डॉ. नागेश टेकाळेकृषी क्षेत्रात निसर्ग आणि विज्ञान यास जोडलेली किती तरी उदाहरणे आहेत. त्यातीलच एक सहज प्रत्यक्षात आणता येणारे उदाहरण म्हणजे सोयाबीनची शेती! ब्राझीलच्या शेतकऱ्याने सोयाबीन शेतात मधमाश्या सोडल्यानंतर त्यांना २० टक्के उत्पादनवाढ आढळून आली आहे..‘निसर्ग आणि विज्ञान’ हे दोन महत्त्वपूर्ण घटक एकमेकांत हात गुंफून एकत्र प्रवास करू लागले तरच या दोन्हींचा खऱ्या अर्थ आपणांस समजू शकतो. कृषी क्षेत्र हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. शेतामधील पिकांचे अवशेष शेतात तसेच ठेवून कुजविणे ही निसर्ग शेती झाली, तर हाच पालापाचोळा गोळा करून त्यास शास्त्रीय पद्धतीने कुजवून त्याचे खत करून पुन्हा ते त्याच शेताला देणे हे विज्ञान झाले. येथे निसर्ग आणि विज्ञान दोघेही एकत्र येतात. उभ्या पिकाला शेतातच पिकांचे अवशेष कुजवून त्यातील मूलद्रव्ये प्राप्त करण्यास उशीर लागतो, कधी हा कालावधी २ ते ३ वर्षांपर्यंतही लांबू शकतो..Soybean Market: सोयाबीनचे २९६ कोटींवर चुकारे अदा.मात्र, हीच कुजविण्याची प्रक्रिया विज्ञानाच्या साहाय्याने एका वर्षातच पूर्ण होते, उत्पादनात वाढही मिळते, जमिनीचा पोत सुधारतो आणि कर्ब सुद्धा वाढतो. भारतासारख्या वाढत्या लोकसंख्येच्या देशाकरता ‘मी फक्त निसर्ग शेतीच करणार’ असे म्हणून कसे चालेल, शेतही चांगले व्हावे, उत्पादनही वाढावे यासाठी कुठेतरी विज्ञानाचा हात धरणे अपेक्षित आहे. संपूर्ण शेत पाण्याने भिजवण्यापेक्षा पिकांच्या मुळांना आवश्यक तेवढेच पाणी देवून कृषी उत्पादन वाढते आणि पाण्याचीही बचत होते. इस्राईलमधील सर्व शेती या विज्ञानावरच आधारित आहे. ठिबक सिंचन ही याच राष्ट्राची जगाला दिलेली देणगी आहे..वृक्ष शेतीमध्ये सुद्धा त्या वृक्षाखाली पडलेली पाने व्यवस्थित कुजवून पुन्हा त्याच वृक्षास खत म्हणून देणे हे विज्ञान आहे. या खतात असलेली मूलद्रव्ये आणि तेथील जिवाणू त्या वृक्षास पुन्हा हवी असतात. कुठे तरी तयार असलेले सेंद्रिय खत त्या वृक्षास देण्यापेक्षा वृक्षाच्याच पाने, फुले, फळांचे खत त्या वृक्षास त्वरित लागू पडते हे विज्ञान आहे. कृषी क्षेत्रात निसर्ग आणि विज्ञान यास जोडलेली किती तरी उदाहरणे आहेत असेच एक सुंदर तेवढे प्रत्यक्षात सहज आणता येणारे एक उदाहरण म्हणजे सोयाबीनची शेती! यापूर्वी मी माझ्या लेखात अनेकदा म्हटले आहे की सोयाबीन हे गरीब शेतकऱ्यांचे, अल्पभूधारकांचे पीक नव्हे, कॅनडा, अमेरिका, ब्राझील, अर्जेटिना, पेरू या सारख्या राष्ट्रांत हे पीक शंभर ते हजार हेक्टरवर सहज घेतले जाते. पेरणी, काढणी यांत्रिक पद्धतीने, फवारणी ड्रोनद्वारे त्यामुळे तिकडचा शेतकरी प्रतिवर्षी सोयाबीनचे आपल्या पेक्षा अनेक पटीने अधिक उत्पादन सहज घेतो. योग्य वेळी पेरणी, फवारणी करून तेथील शेतकरी कायम उत्पादन वाढविण्याच्या प्रयत्नात असतात. या राष्ट्रांत सोयाबीन शेतीत कुठेही मजुरांचा सहभाग नाही..Soybean Market: सोयाबीन बाजारात अचानक तेजीची हवा.२० टक्के उत्पादनवाढसोयाबीन हे स्वपरागसिंचनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यामुळे सोयाबीन परागसिंचनासाठी कीटकांची आवश्यकता नाही. परंतु सोयाबीनचे फुललेले शेत हे मधमाश्यांसह इतरही परागसिंचक कीटकांसाठी महत्त्वाचे संसाधन म्हणून उपयुक्त ठरते. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन वाढल्याचे देखील काही दाखले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या सोयाबीन हंगामात ब्राझीलच्या मध्यवर्ती भागात एका शेतकऱ्याने निसर्ग आणि विज्ञान यांना बरोबर घेऊन एक नावीन्यपूर्ण उपक्रम करून त्याच्या सोयाबीनच्या उत्पादनात तब्बल २० टक्के वाढ नोंदविली..