Finland Banking System : फिनलँडमधील सक्षम सहकारी बँकिंग व्यवस्था

Finland Country : फिनलँडमध्ये ओपी ग्रुप, नॉर्डिया बँक, फिनलँड आणि डान्सके बँक ग्रुप या तीन प्रमुख सेव्हिंग्ज बँकांच्या गटांमध्ये बँकिंग प्रणाली विभागली आहे. ही प्रणाली एकत्रितपणे २१,००० पेक्षा जास्त लोकांना रोजगार देते.
Finland Country
Finland Country Agrowon
Published on
Updated on

Cooperative Banking System : देशातील उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्राचा बहुतांश विकास बँकिंग प्रणालीच्या सक्रियतेवर आणि सक्षमतेवर अवलंबून असतो. ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवले तरच बँकिंग क्षेत्राचा झपाट्याने विकास होतो. फिनलँडमधील सहकारी बँकांच्या गटांनी स्थापन केलेल्या ओपी फायनान्शिअल ग्रुप या स्वतंत्र सहकारी बँकेस आम्ही भेट दिली. आपल्याकडे जसे अर्बन बँकांचे फेडरेशन आहे, त्याच पद्धतीची बँकांची मध्यवर्ती संघटना म्हणून ही फिनलँडमधील सर्वांत मोठ्या आर्थिक कंपन्यांपैकी एक आहे.

हा आर्थिक गट अनेक सहकारी बँकांनी मिळून तयार झाला असून, त्याची मालकी ग्राहकांकडे आहे. गटाची स्थापना १८९१ मध्ये झाली. फिनलँडमधील सर्वांत मोठी आर्थिक संस्था म्हणून हा गट ओळखला जातो. एकूण १८० सहकारी बँका एकत्र येऊन ही संस्था तयार झाली. संस्थेचे वीस लाखांहून अधिक ग्राहक आहेत. त्यांना उच्च दर्जाची रिटेल बँकिंग, कॉर्पोरेट बँकिंग, तसेच इन्शुरन्स सेवा पुरवली जाते.

फिनिश सहकारी बँकांचा उगम विसाव्या शतकाच्या सुरुवातीला कृषी कर्ज पतपुरवठ्यासाठी झाला. सुरुवातीला त्या लहान पतसंस्थेसारख्या होत्या. केवळ मर्यादित भौगोलिक क्षेत्रात कार्यरत होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतर पुनर्बांधणीच्या प्रयत्नात सहभाग घेतल्याने त्यांचे महत्त्व वाढले. युद्धानंतरच्या काळात त्यांचे व्यवस्थापन व्यावसायिक झाले आणि त्यांनी रिटेल बँका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९७० मध्ये कायद्यान्वये त्यांची रीतसर बँक म्हणून नोंदणी झाली.

१९९० च्या सुरवातीला बँकिंग व्यवस्था संकटातून जात असताना फिनिश सहकारी बँका तुलनेने सुरक्षित राहिल्या. या संकटाचा एक महत्त्वाचा परिणाम असा झाला, की सर्व बँकांवर संयुक्त दायित्व (जॉइंट लायबिलिटी) लागू करण्यात आले. हा बदल विवादास्पद होता. त्यामुळे सहकारी बँका ओपी ग्रुप आणि पीओपी ग्रुपमध्ये विभागल्या गेल्या. यापैकी ओपी ग्रुपने उज्ज्वल यश संपादन केले. या ग्रुपने २००० च्या दशकात अग्रगण्य विमा कंपनी खरेदी केली. त्‍यामुळे मार्केट शेअरमध्‍ये सतत वाढ होत गेली. २००९ पर्यंत कर्ज आणि ठेवीमध्‍ये आघाडी घेतली. कोरोना संकट काळात दोन्ही सहकारी बँकिंग गट सशक्त आणि यशस्वी झाले.

