Banana Crop Advisory : केळी पीक सल्ला

Banana Orchard Management : उष्ण वारे, गारपीट आदी कारणांमुळे पाने फाटणे, घड सटकणे, झाडाचे खोड मध्यभागी मोडणे इत्यादी प्रकार दिसून येतात. यासर्व बाबींचा विचार करून केळी बागेत आवश्‍यक उपाययोजना कराव्यात.
Banana Orchard
Banana OrchardAgrowon

डाॅ. चंद्रशेखर पुजारी

Banana Farming : मागील काही दिवसांपासून कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. कमात तापमानातील वाढ जास्त काळापर्यंत राहिल्यास पिकाच्या वाढीवर आणि फळांच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम दिसून येतो.

याशिवाय उष्ण वारे, गारपीट आदी कारणांमुळे पाने फाटणे, घड सटकणे, झाडाचे खोड मध्यभागी मोडणे इत्यादी प्रकार दिसून येतात. यासर्व बाबींचा विचार करून केळी बागेत आवश्‍यक उपाययोजना कराव्यात.

उन्हाळ्यात होणारे परिणाम

तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक गेल्यास पानांची प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते. बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढतो. बाष्पीभवनामुळे जमिनीतील ओलावा कमी होतो. त्यामुळे मुळांची पाणी व अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्रिया मंदावते. त्याचा थेट झाडाच्या वाढीवर व घडाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. तीव्र सूर्यप्रकाशामुळे पानांची पश्‍चिमेकडील कडा करपते.

निसवलेल्या घडातील वरच्या बाजूच्या फण्या करपून वाळून जातात. घडांचा दांडा काळा पडून कमकुवत होऊन घड सटकतात. घडातील फण्या देखील गळून पडतात. नवीन लागवड केलेल्या लहान रोपांच्या पानांची सुरळी होऊन पाने उमलत नाहीत. पाने पांढरी होऊन करपतात. करपलेल्या ठिकाणी काळे डाग दिसतात.

उष्ण वाऱ्यांमुळे वातावरणात पसरलेली धूळ पानांवर बसते. त्यामुळे प्रकाश संश्‍लेषण क्रियेत अडथळा येतो. तसेच धुळीमुळे घडाची गुणवत्ता खालावते. वाऱ्यामुळे पाने फाटतात. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे घड तयार होण्याच्या अवस्थेतील झाडाचे खोड मध्यभागी मोडते. वादळी वाऱ्यामुळे काही वेळा संपूर्ण झाड उन्मळून पडते. गारपिटीमुळे पाने फाटतात किंवा संपूर्ण पाने मोडून पडते, घडावर व खोडांवर जखमा होतात.

Banana Orchard
Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

उपाययोजना

वारारोधक कुंपण

केळी लागवड करतेवेळी बागेभोवती वारारोधक कुंपणाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. वारारोधकाचा फायदा केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर हिवाळ्यामध्यही होतो. वारारोधक कुंपण म्हणून शेवरी लागवड उत्कृष्ट ठरते. बागेभोवती दोन ओळींत शेवरीची लागवड करावी.

वारारोधक कुंपणामुळे झाडांची पाने फाटणे, घड सटकणे व घडातील फळे गळून पडणे, झाड मोडणे किंवा उन्मळून पडणे असे नुकसान टाळता येते. वारारोधक कुंपण म्हणून शेडनेट लावताना त्याची उंची केळी झाडांपेक्षा जास्त असावी ही काळजी घ्यावी.

घड व्यवस्थापन

उन्हाळ्यात मृग बागेतील घड निसवण्याच्या तसेच पक्वतेच्या अवस्थेत असतात. घड पूर्ण निसवल्यानंतर तसेच केळफूल तोडल्यानंतर पोटॅशिअम डायहायड्रोजन फाॅस्फेट ५० ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम अधिक स्टिकर ५ मिलि प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा घडावर फवारणी करावी.

पहिली फवारणी केळफूल व शेवटची फणी कापल्यानंतर करावी. त्यानंतर साधारण १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. घडाचे तीव्र सूर्यप्रकाश आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी घड पॉलिप्रोपीलिन पिशव्यांनी झाकावेत.

झाडांना आधार

केळीचे खोड कमकुवत असते. जोराच्या वाऱ्यांमुळे खोड मोडून पडणे किंवा उन्मळून पडणे या समस्या बागेत दिसून येतात. यासाठी घड वाढीच्या अवस्थेत असलेल्या बागेला पाॅलिप्राॅलीन पट्ट्यांच्या साह्याने आधार द्यावा किंवा बांबू काठ्यांच्या साह्याने देखील आधार देता येतो.

Banana Orchard
Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

आच्छादनाचा वापर

केळी पिकाच्या दोन ओळीत ३० मायक्राॅन जाडीच्या चंदेरी काळ्या रंगाचे प्लास्टिक आच्छादन करावे. हे शक्य नसल्यास उसाचे पाचट, गहू, सोयाबीनचा भुस्सा अशा सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.

आच्छादनामुळे बाष्पीभवनाच्या वेग कमी होऊन जमिनीतील पाणी टिकून रहाते. तसेच जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवाणूंच्या संख्येत वाढ होते. घड सटकण्याचे तसेच झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण कमी होते.

बाष्परोधकाचा वापर

पानांतून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग नियंत्रित करण्यासाठी, १५ दिवसांच्या अंतराने केओलीन (८ टक्के) ८० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या फवारणीमुळे पानांवर पांढरा थर तयार होतो आणि तो पानातील छिद्रांना अंशतः बंद करतो.

सिंचन व्यवस्थापन

वाढलेले तापमान, तीव्र सूर्यप्रकाश व वाऱ्याचा वेग यामुळे झाडांची पाण्याची गरज वाढते. तसेच झाडातून होणारे बाष्पोत्सर्जन आणि जमिनीतून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग वाढलेला असतो. त्यामुळे झाडाची पाण्याची गरज वाढते. त्यासाठी झाडाचे वय आणि तापमान यांचा अंदाज घेऊन नियमित सिंचन करावे.

ठिबकद्वारे सिंचन

पाणी देण्याची वेळ पाण्याची गरज (लिटर प्रतिझाड प्रतिदिन)

१ ते ४ महिने ४.५ ते ६ .५

५ ते ९ महिने ९ ते ११

१० वा महिना १४ ते १६

११ वा महिना १८ ते २०

१२ वा महिना २१ ते २४

डाॅ. चंद्रशेखर पुजारी, ९४२०९४३१४६

(अखिल भारतीय समन्वित फळ सुधार प्रकल्प, केळी संशोधन केंद्र, जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com