डॉ. चंद्रशेखर पवार , डॉ. सतीश पाटील
Watershed Irrigation Index : निवडलेल्या गावाचा गटनिहाय सर्व्हे केल्यानंतर पाणी अडविण्याचे वेगवेगळे उपचार सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये नमूद केले जातात. साहजिकच उतारानुसार कृषी विभाग व इतर संबंधित विभाग मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे वेगवेगळे उपचार प्रस्तावित केले जातात.
त्याचे क्षेत्रावरील उपचार किंवा ओघळींवरील उपचार असे दोन प्रकार पडतात. क्षेत्रिय उपचारांमध्ये सलग समतल चर, अनघड दगडी बांध, खंडित चारी इ. यांचा समावेश होतो. तर ओघळींवरील उपचारांमध्ये मातीनाला बांध, सिमेंट बांध, गॅबियन बंधारा इ. उपाययोजना करण्यात येतात.
दोन्ही प्रकारच्या उपचारातून त्या गावातील पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण उपलब्ध पाण्याच्या अपधावेच्या सरासरी ७० टक्के अपधाव अडविण्याच्या उद्देशाने कोणते उपचार अधिक प्रभावी ठरतील, याचा विचार करून प्रस्तावित आराखडे तयार करण्यात येतात. या ठिकाणी आपण मातीनाला बांध किंवा सिमेंट बंधारा या उपचाराचा विचार करू.
हा उपचार ज्या ठिकाणी प्रस्तावित केला आहे, त्या ठिकाणी एकूण उपलब्ध होणाऱ्या अपधावेपैकी साधारणपणे एक टीसीएम म्हणजेच साधारणपणे दहा लाख लिटर पाण्याचा साठा निर्माण होईल अशी जागा निवडली जाते. सरासरी पर्जन्य काळामध्ये हा बंधारा दोन-तीन वेळा ओसंडून वाहू शकतो. मात्र ही गोष्ट त्या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या पर्जन्यावर अवलंबून आहे.
यामुळे काही अंशी अधिकचा पाणीसाठा देखील उपलब्ध होऊ शकतो. तांत्रिकदृष्ट्या योग्य जागी सिमेंट किंवा मातीनाला बांध असेल, तर बंधाऱ्यामधील पाण्याची साठवण क्षमता ही कमी अधिक बदलू शकते. एखाद्या गावामध्ये एकूण प्रस्तावित केलेले उपचार व त्या माध्यमातून निर्माण होणारा जलसाठा याद्वारे जलसंकल्प तयार केला जातो.
त्याप्रमाणे उपचारदेखील प्रस्तावित केले जातात. उपचारांच्या अंमलबजावणीमुळे जलसाठा हा तयार होतो आणि त्याचा परिणाम त्या पाणलोट क्षेत्रातील सिंचन क्षमतेवर होतो. काही गावांमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या सिंचन साधनांमुळे काही अंशी जमीन सिंचनाखाली असते. पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे यामध्ये अधिक भर पडते. ही त्या परिसराच्या सिंचनक्षेत्रामध्ये होणारी वाढ जाणून घेण्यासाठी आपल्याला सिंचन निर्देशांक उपयोगी ठरतो. त्याचे गणितीय सूत्र खालील प्रमाणे...
सिंचनाचा निर्देशांक २ = वाढलेले एकूण सिंचित क्षेत्र % नव्याने वाढलेले निव्वळ सिंचित क्षेत्र
या सूत्राचा वापर कशाप्रकारे करायचा, हे पाहण्यासाठी एखाद्या उपचारीत गावाचे उदाहरण घेऊ.
एका गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र २६०० हेक्टर आहे. त्यापैकी ३३० हेक्टर जमीन ही पूर्वीपासूनच सिंचनाखाली (सिंचित क्षेत्र) आहे. त्या गावात झालेल्या पाणलोट विकासाच्या उपचारांमुळे सिंचनाखालील क्षेत्रामध्ये १३० हेक्टरची वाढ झाली आहे. म्हणजेच त्या गावात झालेल्या पाणलोट क्षेत्र उपचारानंतर वाढलेले एकूण सिंचित क्षेत्र हे ३३० + १३० = ४६० हेक्टर झाले.
