Fish Artificial Breeding : माशांचे कृत्रिम प्रजनन तंत्र

Fisheries Production : माशांचे प्रजनन सिमेंटच्या गोलाकार हॅचरी व पोर्टेबल कार्प हॅचेरीद्वारे केले जाते. प्रजननासाठी प्रजनन योग्य माशांचे नर आणि मादी ओळखणे अतिशय महत्त्वाचे आहे.
Fish Artificial Breeding
Fish Artificial Breedingagrowon
Published on
Updated on

महेश शेटकार, डॉ. स्वप्नजा मोहिते : मत्स्यपालन करताना, मत्स्य बीज वेळेवर मिळणे अत्यावश्यक असते. गोड्या पाण्यातील मासळीचे उदा. भारतीय कार्प माशांचे उत्तम आणि रोगविरहित बीज मिळविण्यासाठी कृत्रिम प्रजननाचा आधार घेतला जातो. यासाठी ब्रूडर्स म्हणजे प्रजनन योग्य नर आणि माद्या तलावांमध्ये संचय करून, त्यांना योग्य वेळी संप्रेरकांचे इंजेक्शन देऊन, प्रजननास उद्युक्त केले जाते. भारतातल्या अनेक संस्था आणि तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली हे कृत्रिम प्रजनन कार्यक्रम केले जातात. यामध्ये सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट (CIFRI),केंद्रीय गोड्या पाण्यातील जलसंवर्धन संस्था (CIFA) उल्लेख करावा लागेल.

तलावात किंवा जलाशयात अंडी घालण्यासाठी कार्प प्रजातींच्या माशांना प्रेरित करावे लागते. या प्रक्रियेस कृत्रिम प्रजनन असे म्हणतात. यामध्ये प्रजननयोग्य झालेल्या माशांना संप्रेरकाचे इंजेक्शन देऊन प्रजननासाठी प्रेरित केले जाते. माशांचे प्रजनन सिमेंटच्या गोलाकार हॅचरी व पोर्टेबल कार्प हॅचेरीद्वारे केले जाते. प्रजननासाठी प्रजनन योग्य माशांचे नर आणि मादी ओळखणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यावरच प्रजननाची प्रक्रिया अवलंबून असते. साधारणपणे परिपक्व असलेली १ किलो वजनाची मादी १ लक्ष अंडी देते.

माशांच्या प्रेरित प्रजननासाठी वापरले जाणारे संप्रेरके

पर्यावरणीय नियंत्रण आणि हार्मोनल तंत्रांचा वापर करून तलावांमध्ये संवर्धन केल्या जाणाऱ्या माशांची पैदास केली जाते. मात्र, काही माशांच्या प्रजातींसाठी त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणाच्या अचूक स्थितींची माहिती नसते. तसेच स्थलांतर, खोली, नदीचा प्रवाह, तापमान अशा पर्यावरणीय घटकांचे अनुकरण करणे कठीण जाते. अशा परिस्थितीत बाह्यरित्या दिले जाणारे (एक्सोजेनस) संप्रेरके वापरणे हा माशांच्या प्रजननाला चालना देण्यासाठी प्रभावी उपाय ठरतो.

१९३० मध्ये हॉसी यांनी प्रथम माशांमध्ये अंड्यांची परिपक्वता आणि ओव्हुलेशन प्रेरित करण्यासाठी एक्सोजेनस संप्रेरकांचा उपयोग केला, ज्याला "हायपोफिसिस तंत्र" म्हणून ओळखले जाते. या तंत्राच्या वापराबद्दल ब्राझीलमध्ये १९३० च्या दशकाच्या उत्तरार्धात व्हॉन इहेरिंग यांनीही उल्लेखनीय काम केले. सध्या मत्स्यपालनात प्रेरित प्रजननासाठी वापरले जाणारे प्रमुख हार्मोन्स पिट्यूटरी ग्रंथी अर्क (पीजीए), मानवी कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन (एचसीजी), आणि गोनाडोट्रोपिन रिलीझिंग हार्मोन (जीएनआरएच) हे आहेत.

