.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील
Assessment of Catchment Area : पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनानंतर पाण्याची सोय झाल्यामुळे शेती व पूरक व्यवसायामध्ये बदल होतात. पिकांमध्ये नगदी व अधिक उत्पन्न देणारी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये बदल होऊन नवे सुधारीत तंत्रज्ञान वापरले जाऊ लागते. त्यातून कामाची सुलभता आणि शेतांची उत्पादकता वाढते.
शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होते. ही आर्थिक संपन्नता नेमकी किती आली, याचे मोजमाप करण्यासाठी उपक्रमासाठी किंवा तंत्रज्ञानासाठी केलेल्या खर्चाच्या उपयुक्ततेचा निर्देशांक (Enterprise Cost Effectiveness Index, ECEI) महत्त्वाचा ठरतो.
या निर्देशांकाच्या अभ्यासासाठी सोयाबीन पिकाची निवड केली. केव्हीके, जालना यांनी मार्गदर्शन केलेल्या ५० शेतकऱ्यांच्या २० हेक्टर क्षेत्रातून सोयाबीनच्या मिळालेल्या आर्थिक उत्पन्नाची माहिती घेतली. तर तुलनात्मक अभ्यासासाठी जालना जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक सुधीर पोहेकर यांच्या त्या पिकातील आर्थिक उत्पन्नाची माहिती घेतली.
केव्हीकेच्या मार्गदर्शनाखालील क्षेत्रातून मिळालेला निव्वळ नफा प्रति हेक्टरी १,०१ १५८ रुपये इतका आला. पिकाचा एकूण खर्च १,२९,४५८ रुपये असला तरी त्यातील एकात्मिक कीड व्यवस्थापन या अंतर्गत सुधारीत तंत्रज्ञानासाठी झालेला खर्च २८,३०० रुपये होता. सोयाबीनचे एकूण उत्पादन हेक्टरी २६.४२ क्विंटल इतके आले.
या पाणलोट क्षेत्राबाहेरील व मार्गदर्शनाचा लाभ न झालेल्या एका शेतकऱ्याचा (सुधीर पोहेकर) ताळेबंद तुलनेसाठी घेण्यात आला. त्यानुसार सुधीर पोहेकर यांच्या एक हेक्टर सोयाबीनमधून मिळालेला निव्वळ नफा ६२,००० रुपये आहे, तर त्यांचा एकूण उत्पादन खर्च ७५,१०० रुपये असला तरी त्यात त्यांनी वापरलेल्या कीडनियंत्रण उपक्रमाचा खर्च १३,१०० रुपये होता. निघालेले सोयाबीनचे उत्पादन २० क्विंटल इतके होते. केव्हीकेच्या मार्गदर्शनाखालील सोयाबीन क्षेत्रातून मिळालेले उत्पन्न हे मार्गदर्शन नसलेल्या शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये २० टक्केपेक्षा अधिक होते.
तर सोयाबीनच्या एकूण उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर केलेला खर्च व त्यापासून मिळालेला फायदा याचे गुणोत्तर हे कमी तंत्रज्ञान वापरलेल्या क्षेत्रापेक्षा ३.७१ इतके अधिक होते. केव्हीकेच्या मार्गदर्शनाखाली केलेले हे एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे प्रयोग फायदेशीर ठरले आहेत. या प्रयोगासाठी केव्हीकेचे शास्त्रज्ञ पंडित वासरे यांच्या मार्गदर्शन प्राप्त झाले होते. तुलनात्मक अभ्यासासाठी उपरोक्त नमूद केलेले दोन्ही शेती क्षेत्र सिंचित होते. सिंचनाची शाश्वती नसल्यामुळे अवर्षणप्रवण क्षेत्रांमध्ये आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना सरासरीइतकेही उत्पादन मिळत नाही.
पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन व उत्पादकता
प्रामुख्याने अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये पाणलोट विकासाची कामे केली जातात. या कार्यक्रमांमध्ये सिंचनासाठी पाणी व अन्य नैसर्गिक स्रोतांच्या उपलब्धता होते. परिणामी शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी नगदी किंवा आर्थिकदृष्ट्या अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळतात. अनेकदा ऊस लागवड वाढते. पारंपरिक पिके व वाण परिसरातून कमी होत नाहीशी होतात. मात्र ठराविक काळातच भूजल अधिक उपसले गेल्याने पुन्हा दुष्काळाचे सावट ओढवते.
उसाचेही उत्पादन व उत्पन्न कमी होते, असे नियोजन आयोगाच्या (सध्याचा नीती आयोग) २००१ च्या अहवालात नमूद केले आहे. अधिक पाणी उपसावे लागू नये म्हणून कमी पाण्यावर येणाऱ्या पिकातूनही नवे, सुधारित तंत्रज्ञानाच्या वापरानेही उत्पन्नामध्ये वाढ करता येते. हे वरील उदाहरणातून दिसून येते. एखाद्या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आपण करत असलेला खर्च किती उपयुक्त ठरतो, हे उपक्रमासाठी केलेल्या खर्चाच्या उपयुक्ततेचा निर्देशांकाद्वारे समजू शकते.
पाणलोटाच्या विकासानंतर उपलब्ध झालेल्या पाण्याचा अतिशय काटेकोरपणे वापर केला तर अधिक शाश्वत उत्पादन व उत्पन्न मिळवता येते. मात्र बहुतांश गावे ही पाण्याच्या उपलब्धतेनंतर ऊस लागवडीकडे वळतात. परिणामी त्या परिसरातील पारंपरिक पिके, स्थानिक जैवविविधता धोक्यात येते. त्यातही उसाला चांगला दर मिळतो, असा एक गैरसमज शेतकऱ्यांमध्ये आहे. (त्याचेही विश्लेषण कधीतरी करावे लागणार आहे.) वर्ष दीड वर्षे शेत अडकवून ठेवणाऱ्या आणि अधिक पाणी लागणाऱ्या ऊस पिकाऐवजी पिकांची वारंवारिता ( वार्षिक तीन ते पाच पिके) वाढवल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न नक्कीच अधिक असते.
हे हिवरे बाजार येथील पारंपरिक पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. उसासारख्या अधिक पाणी खेचणाऱ्या पिकांवर या ग्रामस्थांनी ग्रामसभेद्वारे बंदी घातली आहे. दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चत असते. त्याच वेळी आपलीही त्या पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याची जबाबदारी असते. राज्य व केंद्र शासनानेही शेतकऱ्यांचे पीकनिहाय प्रशिक्षण व क्षमता बांधणी करणे गरजेचे आहे. केवळ योग्य मार्गदर्शन वेळीच मिळाले तरी शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ झाली आहे. या प्रयोगामुळे जिल्ह्यामध्ये कपाशी, सोयाबीन, द्राक्ष या पिकांचे उत्पन्न प्रमाणित सरासरी इतके वाढले असल्याचे केव्हीकेतील शास्त्रज्ञ पंडित वासरे यांनी सांगितले.
डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (इंदिरा महाविद्यालय, ताथवडे, पुणे.), - डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.