Indian Monsoon : मॉन्सूनचा शुभ संकेत

Monsoon Update : महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत मॉन्सून वेळेआधीच पोहोचला आहे, कोकणची किनारपट्टी त्याने व्यापली आहे. त्याची पुढील प्रगतीही समाधानकारक आहे. शेतकऱ्यांसाठी हा एक चांगला संकेत आहे.
Monsoon
MonsoonAgrowon
Published on
Updated on

Monsoon 2024 : कोणत्याही कार्याची सुरुवात वेळेवर होणे हे त्याच्या पुढील प्रगतीच्या दृष्टीने एक शुभ लक्षण मानले जाते. वेळेवर सुरू झालेले काम पुढे सुरळीतपणे चालते आणि ते पूर्णत्वास जाते, असा एक सामान्य अनुभव आहे. नैर्ऋत्य मॉन्सूनचे काहीसे तसेच आहे. तो वेळेवर दाखल झाला तर शेतकरी उत्साहाने आपली तयारीची कामे हाती घेतात आणि पेरण्या करू लागतात.

नाही तर त्यांना वाट बघत बसावे लागते आणि पेरण्या करायच्या की लांबणीवर टाकायच्या हा प्रश्‍न त्यांना पडतो. नैर्ऋत्य मॉन्सूनचे आगमन सर्वप्रथम भारताच्या अगदी दक्षिणेकडच्या केरळ राज्यात होत असते. मॉन्सूनच्या केरळवरील आगमनाची सरासरी तारीख १ जून आहे. मॉन्सून तेथून हळूहळू उत्तरेकडे सरकतो आणि साधारणपणे पुढील पंधरा दिवसांत तो महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांत आपली हजेरी लावतो.

संपूर्ण देश व्यापायला त्याला आणखी तीन-चार आठवडे लागतात. यंदाच्या वर्षी मॉन्सूनचे केरळवर आगमन ३० मे रोजी म्हणजे सरासरी तारखेच्या तीन दिवस अगोदरच झाले. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत मॉन्सून वेळेआधीच पोहोचला आहे, कोकणची किनारपट्टी त्याने व्यापली आहे. त्याची पुढील प्रगतीही समाधानकारक आहे. शेतकऱ्यांसाठी हा एक चांगला संकेत आहे.

पूर्वमोसमी पाऊस

एप्रिल आणि मे महिन्यांत अरबी समुद्रावर आणि बंगालच्या उपसागरावर एक-दोन चक्रीवादळे निर्माण होत असतात. या वर्षीही २५ मे रोजी रेमाल नावाचे एक चक्री वादळ बंगालच्या उपसागरावर निर्माण झाले. ते उत्तर दिशेने पुढे सरकले आणि २६ मे रोजी पश्‍चिम बंगाल व बांगला देशची किनारपट्टी पार करून नंतर भारताच्या पूर्वोत्तर भागात पोहोचले.

परिणामी, तेथे भरपूर पाऊस पडला. रेमाल वादळ महाराष्ट्रापासून खूप दूर होते तरी त्याच्या प्रभावाखाली अरबी समुद्रावरून महाराष्ट्रावर मुबलक बाष्प वाहून आले. त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी पडल्या. काही ठिकाणी नुकसानही झाले पण याच पावसाने उन्हाळ्याचा चटका मात्र कमी झाला.

Monsoon
Monsoon 2024 : मॉन्सूनची महाराष्ट्रात मुसंडी

एप्रिल-मे महिन्यांत पडणारा पूर्वमोसमी किंवा वळवाचा पाऊस हा वादळी स्वरूपाचा असतो. तो उंच वाढलेल्या ढगांतून पडतो. त्या ढगांतून गडगडाट ऐकू येतो. विजांचा लखलखाट पाहायला मिळतो. कधी कधी त्यातून गाराही पडतात. वादळी पावसाच्या जोरदार सरी पडून गेल्यावर आकाश पुन्हा स्वच्छ होते.

पूर्वमोसमी पाऊस बहुधा स्थानिक असतो. म्हणून असे होऊ शकते की एखाद्या तालुक्यात खूप पाऊस पडतो तर शेजारच्या तालुक्यात अजिबात नाही. याउलट मॉन्सूनचे ढग मध्यम उंचीचे असतात. त्यातून मेघगर्जना होत नाही, विजाही चमकत नाहीत आणि हलक्या पावसाची संततधार चालू राहते. मॉन्सूनचे ढग स्थानिक नसतात, ते दूरवर पसरलेले असतात. त्यांची उंची कमी असली तरी त्यांची व्याप्ती मोठी असते. म्हणून आकाशातले ढग मॉन्सूनचे आहेत की नाहीत हे सहज ओळखता येते.

