Challenges India : शेतकरी उत्पादक संस्थांसाठी एक नवीन दृष्टिकोन

Dryland Farming Model : एफपीओंनी अमूलच्या धर्तीवर कडधान्य आणि इतर पिकांसाठी आपली संरचना उभी करावी असे या क्षेत्रात वारंवार मांडले जाते. पण खरे तर हे लक्षात घेणे आवश्यक आहे की कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या एफपीओंसमोर काही खास अशी आव्हाने असतात.
FPO Maharashtra
FPO MaharashtraAgrowon
Published on
Updated on

शिरीष जोशी, डॉ. शंभु प्रसाद

भारतातील शेती लहान तुकड्यात होते. त्यामुळे तिचे उत्पादन किफायतशीरपणे होत नाही. शेतकरी एकत्र आले आणि नेमके कोणते उत्पादन करायचे हे ठरवून शेती करू लागले तर त्यांना काही प्रमाणात बाजारातील किमतीदेखील ठरवता येतील, शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा घाऊकपणे स्वस्तात खरेदी करता येतील, शेतकऱ्यांचे असे संघटन प्रक्रिया उद्योग देखील उभारू शकतील आणि मग या मूल्यवर्धनातील (व्हॅल्यू एडिशन) जास्त भाग स्वतःकडे ठेवू शकतील असे अनेक दशके बोलले गेले आहे.

अलीकडच्या काळात यासाठी चर्चेत आलेले मॉडेल म्हणजे शेतकरी उत्पादक संस्था (फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन). यांना एफपीओ म्हणून ओळखले जाते. एफपीओ या सहकारी संस्था असतील किंवा कंपन्या देखील असू शकतील. एफीपीओंच्या स्थापनेसाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी सरकारने योजनाही आखल्या आहेत.

देशातील एफपीओंच्या स्थितीवर प्रकाश टाकणारे अनेक अभ्यास अलीकडच्या काळात प्रकाशित झाले आहेत. या अभ्यासानुसार काही अपवाद वगळता बहुतेक एफपीओ या अयशस्वी झालेल्या दिसतात. अनेक एफपीओंच्या आर्थिक उलाढालीत फारशी वाढ झालेली दिसत नाही. जी काही थोडी यशस्वी उदाहरणे आहेत ती बहुतेक बागायती क्षेत्रांतील आहेत किंवा दुधाच्या क्षेत्रातील उदाहरणे राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ (NDDB) यासारख्या संस्थांच्या पाठिंब्यामुळे यशस्वी ठरली आहेत.

दूध, मांस, मासे यासारख्या वर्षभर उत्पादित होणाऱ्या उत्पादनांवर आधारित एफपीओ आणि धान्य, फळे आणि नॉन-टिंबर फॉरेस्ट प्रोड्यूस (NTFP) म्हणजेच वनोपज यासारख्या हंगामी उत्पादनांवर आधारित एफपीओ यांच्या यशापयशाची चिकित्सा करणारी आकडेवारी सध्या उपलब्ध नाही.

एफपीओंनी अमूलच्या धर्तीवर कडधान्य आणि इतर पिकांसाठी आपली संरचना उभी करावी असे या क्षेत्रात वारंवार मांडले जाते. पण खरे तर हे लक्षात घेणे आवश्यक आहे की कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या एफपीओंसमोर काही खास अशी आव्हाने असतात. ती लक्षात न घेता केलेल्या शिफारशी आणि ठेवलेले आदर्श हे दिशाभूल करणारे ठरू शकतात.

कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या एफपीओंसाठी पर्यायी व्यवसाय मॉडेल्सची आवश्यकता का आहे?

कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या एफपीओंना या शेतीच्या खास अशा वैविध्यपूर्ण आणि कमालीची आर्थिक जोखीम असलेल्या स्वरूपावर मात करणे सहजासहजी शक्य नाही. आणि म्हणून त्यांचे व्यवसाय मॉडेल देखील वेगळे असणे स्वाभाविक आहे. याची नेमकी करणे खालीलप्रमाणे ः

1.उत्पादनाचे हंगामी स्वरूप आणि उत्पादनातील अस्थिरता

धान्यासारख्या हंगामी उत्पादनांची कापणी काही विशिष्ट महिन्यांतच केली जाते. त्यामुळे या महिन्यात विक्रीसाठी मालाची उपलब्धता मोठी असते. दुधासारख्या पदार्थांचे उत्पादन जसे वर्षभर नियमितपणे होते, तसे या उत्पादनांचे नसते. आणि शेतकऱ्याला पैशाची निकड असते. कारण खते , बियाणे यासारख्या गोष्टी त्यांनी उधारीवर घेतलेल्या असतात. हे कर्ज त्यांना फेडायचे असते. त्यामुळे मिळेल त्या किमतीला त्यांना माल विकायची घाई असते. पण जरी शेतकरी हे उत्पादन हप्त्यांमध्ये विकायला तयार असले तरी त्यांच्या साठवणुकीची सोय असणे गरजचे असते. तसेच खेळत्या भांडवलाची देखील गरज असते.

