
Dharashiv News : येत्या पावसाळ्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतीही पावसाच्या पाण्यावर केली जाते. बहुतांश शेतकरी हे कोरडवाहू पद्धतीने शेती करतात. शेतकऱ्यांना या वर्षी चांगले उत्पादन झाले पाहिजे, यासाठी खरीप हंगामात जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना खत बी बियाणे खरेदी करताना अडचण येणार नाही, याची दक्षता घेऊन खत, बी बियाण्यांचा वेळेत पुरवठा करावा, असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
नियोजन समिती सभागृहात गुरुवारी (ता. एक) आयोजित खरीप हंगामपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलिस अधीक्षक संजय जाधव व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने उपस्थिती होते.
श्री. सरनाईक म्हणाले, ‘‘खरिपात जिल्ह्यासाठी महाबीजच्या ज्या बियाण्यांची आवश्यकता आहे, त्याची मागणी आताच करावी. त्यासाठी पाठपुरावा करावा. आपण स्वतःही त्यासाठी महाबीजच्या महाव्यवस्थापकांशी बोलणार आहोत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोगस खताच्या पुरवठा होणार नाही, याची दक्षता आतापासूनच घ्यावी. खतांची तपासणी करण्यात यावी. बोगस खत विक्री होत असल्याचे लक्षात आल्यास कंपनी विरोधात कारवाई करावी.
खत तपासणीसाठी किट उपलब्ध द्यावी.’’ जिल्ह्यातील पीक पद्धतीत बदल करण्यासोबत शेतकऱ्यांना केळी लागवडीसाठी प्रोत्साहित करावे, अशी सूचना खासदार राजेनिंबाळकर यांनी केली. उमरगा व लोहारा तालुक्यात अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मोबदला लवकर मंजूर करण्याची मागणी आमदार स्वामी यांनी केली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माने यांनी सरलेल्या आर्थिक वर्षात मनरेगा व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून एक हजार ६४१ हेक्टरवर फळबाग लागवड, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत १२० प्रकरणे मंजूर, बारा शेतबांधावर प्रयोगशाळांची निर्मिती, बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातून तीस हजार ४३२ मॅट्रिक टन क्षमतेच्या गोदामाची उभारणी केल्याचे सांगून जनजागृतीमुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनचे तीन लक्ष ६५ हजार क्विंटल घरगुती बियाणे वापरण्याचे सांगितले.
अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे कौतुक
कृषी विभागातील महत्त्वाच्या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या व वितरित करण्यात आलेला निधी, पर्जन्यमान, दहा वर्षांत महसूल मंडळात झालेली तालुकानिहाय अतिवृष्टी, खरीप हंगामात प्रस्तावित क्षेत्र उत्पादन व उत्पादकता, जिल्ह्यातील उसाखालील लागवड क्षेत्र, ऊस पिकामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, बियाण्यांचे नियोजन, खरीप २०२४ मध्ये शेतकऱ्यांनी राखून ठेवलेले सोयाबीन बियाणे, खरीप हंगामासाठी खताची मागणी व पुरवठा, पाच खरीप हंगामात जिल्ह्यात केलेला खताचा वापर, यंदाचा खत मंजूर आवंटन, खताचा संरक्षित साठा, तक्रारींची दखल घेण्यासाठी भरारी पथके, जिल्ह्यात राबविण्यात आलेले नावीन्यपूर्ण उपक्रम, पाच वर्षात आंबा फळपिकाची अपेडा प्रणालीवर केलेली शेतकऱ्यांची नोंदणी, ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणीची माहिती माने यांनी दिली.जिल्ह्यात माने यांच्या नेतृत्वात कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारे काम करीत असल्याबद्दल सरनाईक व खासदार राजेनिंबाळकर यांनी त्यांचे कौतुक केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.