मॉन्सूनच्या आगमनाचे निकष

जून महिन्यात पाऊस पडू लागला की मॉन्सून आला, असे आपण म्हणू शकत नाही. हवामानशास्त्रज्ञ पावसाव्यतिरिक्त आणखी काही निकष लावतात. त्यांत वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याचा वेग हे महत्त्वाचे निकष असतात. महाराष्ट्रावर मॉन्सूनचे वारे नैर्ऋत्येकडून किंवा

पश्‍चिमेकडून वाहतात आणि ते वेगवान असतात. जमिनीवर आपण जे वारे अनुभवतो त्या मानाने वातावरणातील उच्च स्तरांतील वारे अधिक वेगवान असतात पण त्यांची दिशा विरुद्ध असते. जोपर्यंत जमिनीवरील आणि उच्च स्तरांतील असे वारे व्यवस्थितपणे आणि सातत्याने वाहू लागत नाहीत तोपर्यंत मॉन्सून आल्याचे जाहीर केले जात नाही. कारण मॉन्सूनचा संपूर्ण प्रवाह सबळ व्हायची गरज असते. वातावरणातील वायूचा दाब, हवेतील आर्द्रता, पावसाचे एकंदर प्रमाण आणि वितरण, असे अनेक घटक विचारात घेतले जातात. म्हणून कधी कधी आपल्याला असे वाटते की मॉन्सून तर आला आहे पण त्याचे आगमन अधिकृतपणे जाहीर करायला हवामानशास्त्रज्ञ आणखी काही दिवस घेतात.

Monsoon
Monsoon Update : महाराष्ट्रात मॉन्सून दाखल

मॉन्सूनचे पूर्वानुमान

आगामी मॉन्सून सरासरीपेक्षा सहा टक्के अधिक पाऊस देईल, असे पूर्वानुमान १५ एप्रिल २०२४ रोजी भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवले होते. अर्थात, त्यात पाच टक्के चूकभूल व्हायची शक्यताही सांगितली गेली होती. त्यानंतर २७ मे २०२४ रोजी हवामान विभागाने दुसऱ्या टप्प्याच्या अंदाजात या पहिल्या पूर्वानुमानाला दुजोरा दिला.

त्याशिवाय त्याने असेही सांगितले, की महाराष्ट्राच्या बहुतेक भागांत जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या अवधीत मॉन्सूनचे एकूण पर्जन्यमान सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता खूप चांगली आहे. जून महिन्याच्या पावसाविषयी म्हणायचे झाले तर महाराष्ट्राच्या बहुतेक भागांत परिस्थिती समाधानकारक राहण्याचा अंदाज दिला गेला आहे.

१५ मे २०२४ रोजी हवामान विभागाने मॉन्सूनच्या केरळवरील आगमनाविषयी पूर्वानुमान दिले होते. त्यात यंदाचा मॉन्सून केरळवर ३१ मे किंवा त्याच्या आसपासच्या चार दिवसांत दाखल होईल, असा अंदाज वर्तवला गेला होता. प्रत्यक्षात तो काहीसा लवकरच म्हणजे २९ मे रोजी दाखल झाला आणि हा अंदाज खरा ठरला.

मॉन्सूनच्या पर्जन्यमानाचे प्रमाण काही अंशी ‘एल-निनो’ आणि ‘ला-निना’ या प्रक्रियांवर अवलंबून असते. एल-निनो आणि ला-निना हे स्पॅनिश भाषेतील शब्द आता बहुतेक मराठी भाषिकांच्या परिचयाचे झाले आहेत. त्यांचा भारतीय मॉन्सूनशी दूरचा संबंध आहे हेही आता लोकांना माहीत झाले आहे. पण त्यांचा मूळ संदर्भ प्रशांत महासागराच्या तापमानाशी आहे.

जेव्हा प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय प्रदेशाचे तापमान सरासरीपेक्षा खूप जास्त वाढते तेव्हा उद्‍भवणाऱ्या परिस्थितीला एल-निनो म्हटले जाते. उलट जेव्हा हे तापमान सरासरीहून बरेच कमी होते तेव्हाच्या परिस्थितीला ला-निना म्हणण्यात येते. यंदाच्या वर्षी ला-निना निर्माण होईल याचे भाकित काही महिन्यांपूर्वीच केले असून, ते भारतासाठी आशादायक आहे. कारण ला-निना असताना भारताचा नैर्ऋत्य मॉन्सून चांगला पाऊस देतो, असा अनुभव आहे.

मागील दोन वर्षे प्रशांत महासागरावर एल-निनोची परिस्थिती होती. आता तिचे परिवर्तन हळूहळू ला-निना परिस्थितीत होत आहे. या स्थित्यंतरावर हवामानशास्त्रज्ञ बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अपेक्षेनुसार ला-निनाची परिस्थिती प्रबळ होत राहिली तर आपला मॉन्सूनही प्रभावित होत राहील आणि येणाऱ्या चार महिन्यांत चांगला पाऊस देत राहील, अशी अपेक्षा आपण करू शकतो. दरम्यान, शेतकऱ्यांनी कृषी हवामान सल्ला नियमितपणे ऐकून त्यानुसार शेतीविषयक निर्णय घेतले तर ते त्यांना उपयोगी ठरेल.

(लेखक ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com