River Conservation : नद्यांना मोकळे वाहू द्या...

Rivers Revival : मागील सुमारे २०० ते ३०० वर्षांपासून जसजसा तंत्रज्ञानाचा शोध लागला आणि मानवी वस्ती स्थिरावली, तेव्हापासून याचे प्रमाण वाढल्याचे लक्षात येते. मानवी वसाहती या नदीच्या तीरावरच वसल्या आहे.
River sludge
River sludgeAgrowon
Published on
Updated on

डॉ. सुमंत पांडे

Condition of Rivers : नदीतून गाळ येणे आणि तो प्रवाही होणे हे नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. नदीच्या स्वभावाला ते अनुरूपही आहे. गाळाने सुपीक भूभाग तयार व्हायचा आणि तो पोषणाचा आणि उपजीविकेचे साधन ठरत असे.

मागील लेखात आपण पश्‍चिम घाटातील मातीच्या धुपीचा आयआयटीमधील तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासाचा सारांश आपण पहिला. मातीची धूप आपल्या देशात सर्वदूर आहे आणि ती प्रत्येक नदी खोरे आणि उपखोरे यांच्यात आहे, त्याची तीव्रता भिन्न आहे.

सबब त्याचा अभ्यास आणि व्यवस्थापन विकेंद्रित पद्धतीने होणे गरजेचे ठरते. मातीची होणारी धूप हा आजही विचार करायला लागणारा विषय आहे. येत्या दशकामध्ये तर याचे गंभीर परिणाम दिसणार असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

मागील सुमारे २०० ते ३०० वर्षांपासून जसजसा तंत्रज्ञानाचा शोध लागला आणि मानवी वस्ती स्थिरावली, तेव्हापासून याचे प्रमाण वाढल्याचे लक्षात येते. मानवी वसाहती या नदीच्या तीरावरच वसल्या आहे.

जसजसा शहरीकरणाचा वेग वाढतो आहे, त्याप्रमाणे निवासासाठी घरे आणि वाढलेल्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी मूलभूत सुविधा वाढत आहेत, जसे की रस्ते, पूल, बांधकामे इत्यादींचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.

नद्यांची वाहन क्षमता कमी झाल्याने पूर

शेतातून डोंगर उतारावरून वाहून आलेला गाळ हा थेट नदीपात्रामध्येच साचतो किंवा त्या ओढ्याच्या अथवा छोट्या नद्यांच्या प्रवाहावर बांधण्यात आलेल्या तलावांवर धरणांच्यामध्ये तो साठतो. यामुळे नद्यांची वहन क्षमता जवळपास निम्म्याने कमी झालेली आहे.

पर्जन्याची सरासरी पाहता ते प्रमाण स्थिर असल्याचे जाणवते, किंबहुना पावसाळ्याचे दिवस आणि तास कमी झाले असून, सरासरी पाऊस तितकाच आहे. म्हणजे कमी कालावधीमध्ये अधिक पाऊस असा पावसाचा स्वभाव बनला आहे.

परिणामी, गाळ मोठ्या प्रमाणावर वाहून येत असल्यामुळे नद्यांचे पात्र उथळ झाल्याचे आढळते. ही नक्कीच चिंताजनक बाब आहे. केवळ पश्‍चिम घाट नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र या प्रभावाखाली आहे. किंबहुना, देशाचा हा गंभीर प्रश्‍न बनला आहे.

River sludge
Aner River Bridge : अनेर नदीवरील पूल बनला धोकादायक

धुपेचा जागतिक अभ्यास

या विषयाचा अभ्यास करत असताना जागतिक स्तरावर सर्व समान अशी एक पद्धती विकसित करण्यात आलेली आहे या पद्धतीस ‘यूएसएल’ असेही म्हणतात. जागतिक मातीच्या वाहून जाण्याचे समीकरण असे काहीसे त्याचे भाषांतर होते.

