Akola News : यंदाच्या खरीप हंगामात पावसात पडलेला खंड व सरासरीपेक्षा कमी पावसामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले. यामुळे जिल्हास्तरीय संयुक्त समितीने सप्टेंबरमध्ये पीकविमा कंपनीला २५ टक्के अग्रिम भरपाई देण्याचे निर्देश दिले होते. पीकविमा कंपनीने अखेरीस याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील ५२ महसूल मंडलांत ही मदत दिली जाणार आहे.
पंतप्रधान पीकविमा खरीप योजनेत शासनाच्या अधिसूचनेनुसार ही नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एचडीएफसी ॲग्रो पीकविमा कंपनीला दिले आहेत.
जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाईचा मुद्दा गेले दीड महिना चर्चेत होता. कंपनीने अपील दाखल करीत काही आक्षेप घेतले होते. मात्र, प्रशासनाने त्याचे तातडीने उत्तर दिल्याने अखेर पीकविमा कंपनीने अग्रिम देण्यास सहमती दर्शवली. त्यामुळे सोयाबीन पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीअंतर्गत सर्व ५२ महसूल मंडलांतील दोन लाख ११ हजार ९६८ शेतकऱ्यांना २ लाख १६ हजार २३२ हेक्टर क्षेत्रासाठी अंदाजे १२२ कोटी रुपये नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा कंपनीकडून जमा होणार आहे.
अकोला जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाचा खंड व सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याने तालुकास्तरीय संयुक्त समितीमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सोयाबीन पिकाच्या उत्पादनामध्ये घट दिसून आली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत हंगामातील प्रतिकूल (mid season Adversity) २५ टक्के विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अदा करण्याची अधिसूचना ६ सप्टेंबर रोजी लागू केली.
आता एचडीएफसी अॅग्रो कंपनीने भरपाई देण्यास सुरुवात झाली असल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यात २ लाख १६ हजार २३२ हेक्टर क्षेत्रावर पीक विमा काढलेला असून जवळपास ९५ टक्के सोयाबीन क्षेत्राचा विमा काढण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.