FPO Maharashtra
FPO Conference : व्यावसायिक विस्तार, मूल्यसाखळीतून ‘एफपीओं’ची प्रगती शक्य

2. तंत्रज्ञान आणि उत्पादनातील चढउतार

दूध, मांस आणि भाज्यांसारखी उत्पादने वर्षभर येत असतात. पण त्यातदेखील अस्थिरता असते. उदाहरणार्थ दुधासारख्या सतत उत्पादित होणाऱ्या उत्पादनांतील अस्थिरता व्यवस्थापनासाठी यशस्वी तांत्रिक हस्तक्षेप झाले आहेत. उदाहरणार्थ, हिवाळ्यात दुधाचे उत्पादन वाढते आणि उन्हाळ्यात कमी होते. पण यावर उपाय म्हणून जेव्हा दुधाचे उत्पादन जास्त होते तेव्हा काही दुधाचे पावडरमध्ये रूपांतर करणारे तंत्रज्ञान निर्माण झाले आहे.

आणि उन्हाळ्यात जेव्हा दुधाचे उत्पादन कमी होते तेव्हा उत्पादनातील ही तूट पावडरचे पुन्हा दुधात रूपांतर करून भरून काढण्यात येते. त्यामुळे दुधाच्या पुरवठ्यात सातत्य राखले जाते. अर्थात या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी भांडवलाची गुंतवणूक आवश्यक असते. दुधासारख्या वर्षभर होणाऱ्या उत्पादनातील अस्थिरता कमी करणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये भांडवली गुंतवणूक जशी झाली आहे तशी वर्षातील फक्त ठराविक काळातच उत्पादन होणाऱ्या कोरडवाहू शेतीतील उत्पादनासाठी झाली नाही.

३. पिकांचे वैविध्य

सिंचनावर अवलंबून असलेल्या शेतीपेक्षा पावसावर अवलंबून असलेल्या शेतीमध्ये पिकांचे वैविध्य जास्त असते. कारण, पाऊस अनियमित असल्यामुळे पिकांच्या नुकसानीचा धोका जास्त असतो. या धोक्याची तीव्रता कमी करण्यासाठी, शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतात. त्यांची पाण्याची गरज वेगवेगळी असते. तसेच त्यांची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वेगवेगळी असते.

ही विविधता एक प्रकारची आर्थिक सुरक्षितता पुरवते. जर पाऊस अपुरा झाला आणि एक-दोन पिके वाया गेली, तरी इतर पिके टिकून राहून काही प्रमाणात उत्पन्न शेतकऱ्याच्या हाती येते. परंतु ही विविधता धोके कमी करण्यासाठी आवश्यक असली तरी एफपीओच्या उभारणीपुढे ती अनेक आव्हाने उभी करते. पिकांचे वैविध्य जास्त असल्यामुळे प्रत्येक पिकाचे उत्पादन तुलनेने कमी असल्याने त्यांच्यावर प्रक्रिया आणि त्यांचा व्यापार करणे अधिक क्लिष्ट होते. प्रत्येक पिकाची स्वतःची वेगळी गरज असते. त्यामुळे गुंतागुंत आणि खर्च वाढतो.

FPO Maharashtra
FPO Policy : सर्वांच्या सूचनांतून होईल सर्वसमावेशक धोरण

आव्हान अपेक्षापूर्तीचे

लहान शेतकऱ्यांसाठी त्यांना एकत्र करणाऱ्या अशा एफपीओ हव्या आहेत; ज्या लहान शेतकऱ्यांच्या समस्यांची, त्यांच्या मतांची दखल घेतील. त्यांना आधार देतील. त्यामुळे उत्पादनांबद्दलच्या निर्णय प्रक्रियेत हे शेतकरी सहभागी होऊ शकतील. पण बऱ्याचदा एफपीओंवर अपेक्षांचे मोठे ओझे लादले गेलेले असते.

नफा कमावणे या उद्देश्याव्यवतिरिक्त सामाजिक बदलासाठी आवश्यक अशा अनेक गोष्टींची पूर्तता एफपीओंकडून व्हावी, अशी अपेक्षा केली जाते. या सगळ्यामुळे एफपीओ चालवणे खूप कठीण होते. आधीच एफपीओंकडे पुरेसा पैसा आणि मनुष्यबळ नसते. चांगले शिकलेले लोक कमी पगारामुळे मिळत नाहीत. त्यात या सामाजिक बदलाच्या अपेक्षापूर्तीची भर पडते.

