
Amravati News: महसूल तसेच उद्योगमंत्री यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर माजी राज्यमंत्री तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी शनिवारी (ता.१४) उपोषण स्थगितीचा निर्णय जाहीर केला. मात्र २ ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीसह उर्वरित १६ प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास थेट मंत्रालयात शिरण्याचा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, दिव्यांगांच्या मानधनात वाढ करून ते सहा हजार रुपये करण्यात यावे, शेती कामाचा समावेश रोजगार हमी योजनेअंतर्गत करीत उत्पादकता खर्च कमी करावा.
यासह तब्बल १७ मागण्यांच्या पूर्ततेकरिता बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. रविवारी (ता. ८) मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधिस्थळानजीक त्यांनी या आंदोलनाची सुरुवात केली. त्यांच्यासोबत ‘प्रहार’चे कार्यकर्ते, शेतकरी, दिव्यांग देखील आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र शासनस्तरावरून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी अर्धदफन, जलसमाधी, ‘रास्ता रोको’ अशी तीव्र आंदोलने केली.
करजगाव येथील अजय चौधरी या पदाधिकाऱ्याने तर चक्क विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मुंबई मंत्रालयासमोर देखील प्रहारच्या दिव्यांग पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून सरकारचे लक्ष्य वेधले. आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे पाहता सरकारकडून या प्रश्नी चर्चेची तयारी दर्शविण्यात आली. त्यानुसार ‘रोहयो’ मंत्री भारत गोगावले, पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे, तर जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी प्रत्यक्ष भेटीत चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून महसूलमंत्री शुक्रवारी (ता. १३) मोझरीत दाखल झाले. त्यांनी बच्चू कडू व देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून संवाद घडवून आणला. शनिवारी (ता.१४) उदय सामंत मोझरी पोहोचले. श्री. सामंत यांनी सरकारच्या वतीने श्री. बावनकुळे यांचे पत्र दिले. दरम्यान लेखी आश्वासनानंतर सरकारला वेळ दिला असून तूर्तास हे आंदोलन केले. मात्र सरकारने दगाफटका केल्यास २ ऑक्टोबर रोजी थेट मंत्रालयात शिरण्याचा इशारा त्यांनी दिला.
शासन हे करणार
शेतकरी कर्जमाफीसाठी १५ दिवसांत उच्चस्तरीय समिती स्थापन करणार असून, समितीचा अहवाल प्राप्त होताच कर्जमाफी संदर्भातील निर्णय घेण्यात येईल. थकित कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्जवाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेणे. दिव्यांगाच्या मानधन वाढीबाबत ३० जूनच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करणे. उर्वरित मागण्यांवर संबंधित खात्याचे मंत्री व मुख्यमंत्री यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे श्री. बावनकुळे यांचे पत्र बच्चू कडू यांना देण्यात आले.
प्रकृती चिंताजनक
गेल्या सहा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना पत्र देत या बाबतची जाणीव करून दिली होती. विशेष म्हणजे शुक्रवारी (ता. १३) त्यांना रक्ताची उलटी झाली होती. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. अखेरीस शनिवारी आंदोलन स्थगित झाल्यानंतर त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.