
Chh. Sambhajinagar News : ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘आरोग्य मित्र’ उपक्रम राबविण्यात येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मंगळवारी केले. बालविवाह रोखण्याची मोहिम प्रभावीपणे राबवावी असे आवाहनही त्यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशवी काढणे तसेच त्यांच्या आरोग्य समस्या, बालविवाह, महिला अत्याचार याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांनी आढावा घेतला.
यावेळी आयोगाच्या उपसचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
बीडसह मराठवाडयातील अनेक जिल्ह्यात ऊसतोड महिला कामगार स्थलांतर करतात, त्यांच्या आरोग्याच्या अनेक समस्या समोर आल्या आहेत, यासाठी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या संकल्पनेतून यावर्षी ‘आरोग्य मित्र’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलेसाठी त्याच समुहातील एकाची आरोग्य मित्र म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे.
आरोग्य मित्र ऊसतोड महिलेला येणाऱ्या आरोग्याच्या समस्याबाबात गावातील आशासेविका तसेच अंगणवाडी सेविकांच्या संपर्कात असेल. यातून ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलांना आरोग्याच्या सेवा तत्परतेने देणे शक्य होणार आहे, ही अभिनव संकल्पना नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास श्रीमती चाकणकर यांनी व्यक्त केला.
ऊसतोड महिलांनी गर्भपिशवी काढण्याच्या प्रकाराबाबतही श्रीमती चाकणकर यांनी नाराजी व्यक्त केली. महिलांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलांना सहकार विभागाने आरोग्यासह त्यांना आवश्यक सोईसुविधा देण्यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश श्रीमती चाकणकर यांनी यंत्रणेला दिले.
श्रीमती चाकणकर म्हणाल्या, महिला आयोगाच्यावतीने राज्यात बालविवाह, गर्भलिंग निदानचाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, विधवा, एकल महिला यांच्या समस्या आदींबाबत जनजागृती करण्यात येत आहे. बालविवाह रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या कामामध्ये गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांची महत्वाची भूमिका असून गावातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कोणाच्या दबाबाला बळी न पडता बालविवाह आदी कुप्रथा रोखण्यासाठी संकल्प करावा. बालविवाहाची कुप्रथा रोखणे हे सर्वांचे कर्तव्य असून बालविवाह रोखण्याची मोहिम प्रभावीपणे राबवावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.