Finland Country
Finland Country : पर्यटन, मासेमारी ही फिनलँडची ओळख

संस्थेत एकूण १३,००० कर्मचारी आहेत. १४ लाखांहून अधिक ग्राहक मोबाइल बँकिंग चॅनेलचे सक्रिय वापरकर्ते आहेत. व्यवस्थापनात ७० टक्के पुरुष आणि ३० टक्के महिलांना स्थान आहे. व्यवहार फिनिश, टॅनिश व इंग्रजी भाषांतून चालतात.

आर्थिक क्षेत्रातील फिनलँडमधील ही सर्वांत मोठी सहकारी बँकिंग संस्था आहे. संस्थेचा फिनलँडमधील रिटेल बँकिंग मधील मार्केट शेअर ३८.३० टक्के, कॉर्पोरेट बँकिंगमध्ये ३७.६० टक्के आणि इन्शुरन्समध्ये ३२.४० टक्के आहे.

रिटेल बँकिंगद्वारे व्यक्ती /एसएमई ग्राहकांना बँकिंग सेवा पुरवली जाते. बँकिंगद्वारे कार्पोरेट आणि संस्थात्मक ग्राहकांना बँकिंग आणि मालमत्ता व्यवस्थापन सेवा आणि इन्शुरन्सद्वारे जीवन विमा व सर्वसाधारण विमा सेवा पुरवली जाते. या बँकेत संगणकीय पद्धतीने कामकाज होते. कर्मचाऱ्यांना कार्यालयातून कामकाज करणे बंधनकारक नाही. ५० टक्के कर्मचारी घरून काम करतात. मुख्य कार्यालयात निवडक कर्मचारी, अधिकारी काम करतात.

येथील ग्राहक ठेवीवर व्याजाची अपेक्षा ठेवत नाहीत. ग्राहक फक्त आपले पैसे सुरक्षित कसे राहतील हे पाहतात, बँकेकडून विविध डिजिटल सेवांची अपेक्षा ठेवतात. येथील मालक ग्राहकांना कस्टमर केअर, लाभांश आणि व्याजाऐवजी अधिक काळ सेवांचा प्रत्यक्ष वापर यावर आधारित जास्तीत जास्त ३० टक्क्यांपर्यंत बोनस दिला जातो.

१९९५-९६ मध्ये इलेक्ट्रॉनिक पेमेंट व्यवस्था सुरू झाली. १९९६ मध्ये इंटरनेट बँकिंग सेवा सुरू करणारी ही दुसऱ्या क्रमांकाची बँक ठरली. सर्व शाखा संगणकीकृत असून, बँक स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टेड आहे.

मालक ग्राहक हे संस्थेचे संचालक मंडळ निवडून देतात. एक्स मॅनेजमेंट टीम या कार्यकारी व्यवस्थापक समितीचे प्रमुख सीईओ आहेत. मुख्यालयाच्या इमारतीत रिटेल बँकिंग, फायनान्स, लीगल विभाग कार्यरत आहेत. एचआर, डिजिटलायझेशन अकाउंट्स, कर्ज, आयटी इत्यादी दहा विभाग कार्यरत आहेत. संचालक मंडळाचा कार्यकाळ रोटेशन पद्धतीने जास्तीत जास्त बारा वर्षे आहे.

युरोपियन सेंट्रल बँक ही येथील बँकिंग प्रणालीवर नियंत्रण व नियमन करणारी बँक आहे (आपल्याकडील रिझर्व्ह बँक). फिनलँडमध्ये नोर्डा ही सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय वाणिज्य बँक आहे. डॅनिश बँक, स्विड बँक या इतर मोठ्या वाणिज्य बँका कार्यरत आहेत. येथे साक्षरतेचे प्रमाण शंभर टक्के असून, शहरी लोकसंख्या अधिक असल्याने बँकिंग क्षेत्र प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आहे.