भारतामध्ये डॉ.एच.एल.चौधरी आणि डॉ.के.एच.अलिकुन्ही यांनी भारतीय प्रमुख कार्प माशांसाठी या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. डॉ.चौधरी यांनी हायपोफायझेशन तंत्र विकसित करणे आणि ते सुधारणे यांमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या तंत्रज्ञानानुसार इतर माशांमधील पिट्यूटरी ग्रंथी अर्क, अंडी तयार करण्यासाठी, प्रजननक्षम माशांमध्ये इंजेक्ट केले जातात. मत्स्यपालनाच्या वातावरणात नैसर्गिक अंडी तयार करण्याच्या पद्धतींच्या आव्हानांवर मात करण्यासाठी ही पद्धत महत्त्वपूर्ण ठरली आहे.

पिट्यूटरी ग्रंथीचा अर्क पीजीए हा माशांच्या प्रजननासाठी महत्त्वाचा मानला जातो. प्रजनन कालावधीत पिट्यूटरी ग्रंथीतील अर्क, ज्यामध्ये ल्यूटिनायझिंग हार्मोन मोठ्या प्रमाणात असतो, तो थेट प्रजनन ग्रंथीवर काम करतो आणि अंड्यांची निर्मिती तसेच शुक्राणूंच्या निर्मितीस चालना देतो. या तंत्राची काही मर्यादा आहेत. पिट्यूटरी ग्रंथीतील संप्रेरकाचे प्रमाण बदलले तर, अर्काचा वापर जास्त झाल्यास संसर्गाचा धोका संभवतो.

Fish Artificial Breeding
Fishing Business Alibaug : ‘मत्स्य व्यवसाय’ला हक्‍काचे कार्यालय

मानवी कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन (एचसीजी)

एचसीजी थेट प्रजनन ग्रंथीवर काम करते, ज्यामुळे अंड्यांचे ओव्हुलेशन आणि प्रजनन प्रक्रिया सुलभ होते. याचे प्रमाण माशाच्या शरीराच्या वजनानुसार ठरवले जाते. साधारणतः १०० ते ४००० आंतरराष्ट्रीय युनिट प्रति किलो असते.

कृत्रिम संप्रेरके (सिंथेटिक हार्मोन्स)

गोनाडोट्रॉपिन रिलीझिंग हार्मोनच्या (जीएनआरएच) ॲगोनिस्ट्सचा माशांच्या प्रजननासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या हार्मोन्सच्या उपयोगामुळे प्रजनन प्रक्रियेत लक्षणीय सुधारणा होते. जीएनआरएच हा प्रजाती-विशिष्ट नसल्यामुळे विविध प्रकारच्या माशांसाठी वापरता येतो. यामुळे रोगप्रसाराचा धोका पूर्णतः टाळता येतो. जीएनआरएच मेंदूवर कार्य करतो, ज्यामुळे ल्यूटिनायझिंग हार्मोन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन यांसारख्या हार्मोन्सच्या स्रावाला चालना मिळते. ही हार्मोन्स पुनरुत्पादक प्रक्रियांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. काही माशांमध्ये डोपामाइनचा परिणाम ल्यूटिनायझिंग हार्मोन सोडण्यास अडथळा निर्माण करतो. यावर मात करण्यासाठी डोपामाइन विरोधी औषधे जसे, की डॉम्पेरिडोन आणि पिमोझाइड यांचा वापर केला जातो. या औषधांचा वापर केल्याने जीएनआरएच चा प्रभाव अधिक चांगल्या प्रकारे दिसतो, ज्यामुळे प्रजनन प्रक्रिया यशस्वी ठरते.

परिपक्व नर परिपक्व मादी

कल्ल्याच्या मागचे कुक्षीपर आतील बाजूस खरखरीत असतात कल्ल्याच्या मागील कुक्षीपर आतील बाजूस गुळगुळीत असतात.

गुदद्वाराचा भाग खड्यासारखा खोल व पांढरा असतो गुदद्वाराचा भाग फुगीर व लाल असतो.

पोट दाबले असता दुधासारखा पांढरा द्रव बाहेर येतो पोट दाबले असता पिवळसर अंडी बाहेर येतात.

- डॉ. स्वप्नजा मोहिते,

९५४५०३०६४२

(मत्स्य जीवशास्त्र विभाग, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी )

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com