काय केले असेल या शेतकऱ्याने? त्याने त्याच्या २५० हेक्टर सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात फुलोरा आल्यानंतर तब्बल २५ दशलक्ष मशमाश्या सोडल्या. या मधमाश्या ‘ॲपिस मेलीफेरा’ या जातीच्या होत्या, ज्या परागसिंचनात सक्रिय आणि जास्त कार्यक्षम असतात. ब्राझीलमधील त्या शेतकऱ्यास मधमाश्या सोडल्यानंतर सोयाबीन उत्पादनात १० ते १२ टक्के वाढ अपेक्षित होती. मात्र, ती २० टक्केच्या जवळ पोहोचली. या मधमाश्या पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी जास्त फायदेमंद असतात हे कॉफी लागवडीमध्ये देखील सिद्ध झाले होते. त्यामुळे कॉफीचा स्वाद आणि उत्पादन वाढले होते. ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणात कॉफी निर्यात होते त्याला हे एक प्रकारचे विज्ञानाद्वारे मिळालेले प्रोत्साहनच होते..Soybean Market: मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादकांना मिळाला दिलासा.सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने या मधमाश्यांची पोळी भाड्याने आणली होती जी ‘अॅग्रोबी’ या कंपनीने दिली होती. या प्रयोगामुळे त्या शेतकऱ्याचे सोयाबीन उत्पादन फक्त २० टक्क्यांनी जास्त वाढले नसून त्यामध्ये प्रत्येक शेंगेत जास्त बिया तर वाढल्याच त्याचबरोबर त्यांचे वजनही वाढले, शिवाय कीडनाशकांवरचे अवलंबित्व कमी झाले. अॅग्रोबी कंपनीला शेकडो किलो सोयाबीनचा मध फुकट मिळाल हे वेगळेच! या प्रयोगातून असे सुद्धा सिद्ध होते की सोयाबीन हे साहाय्यक परागीकरणास लक्षणीय प्रतिसाद देते, प्रयोग किती साधा होता आणि तोही जेमतेम आठ दिवसांचा आणि कमी खर्चाचा! प्रयोग संपल्यावर ‘अॅग्रोबी’ कंपनी त्यांच्या सर्व मधमाश्यांना परत घेऊन गेली. थोडक्यात निसर्ग आणि विज्ञान एकत्र आल्यामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीनची उत्पादन क्षमता तर वाढलीच त्याचबरोबर शाश्वत शेतीचे हे नवीन मॉडेल जगासमोर आले. या प्रयोगातून सोयाबीन शेती निसर्ग प्रधान होती तर मधमाश्यांची निर्मिती त्यांच्या वाहतूक आणि त्यांचे परागसिंचन हे विज्ञानावर आधारित होते. हे दोघे एकत्र आले म्हणून उत्पादन वाढले..शेती ‘त्या’ करतातपूर्वी बांधावर कितीतरी झाडे असत, त्यावर मधमाश्यांची पोळी आनंदाने नांदत असत. माझ्या आजोबाच्या शेतात खरिपाला भुईमूग असे, प्रत्येक वेलीला चार ते पाच दाणे असलेल्या किती तरी शेंगा असत. मी आजोबांना विचारले, “हे कसे शक्य झाले? बियाणे दोघांचेही सारखेच असताना दोन वावर सोडून पलीकडच्या शेतात एक दोन बी असलेल्या शेंगाच झाडाला लागलेल्या असतात.’’ त्यावेळी आजोबांनी हसून बांधावरच्या लिंबाच्या झाडावरील मधमाश्यांच्या दोन मोठ्या पोळ्यांकडे बोट दाखवून म्हटले, ‘‘शेत मी करत नाही, त्या करतात.’’.केवढे हे विज्ञान जे ६५ वर्षांपूर्वी माझ्या आजोबाला माहीत होते, ते ब्राझीलच्या शेतकऱ्यास आता समजले आहे. भारतातील प्रत्येक शेतकरी एक स्वतंत्र कृषी विद्यापीठच आहे ते याचमुळे! आज आपण कृषी उत्पादन दुप्पट करण्याच्या प्रयत्नात आहोत पण या प्रयत्नात शेताचे बांध, लहान पक्षी, मधमाश्या या निसर्ग घटकांना नेहमीच गौण स्थान दिले जाते. हे कुठेतरी बदलावयास हवे. म्हणूनच ब्राझीलमधील ज्या शेतकऱ्याने आपल्या प्रयोगातून जगाला दाखविले त्याचे अवलंबन आपण पुढच्या सोयाबीनच्या हंगामात का करू नये.९८६९६१२५३१(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.