ज्याप्रमाणे ओपी ग्रुप आपल्या सभासद सहकारी बँकांच्या अडचणी संकलित करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करतो, त्याच पद्धतीने आपल्या देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे देशपातळीवर फेडरेशन असण्याची गरज आहे. यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांचे राज्य पातळीवरील फेडरेशन तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. उद्योग क्षेत्राच्या विकासात बँकिंग प्रणालीने उचललेला वाटा आणि त्यासाठी बँकिंगच्या, विशेषतः सहकारी बँकिंगच्या आकृतिबंधाचा विचार करताना फिनलँड मॉडेलमधून आपण काही धडे घेतले पाहिजेत.

Finland Country
Green Hydrogen : दिशा ‘हायड्रोजन हब’ची

थंड हवामानाचा प्रदेश

आर्क्टिक सर्कलच्या उत्तरेकडील फिनलँडच्या भागात अत्यंत तीव्र आणि दीर्घकाळ हिवाळा असतो. तापमान उणे ३० अंश सेल्सिअस इतके कमी होते. या अक्षांशांमध्ये उत्तरेकडील डोंगर उतारावरील बर्फ कधीच वितळत नाही; परंतु दक्षिणेकडे उन्हाळ्यात मे ते जुलैपर्यंत तापमान २७ अंश सेल्सिअसपर्यंत असते. हिवाळा हा फिनलँडमधील सर्वांत मोठा ऋतू आहे. आर्क्टिक सर्कलच्या उत्तरेला ध्रुवीय रात्र ५० दिवसांपेक्षा जास्त असते; दक्षिण फिनलँडमध्ये सर्वांत लहान दिवस सहा तासांचा असतो. वार्षिक पर्जन्यमान दक्षिणेस सुमारे २५ इंच आणि उत्तरेस थोडे कमी असते; मात्र सुमारे एक तृतीयांश पाऊस हा हिमवर्षावाच्या रूपात पडतो. हिवाळ्यात संपूर्ण फिनलँडमधील पाणी पृष्ठभागावर काही प्रमाणात गोठते.

फिनलँडमधील बहुतांश भागात सहा महिने उन्हाळा आणि सहा महिने हिवाळा असतो. येथील उन्हाळ्यात आपल्याकडील पावसाळ्यासारखे हवामान असते. तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस असते. अधूनमधून पाऊस पडतो. हिवाळ्यात हिमवर्षाव होत असल्याने कृषी उत्पादनास मर्यादा आहेत. त्यामुळे पीकवाढीचा हंगाम म्हणजे ज्या कालावधीत सरासरी दैनंदिन तापमान ५ अंशांपेक्षा जास्त असते, असा हंगाम उत्तरेकडे १०० दिवसांपेक्षा कमी, तर दक्षिणेकडे १८० दिवसांपर्यंत असल्याने या देशातील कृषी शास्त्रज्ञांनी दव प्रतिरोधक जाती विकसित केल्या आहेत. देशाचा सुमारे ७४ टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे. जंगलात पाइन आणि बर्च झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे ग्रामीण भागातील रहिवाशांचे वनीकरण, कागद कारखाना आणि शेती हे उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत आहेत.

शेतीची परिस्थिती

१९६० च्या दशकाच्या सुरुवातीपासून फिनलँड मूलभूत अन्नपदार्थांमध्ये स्वयंपूर्ण आहे. मांस उत्पादन वापराच्या बरोबरीचे आहे, तर अंडी आणि दुग्धजन्य उत्पादन घरगुती गरजांपेक्षा जास्त आहे. धान्य उत्पादनाच्या बाबतीत मात्र ब्रेड, धान्य (प्रामुख्याने गहू) आयात केले जाते. चारा निर्यात केला जातो. हवामानामुळे देशाच्या दक्षिणेकडील आणि पश्‍चिमेकडील प्रदेशांपुरती धान्यशेती मर्यादित आहे. शेतीसाठी वापरात असलेले एकूण क्षेत्र सुमारे २३ लाख हेक्टर म्हणजे एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या ७.५ टक्के आहे. या देशाची सर्वांत महत्त्वाची तृणधान्ये म्हणजे बार्ली आणि ओट. त्यानंतर गहू आणि मोहरी या पिकांची लागवड असते. देशाच्या काही भागांत तेलबिया, शुगर बीट व बटाटा लागवड असते.