पश्‍चिम घाटाच्या प्रदेशातील मातीच्या वाहून जाण्याचा अभ्यास केलेला असून, त्याचा अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्यानुसार सर्वसाधारणपणे १९९० ते २०२० या तीस वर्षांच्या कालावधीमध्ये जवळपास शंभर टक्के किंवा त्याहून अधिक माती वाहून जाण्याचे प्रमाण असल्याचे अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात.

अभ्यासासाठी वापरण्यात आलेली प्रणाली

या अभ्यासासाठी पूर्वी चर्चिल्याप्रमाणे उपग्रहाकडून प्राप्त असणाऱ्या माहितीचा आणि आकडेवारीचा उपयोग करून मातीच्या वाहून जाण्याच्या प्रमाणाचा अंदाज करण्यात आलेला आहे. तज्ज्ञांच्या मते त्याची अचूकता ही सुमारे ८० टक्के असायला हवी.

‘यूएसएल' ही जागतिक स्तरावरची प्रणाली यासाठी वापरण्यात आलेली आहे. या प्रणालीमध्ये विशेषतः पाच गोष्टींची माहिती एकत्रित करण्यात येऊन त्याचा अभ्यास आणि त्यानुसार त्याचे निष्कर्ष काढले जातात.

पर्जन्यमान

टॉपोग्राफी

मातीच्या क्षरणाची तीव्रता

विशिष्ट भूभागावर असलेल्या वृक्षराजी आणि आच्छादनांचे व्यवस्थापन.

शेतीच्या आणि संधारणाच्या पद्धती

उपग्रह आणि सुदूर संवेदन प्रणाली

मागील ५० ते ६० वर्षांपासून उपग्रहांचा वावर अवकाशात वाढलेला आहे. सुरुवातीला अमेरिकेच्या माध्यमातून सोडण्यात आलेल्या उपग्रहाचा वापर या कारणासाठी करत येत असे. त्या उपग्रहाचे त्या त्या वेळेसचा दररोजचा किमान एक नकाशा तरी उपलब्ध आहे असे तज्ञ सांगतात. मागील ३० वर्षांमध्ये भारताने देखील आपल्या उपग्रहाच्या माध्यमातून आणि इतर देशांनी अवकाशात सोडलेल्या उपग्रहाकडून प्राप्त होणाऱ्या माहितीचे एकत्रीकरण करून त्यांचे संश्‍लेषण करून त्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

पर्जन्यातील अचूकता, वादळांची तीव्रता, इत्यादी बाबींचे पूर्वानुमान त्यामुळेच आपल्याला कळण्यास मदत होते. या तंत्रज्ञानाचा उपयोग चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये केल्यामुळे जीवितहानी आणि वित्तहानी बऱ्याच अंशी टाळता येऊ शकत आहे.

तंत्रज्ञानाचा वापर करून पश्‍चिम घाटातील असलेल्या राज्यातील वरील उल्लेख केलेल्या पाच बाबींवरील माहिती एकत्र करून त्यांचा मागील तीस वर्षांचा तौलनिक अभ्यास करून आपल्यासमोर मांडला आहे.

धूप हा राष्ट्रीय प्रश्‍न

मातीच्या वाहून जाण्याच्या तीव्रतेचा प्रश्‍न केवळ पश्‍चिम घाटापुरताच मर्यादित नाही. तो पश्‍चिम घाटाच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तेथे असलेली दुर्मीळ वनस्पती, वृक्षराजी, पशू, पक्षी यांच्या अधिवासावर विपरीत परिणाम यामुळे होणार आहे.

त्यामुळे तेथील परिस्थिती आणि जैवविविधता यांच्यावरील विपरीत परिणाम कमी होण्यासाठी या अभ्यासाचा लोकसंवाद लोक ज्ञान आणि त्या अनुरूप बदल अंगीकार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

River sludge
River Ecosystem : समजून घेऊ नदीची परिसंस्था

नेमके काय करावे?

