World Climate Day : हवामान बदलाबाबत जागरूक राहा

Article by Dr. Pralhad Jaybhaye : दरवर्षी २३ मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. आज ७४ वा जागतिक हवामान दिन! या निमित्ताने जागतिक हवामान दिवसाचा उगम, इतिहास व जागतिक हवामान संघटनेचे कार्य आणि कृषी हवामान शास्त्रातील योगदान याबद्दल माहिती घेऊ.
World Climate Day
World Climate DayAgrowon

डॉ. प्रल्‍हाद जायभाये

Climate Changes Awareness : जागतिक स्तरावर बदलते वातावरण हळूहळू आपली कुस बदलू लागले आहे. जा‍गतिक तापमानात वाढ, कार्बन डायऑक्‍साइडच्‍या प्रमाणात वाढ दिसून आली आहे. यामुळे पृथ्वीच्या वातावरणातील जलवायू परिवर्तन घडून आले आहेत. यामुळे भूजल-वायू तसेच पृथ्वीचे पर्यावरण, स्थानीय परिस्थितीकी आणि अन्नसाखळी यामध्येही मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याचे दिसून येतात.

जलवायू परिवर्तनाध्ये झालेल्या बदलामुळे प्रामुख्याने बर्फ वितळणे, वादळांच्या संख्येतील वाढ, मुसळधार पावसाच्‍या घटनांतील वाढ आणि मौसमी पावसाच्‍या वेळापत्रकात होत असलेले बदल, गारपिटीच्या घटनांमधील वाढ, दुष्काळी परिस्थितीमध्ये वाढ होणे इत्यादी वातावरणीय बदल अनुभवास येत आहेत. यातूनच कधी गारपीट तर, कधी तीव्र उन्‍हाळा अथवा हिवाळा (उष्णतेच्या लाटा आणि थंडीच्या लाटा) तर, कधी दुष्‍काळ असे हवामानाचे रूप आपण सध्या अनुभवत आहोत.

अशा जागतिक वातावरण बदलाच्या स्थितीमध्ये काही सकारात्मक बदल घडत आहेत. आणि हे सकारात्मक बदल घडवून आणण्यामध्ये जागतिक हवामान संघटनेचा मोठा वाटा आहे. म्‍हणून वातावरण बदल आणि त्‍याचा होणारा जलचक्रावरील परिणाम अभ्‍यासण्‍यासाठी जागतिक हवामान संघटनेचे कार्य जाणून घेणे आजच्‍या हवामान दिनी आवश्‍यक आहे.

जागतिक हवामान संघटनेची रचना :

सन २०२३ पासून अब्दुल्ला अल मंडोस हे जागतिक हवामान संघटनेचे अध्‍यक्ष म्हणून काम पाहत आहेत. या संघटनेचे १८७ राष्‍ट्र आणि ६ संयुक्‍त वसाहती राष्‍ट्र असे मिळून १९३ देश सदस्‍य आहेत. या सदस्‍य देशाचे हवामान विभागप्रमुख संघटनेच्‍या कार्यकारी परिषदेचे सदस्‍य असतात. या संघटनेचे सभासदत्‍व खुले किंवा ऐच्छिक आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक हे जागतिक हवामान संघटनेचे सदस्‍य असतात.

जागतिक हवामान दिनाचा इतिहास :

सन १८७३ मध्‍ये व्हिएन्‍ना येथे ‘आंतरराष्‍ट्रीय हवामान संस्‍था’ (आयएमओ) ही सरकारी; परंतु स्‍वायत्‍त अशी स्‍थापना झाली. पुढे ‘संयुक्‍त राष्‍ट्रसंघाच्या स्‍थापने’पासूनच म्हणजे २३ मार्च १९५० ला ‘आयएमओ’ या नावाने ही संस्था एक शाखा म्हणून उदयास आली.

सन १९५१ पासून ‘आयएमओ’ ही निमसरकारी संस्‍था म्‍हणून ‘संयुक्‍त राष्‍ट्र संघाची’ एक चांगली शाखा म्‍हणून काम पाहू लागली. पुढे १९५१ मध्‍ये आयएमओच्‍या नावात बदल होऊन ‘जागतिक हवामान संघटना’ असे झाले. याच वर्षापासून २३ मार्च हा ‘जागतिक हवामान दिन’ म्‍हणून साजरा केला जाऊ लागला. यावर्षी आपण ७४ वा जागतिक हवामान दिन साजरा करीत आहोत.

World Climate Day
World Meteorological Day : वन, जल अन् हवामान

‘हवामान किंवा वातावरण हे कुठल्‍याही राष्‍ट्राच्‍या, राजकीय पक्षाच्‍या किंवा विचारधारेच्‍या, आर्थिक किंवा वंशिक अथवा धार्मिक सीमा पाळत नाही.’ याला सुसंगत असेच धोरण गेल्‍या पाऊण शतकात या संस्‍थेने पाळले आहे. म्‍हणूनच या संस्‍थेने मानवाच्‍या प्रगतीसाठी सदस्‍य देशांतील हवामान आणि जलशास्‍त्र संस्‍थेस मार्गदर्शन, संशोधन आणि तांत्रिक मदत केली आहे.

