Banana Farming : चुकांना सुधारत यशस्वी शेतीकडे

Farmer Success Story : झालेल्या चुका वेळीच सुधारून त्यांनी व्यवस्थापन सुधारणा करण्यास सुरुवात केली. आज निर्यातक्षम केळी उत्पादनातून त्यांनी स्वतःची प्रयोगशील शेतकरी अशी ओळखही तयार करण्यास सुरुवात केली आहे.
Banana Farming
Banana FarmingAgrowon
Published on
Updated on

Banana Farming Success Story : जळगाव जिल्ह्यात पिचर्डे (ता.भडगाव) हे गाव एकेकाळी जलसंकट व अन्य कारणांनी शेतीत पिछाडीवर होते. मात्र आता परिस्थिती बदलली असून, निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी गाव चर्चेत आले आहे. गावातील विनोद हेमराज बोरसें यांच्या संयुक्त कुटुंबाची १६ एकर बागायती शेती आहे.

चार विहिरी व दोन सालगडी आहेत. केळी हे मुख्य पीक आहे. बंधू सचिन बोरसे यांनी बी. फार्म पदवी घेतली असून, भडगाव येथे त्यांचे ‘मेडिकल’चे दुकान आहे. शक्य होईल त्याप्रमाणे ते शेतीतही मदत करतात.

सेंद्रिय शेतीतील अनुभव

विनोद यांनी ‘डीएमएलटी’चा (रक्त तपासणी प्रयोगशाळासंबंधी) अभ्यासक्रम पूर्ण केला. मात्र २००७ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांना वयाच्या तिशीत केळी पिकातील जबाबदारी स्वीकारावी लागली.

दरम्यान, मानवी व पर्यावरणीय आरोग्याचे महत्त्व लक्षात घेता आपण सेंद्रिय शेती करावी असे त्यांनी पक्के केले. कांदा, टोमॅटो व वांगी अशी पिके त्यांनी निवडली. सर्व सेंद्रिय निविष्ठा ते बाजारातून आणायचे.

मात्र अनेक वेळा या उत्पादनांचा दर्जा दुय्यम आढळला. त्यामुळे त्यांचा हवा तसा परिणाम दिसत नव्हता. तांत्रिक माहितीचा अभाव, सेंद्रिय निविष्ठा पारखून घेण्याबाबत झालेले दुर्लक्ष, नैसर्गिक आपत्ती यामुळे सेंद्रिय शेती अधिक खर्चिक झाली.

सेंद्रिय शेतीमाल विक्रीचाही मुद्दा होता. त्यास स्वतंत्र बाजारपेठ परिसरात नसल्याने नजीकच्या बाजारात तेथील उपलब्ध दरांमध्येच माल द्यावा लागे. पुणे, मुंबईतही साठवणुकीची अडचण होती.

Banana Farming
Banana Farming: आंतरपिकांच्या प्रयोगांमधून साधले विविध फायदे

राजकारणात सक्रिय अन् शेतीकडे दुर्लक्ष

विनोद हे नेहमी मदतीला धावून येणारे व्यक्तिमत्त्व. त्यातूनच गावातील मंडळींनी त्यांना ग्रामपंचायतीच्या राजकारणात सक्रिय होण्याचा प्रस्ताव दिला. त्यानुसार २०१५ मध्ये त्यांच्या नेतृत्वात पॅनेल विजयी झाले. सत्ता आली.

दुसरीकडे गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतही सत्ता चालून आली. पाच वर्षे म्हणजे २०२० पर्यंत उपसरपंचपद विनोद यांच्याकडेच होते. सरपंचपद राखीव असल्याने उपसरपंचपद मिळाले. परंतु ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळताना अधिकचा वेळ द्यावा लागे.

शेतीची प्रगती व्हावी, गावात जलसाठे मुबलक असावेत यासाठी विनोद यांनी गावात वाळूबंदी आणली. वाळूचा लिलाव मंत्रालय स्तरावरून आणि न्यायालयात जाऊन रोखला. गावातील नाल्यांचे खोलीकरण व बंधारे तयार करून घेतले.

