Pune News : राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २१ मतदार संघातील ३०३ उमेदरांसाठी आज (ता. २०) मतदान होत आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. सर्वांनी मतदान करून कर्तव्य बजावावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण २१ मतदार संघ आहेत. यामध्ये ग्रामीणमध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, दौड, इंदापूर, बारामती, इंदापूर, भोर, मावळ यांचा समावेश आहे. तर पुणे शहरांमध्ये शिवाजीनगर, वडगावशेरी, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कँन्टोमेंट, कसबा, तर पिंपरी चिंचवडमध्ये चिंचवड, पिंपरी व भोसरी हे मतदार संघ आहेत. जिल्ह्यातील सुमारे ८८ लाख ४९ हजार ५९० मतदार ८४६२ मतदान केंद्रांवर आपले मतदान करतील. जिल्ह्यात ४५ लाख ७९ हजार २१६ पुरुष मतदार, तर ४२ लाख ६९ हजार ५६९ महिला मतदार आहेत.
यंदा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ४८२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १७९ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले होते. जिल्हा प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली असून, शांततेत आणि पारदर्शक वातावरणात मतदान होण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मतदान केंद्रांची तयारी पूर्ण
प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदारांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक नेमले असून, पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सुविधा बूथ’ची स्थापना केली आहे.
सुरक्षा व्यवस्था कडक
पुणे जिल्ह्यातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलिस कर्मचारी, केंद्रीय राखीव दल, तसेच गस्त पथके तयार ठेवली आहेत. मतदानादरम्यान कोणत्याही अनुचित प्रकारास तोंड देण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. त्यासाठी सुमारे दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय संशयितांवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. जिल्ह्यात १८ ते २१ वयोगटातील सुमारे १.२ लाख तरुण मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.
मतदानासाठी शासकीय सुट्टी
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करता यावे आज (बुधवारी) उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत सर्व आस्थापनांतील अधिकारी, कर्मचारी, कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने उदा. खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व अन्य आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदींना ही सुट्टी किंवा सवलत लागू राहील.
मतदानासाठी १२ पुरावे महत्त्वाचे
मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रासह, निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये आधार कार्ड, मनरेगाअंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र (जॉब कार्ड), बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक,
श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), स्थायी खाते क्रमांक (पॅन कार्ड), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे,
केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र या १२ पुराव्यांचा समावेश आहे.
मतदान केंद्रात मोबाईलला बंदी
मतदानाचे चित्रीकरण, छायांकन करून गोपनीयता भंग करणे हा निवडणूक विषयक गुन्हा आहे. त्यादृष्टीने मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे. मतदानावेळी मतदान केंद्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतदानाची गोपनीयता भंग होऊ नये, यासाठी मतदारांनी मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाऊ नये. मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन व्हावे, असे आवाहन केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.