याचाच भाग म्हणून यावर्षी जागतिक हवामान संघटनेने ‘हवामान कृतीच्या अग्रभागी’ (ॲट द फ्रंट लाईन ऑफ क्लायमेट ॲक्शन) हे घोषवाक्य घेऊन ‘मानवाचा सर्वांगीण शाश्वत विकास साध्य करण्यासाठी, वातावरण बदल आणि वातावरण बदलाच्या सामना करण्याच्या लढाईत किंवा कृतीमध्ये सर्वात पुढे राहण्यासाठी कटिबद्ध होण्याचा संकल्प केलेला आहे.’ (फोटो १- संकल्प चित्र).

वातावरण बदलाच्या या पार्श्वभूमीवर वाढते तापमान नियंत्रित करणे, कार्बन डाय-ऑक्साईडचे प्रमाण कमी करणे, जलपुनर्भरण होऊन भूपृष्ठावरील आणि भूपृष्ठाखालील पाणी पातळी शाश्वत राहील आणि यामुळे पृथ्वीचे जलचक्र सुरळीत राहील व जैवविविधता काही प्रमाणात पुर्ववत होईल. ज्यायोगे लोकांचे सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य होईल.

यामध्ये,

भूकमारी आणि गरिबी दूर करून आरोग्य सुधारणे आणि लोकांचे कल्याण करणे.

पिण्याचे आणि वापराचे पुरेसे स्वच्छ पाणी सर्वांना उपलब्ध करून देणे.

भू व जल परिस्थितीकीमध्ये राहणाऱ्या प्राणीमात्रांचे संवर्धन करणे.

लोकसमुदायास व शहरास बदलत्या वातावरणाची झळ बसू नये म्हणून संवेदनशील करणे.

विविध शास्त्र, तंत्रज्ञान, उदयोन्मुख तंत्रज्ञान यांच्या वापर करून वातावरण बदलाचा सामना करण्याचे कार्य करणे.

World Climate Day
Climate Change : हवामान बदलाचा करूया कृतिशील सामना

जागतिक हवामान संस्थेचे कार्य :

‘जागतिक हवामान संघटना’ ही ‘पृथ्‍वीवरील वातावरण, जमीन, सागर, हवामान, जैवविविधता, पर्यावरण आणि जलस्रोत या बाबतीतील विश्‍लेषण व मार्गदर्शन करणारी पद्दसिध्‍द संस्‍था (संयुक्‍त राष्‍ट्रसंघाची वरील बाबतीतील अधिकृत प्रवक्‍ता) म्‍हणून ओळखली जाते. आजपर्यंत या संस्‍थेने वैज्ञानिक आणि तांत्रिक कार्यक्रमांतर्गत जागतिक हवामान निरीक्षक उपगृह, जागतिक वातावरण प्रकल्‍प,

वैश्विक वातावरण प्रकल्‍प, जागतिक हवामान संशोधन प्रकल्‍प,अवकाश प्रकल्‍प असे जवळपास एक डझन प्रकल्‍प राबवले आहेत. स्‍वतंत्रपणे राबवीत आहेत; तर आयपीसीसी, जागतिक वातावरण संशोधन प्रकल्‍प, वैश्विक वातावरण निरीक्षण यंत्रणा, वैश्विक सागरीय निरीक्षण यंत्रणा आणि वैश्विक भूमी निरीक्षण यंत्रणा अशा प्रकल्‍पांची कार्यन्वियता सहभागीदारातून चालू आहे. याशिवाय, महत्त्‍वाचे प्रकल्‍प आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर, राष्‍ट्रीय स्‍तरावर जवळपास चालू आहेत.

या संस्‍थेच्‍या मूळ तत्त्‍वांमध्‍ये, हवामानविषयक माहितीची सदस्‍य देशांतर्गत देवाण-घेवाण यास महत्त्‍व देण्यात आले आहे. यामुळेच आंतरराष्ट्रीय स्‍तरावर वादळ, अतिवृष्‍टी, त्‍सुनामी किंवा दुष्‍काळ, तसेच भूकंप, ज्‍वालामुखी यासंदर्भात नियमित माहिती देणे-घेणे चालू असते.

हवामानाच्‍या अंदाजाची उपयुक्‍तता वाढविण्‍यासाठी जगभरातील जास्‍तीत जास्‍त हवामान नोंदी मिळविण्‍याचा कार्यक्रम ‘जागतिक हवामान संघटनेने सुरू केलेला आहे. हवामान विषयक, सागरीय आणि जलपृष्‍ठीय प्रकारच्‍या नोंदी घेण्याकरिता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या नोंदीची देवाण-घेवाण करण्याकरिता जागतिक हवामान संघटना ही SYNOP

(सद्यःस्थितीतील हवामान विषयक माहितीचा नकाशा) CLIMATE (हवामान) आणि TEMP ( तापमान) असे सांख्यिकीय चिन्हांचा (न्‍युमॅरिक कोड) वापर करते. आणि सर्व सदस्य देशांनाही याचा वापर करूनच हवामान विषयक माहितीची देवाण-घेवाण करावी लागते. जगभरात घडणाऱ्या एकूण आपत्तीपैकी नैसर्गिक आपत्तीची संख्‍या सुमारे ९० टक्‍के आहे. या आपत्तीची मानवी जीवनास झळ बसू नये म्‍हणून या संस्‍थेने बहुमोल कार्य केले आहे.

डॉ. प्रल्‍हाद जायभाये, ७९८०६८४१८९

(कृषी हवामानशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com