Nagpur News : ‘‘आमच्या जगण्याचा आधारच हिरावला गेला तर पुढे काहीच उरणार नाही. अत्यल्पभूधारकांची शेती हिरावल्यानंतर आमच्यावर विस्थापितांसारखे जगण्याची वेळ येईल, असे दुहेरी संकट आहे,’’ शक्तिपीठ महामार्गावर प्रतिक्रिया देताना काऊरवाडी गावच्या शैलेश वळसे (पाटील) या शेतकऱ्याचे डोळे पाणावले होते.
वळसे यांच्यासारख्या अनेक अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मनात शक्तिपीठ महामार्गाचा फक्त विषय निघाला तरीही धस्स होतं. उपजीविकेचे मुख्य साधनच शासन हिरावणार असल्याने या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. शैलेश यांच्याकडे केवळ अडीच एकर शेती. त्यात विहीर आणि वीज जोडणी आहे.
हे संपूर्ण क्षेत्र जाणार असल्याने ते हवालदिल झाले आहेत. त्यामुळे यापुढील काळात अधिग्रहणाविरोधात लढा तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला. वर्धा जिल्ह्यात ३६, तर यवतमाळ जिल्ह्यातून १२९ किलोमीटरचा मार्ग जाणार आहे. ज्या भागातून हा रस्ता जात आहे हा भाग केळी, ऊस यांसारख्या पिकांसाठी ओळखला जातो.
खडका गावचे पंजाबराव देशमुख खडकेकर यांची जमीन यापूर्वी नागपूर-तुळजापूर महामार्गाकरिता अधिग्रहित करण्यात आली होती. त्यापोटी मोबदलाही मिळाला. आता मात्र शासनाकडून गेल्या तीन वर्षांत खरेदी खत झालेल्या जमिनींच्या व्यवहाराचा आधार घेत सरासरी काढून चार पट मोबदला देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
खरेदीवरील खर्च कमी व्हावा याकरिता ही रक्कम कमी दाखविली जाते. यामुळे व्यवहाराबाबतही साशंकता आहे. कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, असा निर्धार या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे. त्याकरिता गावागावांत बैठका घेतल्या जात आहेत. यापूर्वी या भागातून गेलेल्या नागपूर-तुळजापूर या मार्गामुळे अनेकांच्या शेतीचे दोन तुकडे झाले.
अशा शेतीचे व्यवस्थापन करणे शक्य होत नसल्याने ते विकण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरला नव्हता. आता या नव्या मार्गामुळे शासनाला कोणता विकास साधायचा आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. त्यामुळेच येत्या काळात अधिग्रहणाविरोधात टप्प्याटप्प्याने लढा तीव्र करण्याचा इशारा पंजाबराव देशमुख यांनी दिला.
एजंटांच्या फेऱ्या वाढल्या...
एजंटाच्या फळ्या गावागावांतील विरोध बैठकांना हजेरी लावत आहे. जमीन द्या, पहिला हप्ता घ्या; दुसऱ्या हप्त्यावेळी न्यायालयात जाऊ आणि वाढीव मोबदला मिळवून देऊ, असा दावा त्या करीत आहेत. परंतु मला माझी सुपीक जमीन द्यायचीच नाही, असे उटी येथील विनोद मैंद यांनी ठणकावले.
महामार्गात या तालुक्यांचा समावेश
- यवतमाळ जिल्हा : आर्णी (१६ गावे), पांढरकवडा, उमरखेड (सहा गावे), महागाव (१८ गावे), यवतमाळ (१२ गावे), कळंब (१६ गावे), घाटंजी (१ गाव).
- वर्धा जिल्हा : देवळी (दहा गावे), वर्धा (९ गावे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.