ही माहिती वरील सूत्रामध्ये भरल्यानंतर
सिंचनाचा निर्देशांक २ = ४६०% १३० = ३.५४
पाणलोट क्षेत्राच्या उपचारानंतर तेथील सिंचनाचा निर्देशांक हा ३.५४ आला.
हा निर्देशांक एक पेक्षा जितका जास्त येईल, तितका गावाला त्या उपचारांचा सिंचनाच्या संदर्भामध्ये अधिक फायदा झाला, असे म्हणता येते.
वरील उदाहरणामध्ये पूर्वीची सिंचन क्षमता एकूण भौगोलिक क्षेत्राच्या १३ टक्के इतकी होती. तिथे पाणलोटाचे उपचार शास्त्रीय पद्धतीने केल्यानंतर ती सिंचन क्षमता १८ टक्के इतकी पोहोचली. म्हणजेच सिंचनाखालील क्षेत्रामध्ये सरासरी पाच टक्के वाढ झाली.
पाण्याचा योग्य वापर
सिंचनाचा निर्देशांक काढण्याचे सूत्र अत्यंत सोपे असले तरी त्यातून आपल्याला आपण पाणलोट विकासासाठी निवडलेल्या गावामध्ये वाढलेल्या सिंचनक्षमतेचा नेमका अंदाज येतो. त्या निमित्ताने गावाची सिंचन संदर्भातील पूर्वपरिस्थिती नोंदवली जाते. तिच्याशी तुलना करून आपण केलेल्या उपचारांचा नेमका किती लाभ गावाला झाला, हे कळू शकते.
संबंधित गावामध्ये एकदा पाणलोट क्षेत्र विकासाद्वारे तयार झालेली किंवा वाढलेली सिंचन क्षमता शाश्वत टिकविण्यासाठी एकत्रितरीत्या प्रयत्न करावे लागतात. हे त्या ग्रामपंचायतीचे किंवा पाणलोट समितीचे आद्य कर्तव्य आहे. पाण्याचा योग्य वापर करण्याऐवजी केवळ पाणी आले म्हणून सर्वांनी नगदी पिके घेत गेल्यास ही बदललेली पीक पद्धती गावाच्या दृष्टिकोनातून विध्वंसक ठरते.
हा वाईट अनुभव अनेक गावातून आला आहे. पाणलोट क्षेत्र विकासातून पाणी वाढले तरी ते योग्य प्रकारे न जपल्यामुळे सरतेशेवटी त्या गावातील संपूर्ण पाणलोट कार्यक्रम अयशस्वी ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्याला कोंबडी एकदाच कापून खायची की तिची अंडी खात वा पिले वाढवत दीर्घकाळ फायदा घ्यायचा, हे प्रत्येक गावातील शहाण्यासुरत्यांनी ठरवले पाहिजे.
आता आपण दुसरे उदाहरण म्हणून आपण पुनर्भरण खड्डा (Recharge Shaft) या उपचाराचा संदर्भ घेऊ.
रिचार्ज शाफ्टमुळे साधारणपणे आजूबाजूच्या परिसरातील भूजलामध्ये वाढ होते. त्याचा फायदा आजूबाजूच्या किमान तीन ते चार हेक्टर जमिनीस होतो. या पुनर्भरण खड्ड्याची योग्य डागडूजी व व्यवस्थापन केल्यास किमान १२ ते १५ वर्षे चांगला लाभ मिळत राहतो. मात्र पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर शेतकऱ्यांचा कल हा पारंपरिक पिकांऐवजी नगदी पिकांकडे असतो. अशी नगदी पिके घेतल्यास पाणीपातळी पूर्वीपेक्षा खाली जात असल्याची निरीक्षणे तत्कालीन नियोजन आयोगाने (निती आयोग) २००१ मध्ये नोंदविली आहेत.
डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (इंदिरा महाविद्यालय, ताथवडे, पुणे.)
डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.