शेतीकामासाठी शेतमजुरांची कमतरता असल्याने शेतातील ८० टक्के काम शेतकरी आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य करतात. कृषी क्षेत्राचे रोजगार निर्मितीत महत्त्वाचे स्थान आहे. उर्वरित अन्नसाखळीसह कृषी क्षेत्र प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ३ लाख लोकांना रोजगार देते. सर्वांत लक्षणीय कृषी उत्पादने म्हणजे दूध, मांस, अंडी, तृणधान्ये आणि बटाटे. देशात कायम २५ अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमान असल्याने घरगुती वापरासाठी लोक दूध न तापवता वापरतात. आपल्याकडे दुधाचे पाश्‍चरायझेशन केले जाते. इथे असे न करता निरसे दूध ३ ते ४ दिवस चांगले राहते. देशाच्या भौगोलिक परिस्थितीस अनुसरून लागवडीखालील एकूण क्षेत्राच्या सुमारे ७२ टक्के क्षेत्रावर धान्य उत्पादन आणि २२ टक्के क्षेत्रावर इतर पिके घेतली जातात. उर्वरित क्षेत्रावर फळबागा आहेत.

युरोपीय संघामध्ये प्रवेश करण्यापूर्वी येथील शेतीला मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात होते. मात्र गॅट करारामुळे यावर मर्यादा आल्या असल्या तरी युरोपीय संघाबरोबर वाटाघाटी करून सामाईक कृषी धोरणांतर्गत फिनलँड आपल्या शेतकऱ्यांना सर्वाधिक अनुदान उपलब्ध करून देणाऱ्या देशांपैकी एक देश ठरला आहे. फिनलँडच्या ८० टक्के जंगलांची मालकी खासगी व्यक्ती किंवा संस्थांकडे असल्याने घरगुती वापराच्या लाकडाच्या किमती ही मंडळी नियंत्रित करतात. असे असले तरी वन उत्पादने (विशेषतः कागद) हा देशाच्या निर्यातीचा प्रमुख स्रोत आहे. येथील कृषी क्षेत्र फिनिश खाद्य अर्थव्यवस्थेचा पाया आहे. फिनलँड हा जगातील सर्वांत उत्तरेकडील कृषिप्रधान देश मानला जातो.

‘सांताक्लॉज व्हिलेज’ पर्यटकांचे आकर्षण

फिनलँडच्या लॅपलँड प्रदेशातील रोव्हानेमी येथे ‘सांताक्लॉज व्हिलेज’ हे एक मनोरंजन उद्यान आहे. हे उद्यान १९८५ मध्ये वसविण्यात आले. सांताक्लॉज व्हिलेज रोव्हानेमीच्या ईशान्येस सुमारे ८ किलोमीटर आणि रोव्हानेमी विमानतळापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर आहे. सांताक्लॉजचे पहिले मूळ घर कोरवतंटुरी होते. १९८५ मध्ये रोव्हानेमीला सांताक्लॉजचे अधिकृत जन्मगाव म्हणून घोषित करण्यात आले. पर्यटकांना छायाचित्रे घेण्यासाठी आणि सांताक्लॉजशी गप्पा मारण्यासाठी गावातील मुख्य इमारतीत सांताक्लॉजचे कार्यालय आहे. या शहरापासून आर्क्टिक सर्कल सुरू होते. १८६५ मध्ये आर्क्टिक सर्कल दर्शविणारी एक पांढरी रेषा ‘सांताक्लॉज व्हिलेज’ मध्ये रंगविण्यात आली. जेव्हा पर्यटक ही रेषा ओलांडतात, तेव्हा अधिकृतपणे आर्क्टिक क्षेत्रात प्रवेश करतात. पर्यटकांच्यासाठी ही रेषा एक ‘ट्रेंडी फोटो स्पॉट’ आहे.

डॉ. राजेंद्र सरकाळे,

९८५०५८६२२० (लेखक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com