दोन बंधारे पाणलोटमधून व एक बंधारा मनरेगातून घेतला. त्यामुळे गावातील पाण्याची चिंता मिटली. पण या सर्व प्रयत्नांत विनोद यांना घरच्या शेतीकडे म्हणावे तसे लक्ष देता आले नाही. घरी शेती सांभाळायला अन्य कुणी नसल्याने त्या काळात शेतीत अपेक्षित यश मिळाले नाही.

पूर्णवेळ शेतीत उतरण्याचा निश्‍चय

सन २०२९ च्या दरम्यान सेंद्रिय गूळ निर्मिती सुरू करण्याचे विनोद यांनी ठरवले. त्यासाठी कोल्हापूर येथे जाऊन प्रशिक्षण घेतले. दहा एकरांत को ८६०३२ या वाणाची ऊस लागवड केली. परंतु खानदेशातील उष्ण तापमानामुळे व्यवस्थापनावर परिणाम होऊन एकरी केवळ २५ टन उत्पादन हाती आले. तीन वर्षे हा प्रयोग केला.

पण त्यात अपयश येत गेले. दुसरीकडे या प्रकल्पासाठी बँक व खासगी व्यक्तींकडून कर्ज घेतले. गावकीचे राजकारण आणि सेवा करताना मान, प्रतिष्ठा मिळाली. पण आपल्या शेतीकडे मोठे दुर्लक्ष होत असल्याची खंत विनोद यांना जाणवत होती. सुमारे २५ लाख रुपयांचे कर्ज डोक्यावर झाले होते.

अखेर यापूर्वी आपल्या झालेल्या चुका, उद्‍भविलेली संकटे यांचे परीक्षण व मीमांसा केली.राजकारण सोडून देण्याचा विचार पक्का होऊ लागला. सन २०२० च्या निवडणुकीत कुटुंबातील सदस्यांनाही विनोद यांना भाग घेण्यापासून रोखले. आता पूर्णवेळ शेतीतच काम करून त्यातून उभारी घेण्याबाबत कुटुंबातील मंडळीनी विचारमंथन केले.

Banana Farming
Banana Farming : निर्यातक्षम केळी उत्पादनात मिळवले कसब

सुधारित शेतीला सुरुवात

बोरसे कुटुंबाची केळी पिकावर मोठी श्रद्धा सुरुवातीपासून आहे. विनोद यांचे वडील केळीचे उत्तम प्रकारे उत्पादन घ्यायचे. हाच धागा, विश्‍वास ठेवून विनोद यांनी तशी वाटचाल सुरू केली. अनुभवी केळी उत्पादक. कृषी विभाग, जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ किरण जाधव, कंपन्या यांच्याकडून मार्गदर्शन घेतले.

आता प्रत्येकी आठ एकरांत कांदे व मृग अशा दोन बहरांत केळीची लागवड असते. तीन वर्षांचा अनुभव या पिकात तयार झाला आहे. एकरी तीस टनांपर्यंत उत्पादन मिळते. कांदेबाग केळीची काढणी श्रावण व गणेशोत्सवात होत असल्याने मागणी चांगली असते.

फ्रूट केअर तंत्राचा अवलंब करून निर्यातक्षम उत्पादन घेतले जात आहे. बांधावरच व्यापारी येतात. प्रति किलो १८ ते २९ रुपयांपर्यंत दर मिळतो. या भागातील अन्य शेतकरीही निर्यातक्षम उत्पादन घेऊ लागल्याने अनेक कंपन्या खरेदीसाठी येथे येऊ लागल्या आहेत.

पुढच्यास ठेच..

गिरणाकाठ शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापनाही विनोद यांनी २०२३ मध्ये केली आहे. त्याचे ३०० सभासद आहेत. पुढच्याच ठेच मागचा शहाणा या तत्त्वानुसार पूर्वी ज्या चुका झाल्या त्या इतरांच्या होऊ नयेत यासाठी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.

आत्मा अंतर्गत शेतकरी गटही त्यांनी तयार केला आहेत. शेतकरी कंपनीतर्फे क्षमता बांधणी विषयातील प्रशिक्षणेही ते आयोजित करतात. केळी निर्यातवाढीसाठी पॅक हाउस, पायाभूत सुविधांची उभारणी करण्याचा त्यांचा मनोदय आहे. त्यांनी प्रयोगशील शेतकरी विनोद बोरसे या नावाने यू-ट्यूब चॅनेलही सुरू केले आहे.

विनोद बोरसे ९२७२१५९२६४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com