Banana Farming: केळी बागेत अन्नद्रव्ये, सिंचन व्यवस्थापनावर भर

Nutrient and Irrigation Management: जळगाव जिल्ह्यातील प्रवीण पाटील यांनी ३५ एकर क्षेत्रावर ५० हजार केळी झाडांचे अचूक नियोजन, अन्नद्रव्य व्यवस्थापन व ठिबक सिंचनाच्या साहाय्याने अत्यंत यशस्वी पीक उत्पादन घेतले आहे.
Banana Farming
Banana FarmingAgrowon
Published on
Updated on

Farm Success Story:

शेतकरी नियोजन । पीक : केळी

शेतकरी : प्रवीण रमेश पाटील

गाव : ऐनपूर, ता. रावेर, जि. जळगाव

एकूण क्षेत्र : ७५ एकर

केळीखालील क्षेत्र : ३५ एकर

एकूण झाडे : ५० हजार झाडे

जळगाव जिल्ह्यातील प्रवीण पाटील यांची ऐनपूर व सुलवाडी (ता. रावेर) शिवारात ७५ एकर काळी कसदार जमीन आहे. केळी प्रमुख पीक असून तूर, गहू, कापूस, मका ही पिके घेतात. केळीमध्ये नवती किंवा मृग बहर (जून, जुलै लागवड) असते. लागवडीसाठी १०० टक्के उतिसंवर्धित रोपांचा ग्रॅण्ड नैन वाणाच्या रोपांचा उपयोग केला जातो. साधारण अर्धा फूट उंच व पावणेचार फूट रुंद गादीवाफ्यावर साडेपाच बाय पावणेसहा फूट या अंतरात लागवड केली जाते. सिंचनासाठी सिंगल लॅटरल वापरल्या जातात. निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेण्याचा प्रवीण पाटील यांचा प्रयत्न असतो. ड्रीप तज्ज्ञ शरद महाजन यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते.

Banana Farming
Banana Farming: केळी कंदांचा खानदेशामध्ये तुटवडा

प्रवीण पाटील यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर घरची शेती करण्याचा निर्णय घेतला. घरची वडिलोपार्जित ७५ एकर शेती आहे. पाटील यांचे एकत्र कुटुंब असून प्रवीण यांचे वडील रमेश पाटील यांच्यासह काका सुरेश, गणेश आणि अशोक पाटील हे शेती करतात. शेतीमध्ये प्रामुख्याने केळी लागवडीवर त्यांचा भर असतो. शेतीसाठी शाश्वत सिंचन उपलब्ध होण्यासाठी कूपनलिका व तापी नदीवरून जलवाहिन्या आणल्या आहेत. जलसाठे मुबलक आहेत. शिवाय तापी नदीकाठी हा भाग असून हतनूर धरणाचा लाभही या परिसरास मिळतो आहे.

लागवड नियोजनातील बाबी

सध्या आगाप लागवडीच्या केळी बागा चार महिन्यांच्या झाल्या आहेत. तर एप्रिल लागवडीच्या बागांमध्ये २० हजार झाडांचे व्यवस्थापन केले जात आहे. काढणी झालेल्या बागेतील १५ हजार झाडांचे पिलबाग व्यवस्थापनही केले जात आहे.

लागवड काळ्या कसदार जमिनीत केली जाते. त्यामुळे पीक काढणीनंतर उर्वरित पीक अवशेष जाळले जात नाहीत. ते शेतात कुजविले जातात. त्याचा पुढे केळी पिकास फायदा होतो.

केळी लागवडीपूर्वी एकरी पाच ट्रॉली शेणखत मात्रा दिली जाते. त्यानंतर पूर्वमशागत करून जमीन भुसभुशीत केले जाते.

लागवडीसाठी साधारण अर्धा फूट उंच व पावणेचार फूट रुंद गादीवाफे ट्रॅक्टरद्वारे तयार केले जातात. या गादीवाफ्यांवर साडेपाच बाय पावणेसहा फूट अंतरावर केळी रोपांची लागवड केली जाते.

रोपांची लागवड करण्यापूर्वी गादीवाफे चांगले भिजवून घेतले जातात. सिंचनासाठी १६ मिमी लॅटरलचा वापर केला जातो. दोन ड्रीपमध्ये साधारण सव्वा फूट अंतर राखले जाते. त्यातून ताशी चार लिटर पाण्याचा विसर्ग होतो.