अमूल मॉडेल आदर्श नाही

`अमूल`चे मॉडेल हे एफपीओसाठी आदर्श असे मॉडेल मानण्यात येते. अमूलमध्ये 'व्हर्टिकल इंटिग्रेशन ' आहे. याचा अर्थ असा की या मॉडेलमध्ये कच्च्या मालापासून ग्राहक ज्याचे सेवन करेल अशा अंतिम उत्पादनाच्या टप्प्यापर्यंतचे सर्व उत्पादन कंपनीच्या एका छताखाली होते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास म्हणजे कंपनी स्वतःच उत्पादनाचे सर्व काम करते, इतरांवर अवलंबून न राहता.

अमूल मॉडेलमध्ये, दुधाचे उत्पादन, प्रक्रिया , वितरण आणि विपणन (Marketing) सर्व काही एकाच संस्थेद्वारे केले जाते. या मॉडेलच्या यशासाठी उत्पादनाची क्षमता खूप मोठी असावी लागते. अशा एफपीओंच भांडवलाची गरजदेखील खूप मोठी असते. आणि कोरडवाहू शेतीमधील एफपीओ या गोष्टींची पूर्तता करू शकत नाहीत. आणि म्हणूनच अमूल फक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी काम करते. कोरडवाहू शेतीवर अवलंबून असणाऱ्या आणि विविध प्रकारचे शेतीमाल हाताळणाऱ्या एफपीओ अमूलच्या व्यवसाय मॉडेलप्रमाणे चालू शकत नाहीत.

पर्यायी मॉडेल्सचा शोध

पावसावर अवलंबून असलेल्या आणि विविध पिके घेणाऱ्या शेतीच्या समस्या लक्षात घेऊन आम्ही दोन प्रकारच्या एफपीओंची रचना सुचवत आहोत:

अमूलच्या पलीकडे जाऊन किमान दोन वेगवेगळ्या प्रकारच्या एफपीओंची कल्पना करणे आवश्यक आहे; ज्यांची जबाबदारी, व्यवसाय मॉडेल्स आणि संस्थात्मक रचना वेगळ्या असतील. या दोन प्रकारच्या एफपीओंसाठी संस्थात्मक रचना आणि मूल्यांकनाचे निकषही वेगळे असणे आवश्यक आहे.

पहिल्या प्रकारच्या एफपीओमध्ये ३०० ते १००० सदस्य असू शकतात (आदिवासी भागात ग्रामसभा तसे काम करू शकते). या एफपीओ बियाणे आणि इतर निविष्ठांचे उत्पादन किंवा घाऊक खरेदी करणे, शेती उपकरणे भाड्याने देणे, संबंधित पिकांच्या उत्पादन प्रक्रियांसाठी शेतीविस्तार कार्यक्रम आखणे (अॅग्री एक्स्टेन्शन ) अशी कामे करू शकतात.

या व्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी जैविक निविष्ठांची निर्मिती करण्यासाठी काही व्यक्तींना किंवा गटाला प्रोत्साहन देणे अशी देखील कामे करू शकतात. या शिवाय या एफपीओ शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादनांचे एकत्रीकरण करणे , त्या उत्पादनांच्या गुणवत्तेची तपासणी करणे आणि ग्रेडिंग, स्वच्छता, पॅकिंगसारख्या प्राथमिक प्रक्रिया करण्याची कामे करतील. त्यानंतर या एफपीओ हा माल मोठ्या खरेदीदारांकडे किंवा दुसऱ्या प्रकारच्या एफपीओकडे विकतील.

दुसऱ्या प्रकारच्या एफपीओ या पहिल्या प्रकारच्या एफपीओंकडून उत्पादने खरेदी करून, साठवून त्यावर प्रक्रिया करतील . त्यांचे ब्रॅण्डिंग करून, निर्यात करतील किंवा देशातच विकतील. ही विक्री या एफपीओ थेट ग्राहकांना करतील ( B to C ) तसेच दुसऱ्या घाऊक खरेदी करणाऱ्या कंपन्यांनाही विकतील ( B to B).

या संस्था मोठ्या एफपीओ किंवा फेडरेशन्स असू शकतात, तसेच Safe Harvest, Earthy N Green, Manyam grains यासारख्या सामाजिक उद्योजकांच्या संस्थाही असू शकतात.

या लेखमालिकेतील पुढील लेखात आपण कोरडवाहू शेतीतील एफपीओच्या वैशिष्ट्यांची तपशीलवार चर्चा करू.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com