
Kharif Season 2025 Nanded District : नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ मध्ये शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे, खते व कीटकनाशके मिळण्यासाठी बाजारात उपलब्ध होणार्या बियाणे, खते व कीटकनाशक विक्रेते व उत्पादक यांच्या नियमित तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी नांदेड जिल्ह्यात जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुकास्तरावर १६ असे एकूण १७ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
खरीप हंगामामध्ये कृषिसेवा केंद्रचालक किंवा खासगी एजंटामार्फत शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे खते बियाणे व कीटकनाशके शेतकऱ्यांना विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी कृषी विभागाकडून कृषी सेवा केंद्राची नियमित तपासणी करण्यात येत असते. सर्व निविष्टींचे व्यवस्थित वाटप व चांगल्या प्रतीच्या निविष्ठा शेतकऱ्यांना मिळतील, शेतकऱ्यांची निविष्ठासाठी अडवणूक होणार नाही यासाठी भरारी पथक काम करणार आहे.
त्याचबरोबर कृषी निविष्ठा विक्रीमध्ये गैरव्यवहार, साठेबाजी, जादा दराने विक्री असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास उत्पादक, विक्रेत्यांचे परवाने निलंबित किंवा रद्द करण्यात येतील. तसेच गैरव्यवहाराचे स्वरूप गंभीर असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा बोगस बियाणे, खते व कीटकनाशकांची विक्री केल्यास संबंधिताविरुद्ध भरारी पथकामार्फत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत. तालुकास्तरावर भरारी पथकामध्ये तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती, निरीक्षक वजन व मापे व मंडळ कृषी अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच जिल्हास्तरीय भरारी पथकात कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, वजन मापे निरीक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे. येणाऱ्या खरीप हंगामामध्ये मोहीम राबवून रॅडमली कृषी निविष्ठा विक्रेते व उत्पादकांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत.
त्यामध्ये अनियमितता आढळून आल्यास संबंधितांचा परवाना निलंबित अथवा रद्द करण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही निविष्ठा विक्रेत्यांनी गैरव्यवहार, साठेबाजी, जादा दराने विक्री, बोगस खते बियाणे विक्री करू नये, असे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुद्ध कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदी करताना काही अडचणी येत असतील किंवा विक्रेत्यांकडून अडवणूक होत असेल, तर तत्काळ संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
अप्रमाणित बियाण्यांची विक्री प्रकरणी ३२ खटले
मागील वर्षात कृषी विभागामार्फत नांदेड जिल्ह्यात बोगस खते विक्री केल्यामुळे तीन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चालू वर्षात एक फौजदारी गुन्हा हिमायतनगर येथे दाखल झाला आहे. बियाण्यांची अनधिकृत विक्री केल्यामुळे एका बियाणे उत्पादकावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच अप्रमाणित बियाण्यांची विक्री केल्यामुळे उत्पादक व कृषी सेवा केंद्रचालक यांच्या विरुद्ध ३२ न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.