लागवडीवेळी रासायनिक खतांचे बेसल डोस दिले जात नाहीत. लागवडीनंतर निश्चित वेळापत्रकानुसार विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या जातात.

लागवडीनंतर पाचव्या दिवसापासून दर आठ दिवसांनी बुरशीनाशके, खते व अमिनो ॲसिड यांची आळवणी केली जाते.

लहान केळी रोपांचे उन्हापासून संरक्षणासाठी केळी लागवडीत दोन ओळींमधील जागेत धैंचा लागवड करण्यात येते. त्यामुळे रोपांचे उन्ह आणि वादळी वाऱ्यांपासून संरक्षण होण्यास मदत होते. ही हिरवळीची पिके वाढल्यानंतर ती जमिनीत गाडली जातात. त्याचा केळी पिकास फायदा होतो.

Banana Farming
Banana Farming : चुकांना सुधारत यशस्वी शेतीकडे

आगामी नियोजन

पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असून आगामी काळात पिकाची अपेक्षित वाढ होण्यासाठी सिंचन आणि अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर देणे आवश्यक आहे. सध्या पाऊस नाही. त्यामुळे सिंचनाचा कालावधी वाढविला आहे. पावसात उघडीप राहून उन्ह राहिल्यास रोज किमान दोन तास सिंचन केले जात आहे. आगामी काळात पाऊस झाल्यास, सिंचनाच्या वेळापत्रकात आवश्यक बदल केला जाईल.

सूक्ष्म अन्नद्रव्ये व सरळ खते वेळापत्रकानुसार दिली जात आहेत. त्यात सातत्य राखले जाईल. आगामी काळात बागेची वाढ होईल तसे अन्नद्रव्यांची गरज वाढत जाईल. त्यानुसार १३.४०.१३ व सरळ खतांचे प्रमाण आधीपेक्षा थोडे वाढवून दिले जाईल.

झाडाचा बुंधा तयार होण्यासाठी फॉस्फोरिक ॲसिड निश्चित प्रमाणानुसार दिले जाईल.

बागेच्या स्वच्छतेवर भर दिला जाईल. तण नियंत्रण वेळेत केले जाईल. झाडांची कोरडी पाने व अन्य रोगग्रस्त पीक अवशेष त्वरित बागेबाहेर नेऊन नष्ट केले जातील.

करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीत बुरशीनाशके व अन्नद्रव्ये व्यवस्थापन केले जाईल.

बागेतील फुटवे नियमितपणे काढून घेण्याची कार्यवाही केली जाईल.

वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन सिंचनावर भर दिला जाईल.

कीड-रोग, अन्नद्रव्ये व्यवस्थापन

आगाप लागवडीत तणांचा प्रादुर्भाव जास्त होतो. तणांच्या प्रादुर्भावामुळे किडींचा प्रादुर्भाव देखील दिसून येतो. ही समस्या टाळण्यासाठी मजुरांकरवी तण नियंत्रण करण्यास प्राधान्य दिले जाते. तसेच जूनमध्ये बागेत पॉलिमल्चिंग पेपर अंथरण्यात आला आहे. यामुळे तणनियंत्रणासाठी मदत होते. आवश्यकतेनुसार बागेत रासायनिक कीडनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातात.

बागेत कुकुंबर मोझॅक (सीएमव्ही) या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ड्रीपमधून शिफारशीत बुरशीनाशके व कीडनाशकांच्या मात्रा दिल्या जातात.

सध्या वेळापत्रकानुसार दर आठवड्याला विद्राव्य खतांच्या मात्रा देण्यात येत आहेत. विद्राव्य खतांमध्ये १२.६१.०, फॉस्फरिक ॲसिड, युरिया, पोटॅश ही खतेदेखील ड्रीपमधून दिली जात आहेत. ही मात्रा प्रति एक हजार झाडांना दिली जाते.

दर २० ते २५ दिवसांच्या अंतराने सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या जातात.

झाडांच्या वाढीसाठी कॅल्शिअम नायट्रेट, बोरॉन, मॅग्नेशिअम सल्फेट ड्रीपमधून दिले जाते. बाग चार महिन्यांची होईपर्यंत रासायनिक खतांचे अचूक नियोजन केले जाते.

मागील काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे एक- दोन दिवसाआड आठ तास ठिबकद्वारे सिंचन केले जात आहे.

प्रवीण पाटील, ९८२३३७१३८२

(शब्दांकन : चंद्रकांत जाधव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com