नदीची जागा नदीला

नदी प्रवाहात, नदी खोऱ्यात, आणि नदीच्या पात्रालगत असणाऱ्या गाव आणि शहरांची ही प्राथमिक जबाबदारी आहे. नदीला वाहण्यासाठी नदीची स्वतःची जागा तिला सोडणे गरजेचे आहे. आपण नदीला आपल्या आयुष्यामध्ये मातेसमान दर्जा दिलेला आहे आणि प्रत्यक्षात तिच्याशी वर्तन करताना आपण आपल्या आईशी वर्तन करतो असे सिद्ध होत नाही.

नदी क्षेत्रात असणाऱ्या ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, महानगरपालिका, घटक मंडळांनी आपल्याकडे असलेल्या मनुष्यबळाचा वापर करून या बाबींवर स्वतंत्र लक्ष देण्यासाठी सक्षम आणि प्रशासनास आणि जनतेस उत्तरदायी असणारी यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे.

गाळमुक्त प्रवाह आणि जलस्रोत

जेथे गाळ साचला आहे अशा ठिकाणच्या जलाशयातील गाळ काढणे हे अति प्राधान्याच्या बाबी ठरतात. शासनाने दोन महत्त्वाचे उपक्रम आणि योजना या कामासाठी निर्धारित केल्या आहेत, त्यामध्ये जलयुक्त शिवार अभियान याचा दुसरा टप्पा आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हे कायमस्वरूपी योजना असे हे ते दोन उपक्रम आहेत.

छोट्या नद्या प्रवाहित ठेवा

ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्या प्रशासकांनी आणि कारभाऱ्यांनी याची नोंद घ्यावी. आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या नदीच्या प्रवाहाच्या छोट्या नद्या, ओढ्या, नाल्यांच्याकडे लक्ष देणे अपरिहार्य ठरते.

छोट्या नद्या आणि ओढ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष

नदी म्हणजे केवळ पाणी नव्हे नदी म्हणजे प्रवाह आणि संपूर्ण परिसंस्था आहे नदीला येऊन मिळणाऱ्या छोट्या छोट्या ओढ्यांची संख्या अगणित असते.

प्रवाहाच्या नोंदी ठेवाव्यात

ओढ्याची नोंद प्रत्येक पंचायत, नगर परिषदा, महानगरपालिकांनी आपल्या नोंदवहीमध्ये ठेवणे गरजेचे आहे. खासगी मालकीच्या जागा असल्यास त्या अधिग्रहीत करण्यासाठी प्रयत्न करावेत.

नदीच्या किनारी फलक

नदीचा प्रवाह असेल तेथे स्पष्टपणे फलक लावणे गरजेचे आहे. म्हणजे लोकांना लक्षात येईल की हे पात्र नदीला मिळणाऱ्या ओढ्याचे, नाल्यांचे आणि नद्यांचे आहे. या ठिकाणी अतिक्रमण केल्यास, कचरा टाकल्यास प्रदूषण केल्यास आपल्याला शास्ती होईल आणि जबर दंड होऊ शकेल.

मातीचा थर

ग्रामीण भागातील शेती क्षेत्रामध्ये देखील हीच परिस्थिती कमी अधिक फरकाने दिसते आहे. दरडोई शेतीचे असलेले प्रमाण कमी होत आहेत. त्यामुळे शेतामध्ये असलेले बांध जे पूर्वी किमान एक मीटर रुंदीचे बांध असावयाचे, आता बऱ्याच ठिकाणी बांध दिसतच नाहीत.

याला काही अपवाद नक्कीच आहेत. काही जिल्ह्यांतील कृषी अधिकाऱ्यांनी याबद्दल विशेष अभियान घेऊन प्रत्येक शेताची बांधबंदिस्ती करण्यावर भर दिलेला आहे. परंतु बंध नसणे या एकाच कारणामुळे जर दरवर्षी एक ट्रक माती एका हेक्टरमधून वाहून जात असल्यास नुकसान कोणाचे हा विचार करायला नको का?

माती तयार व्हायला किमान एक हजार वर्षे लागतात. पाणलोट हा घटक बनून नियोजन करणे गरजेचे आहे. पाणलोट हा घटक मानून संबंधित ओढ्याच्या क्षेत्राचे नियोजन करणे गरजेचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com