Finland Country : पर्यटन, मासेमारी ही फिनलँडची ओळख

Finland Tourism : फिनलँड हा अत्यंत प्रगत देश आहे. देशातील बार्ली आणि ओट लागवड मोठ्या प्रमाणात आहे. वनशेती तसेच मासेमारीदेखील प्रमुख उद्योग आहेत. निसर्ग संपन्नतेमुळे पर्यटन उद्योगामध्येही या देशाने आघाडी घेतली आहे.
Finland
FinlandAgrowon
Published on
Updated on

Finland Tourism and Fishery : जगभरात कोणत्या देशांमधील लोक सर्वाधिक सुखी आहेत, हे ठरविण्याचे काही निकष आहेत. दरवर्षी या देशांची यादी प्रसिद्ध होते. गेल्या काही वर्षांपासून या यादीत सर्वोच्च स्थानी फिनलँड हा देश असतो. उत्तर युरोप आणि अटलांटिकमधील भौगोलिक आणि सांस्कृतिक समानता असलेल्या देशांच्या समूहास नॉर्डिक देश संबोधले जाते. फिनलँड हा या समूहातील अत्यंत प्रगत देश आहे. या देशाचे क्षेत्रफळ ३,३८,४५५ चौरस किलोमीटर असून, लोकसंख्या ५६ लाख आहे.

या देशातील लोकसंख्येची घनता १८ व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आहे, तर आपल्या महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता ४०४ व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आहे. यावरून तेथील लोकसंख्या किती विरळ आहे याचा अंदाज येतो. या देशात प्रवास करताना सुमारे ६० किलोमीटरपर्यंत गाव दिसत नाही. सगळीकडे जंगल पाहावयास मिळते. पूर्वेला दाट वाळवंट आणि रशिया, पश्‍चिमेला बोथनियाचे आखात आणि स्वीडन देश आहे. उत्तरेकडील प्रतिकूल हवामानामुळे दक्षिणेकडील भागात लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले आहे. देशाच्या लोकसंख्येपैकी सुमारे एक पंचमांश लोक फिनलँडमधील सर्वांत मोठे शहर हेलसिंकी आणि त्याच्या उपनगरात राहतात.

देशाचा इतिहास :

बाराव्या शतकापासून १८०९ पर्यंत फिनलँड हा स्वीडन देशाचा एक भाग होता. रशियन राज्यक्रांतीनंतर ६ डिसेंबर १९१७ रोजी फिनलँड हा स्वतंत्र देश म्हणून घोषित करण्यात आला. शीतयुद्धाच्या काळात फिनलँडने कुशलतेने तटस्थ राजकीय भूमिका ठेवली. दुसऱ्या महायुद्धापासून फिनलँडने इतर देशांशी व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध सातत्याने वाढवले.

अमेरिका आणि सोव्हिएत करारानुसार, १९५५ मध्ये फिनलँडचा संयुक्त राष्ट्रांमध्ये समावेश करण्यात आला. फिनलँडने स्कॅन्डिनेव्हियन देशांशी जवळचे संबंध ठेवले आहेत. या देशांसमवेत विविध आर्थिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक प्रकल्पांमध्ये भाग घेऊन नॉर्डिक देशांमध्ये शांतता राखण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. १९९५ मध्ये फिनलँड युरोपीय संघाचा पूर्ण सदस्य झाला. तेव्हापासून या देशामध्ये युरो हे चलन वापरले जाते.

Finland
Food and Tourism : आहार व पर्यटन

थंड हवामानाचा प्रदेश :

आर्क्टिक सर्कलच्या उत्तरेकडील फिनलँडच्या भागात अत्यंत तीव्र आणि दीर्घकाळ हिवाळा असतो. तापमान उणे ३० अंश सेल्सिअस इतके कमी होते. या अक्षांशांमध्ये उत्तरेकडील डोंगर उतारावरील बर्फ कधीच वितळत नाही; परंतु दक्षिणेकडे उन्हाळ्यात मे ते जुलैपर्यंत तापमान २७ अंश सेल्सिअसपर्यंत असते. हिवाळा हा फिनलँडमधील सर्वांत मोठा ऋतू आहे. आर्क्टिक सर्कलच्या उत्तरेला ध्रुवीय रात्र ५० दिवसांपेक्षा जास्त असते; दक्षिण फिनलँडमध्ये सर्वांत लहान दिवस सहा तासांचा असतो. वार्षिक पर्जन्यमान दक्षिणेस सुमारे २५ इंच आणि उत्तरेस थोडे कमी असते; मात्र सुमारे एक तृतीयांश पाऊस हा हिमवर्षावाच्या रूपात पडतो. हिवाळ्यात संपूर्ण फिनलँडमधील पाणी पृष्ठभागावर काही प्रमाणात गोठते.

फिनलँडमधील बहुतांश भागात सहा महिने उन्हाळा आणि सहा महिने हिवाळा असतो. येथील उन्हाळ्यात आपल्याकडील पावसाळ्यासारखे हवामान असते. तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस असते. अधूनमधून पाऊस पडतो. हिवाळ्यात हिमवर्षाव होत असल्याने कृषी उत्पादनास मर्यादा आहेत. त्यामुळे पीकवाढीचा हंगाम म्हणजे ज्या कालावधीत सरासरी दैनंदिन तापमान ५ अंशांपेक्षा जास्त असते, असा हंगाम उत्तरेकडे १०० दिवसांपेक्षा कमी, तर दक्षिणेकडे १८० दिवसांपर्यंत असल्याने या देशातील कृषी शास्त्रज्ञांनी दव प्रतिरोधक जाती विकसित केल्या आहेत. देशाचा सुमारे ७४ टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे. जंगलात पाइन आणि बर्च झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे ग्रामीण भागातील रहिवाशांचे वनीकरण, कागद कारखाना आणि शेती हे उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत आहेत.

समाजजीवन :

तेराव्या शतकात फिनलँडमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार सुरू झाला. देशातील बहुसंख्य लोकसंख्या फिनवंशीय असून फिनिश आणि स्वीडिश या अधिकृत भाषा आहेत. आंतरराष्ट्रीय नाणे निधीनुसार (आयएमएफ) फिनलँडचे दरडोई उत्पन्न ५०,५३६ अमेरिकी डॉलर (४२ लाख रुपये) असून, जागतिक क्रमवारीत ते सोळाव्या क्रमांकावर आहे. फिनलँड हा जगातील सर्वांत श्रीमंत देशांपैकी एक आहे.

या देशातील नागरिकांना विनामूल्य शिक्षण आणि प्रगत आरोग्यसेवा मिळते. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरी भागात लोकसंख्येचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. देशातील ८० टक्के लोकसंख्या शहरात आहे. नैर्ऋत्येकडील मिश्र शेतीसाठी योग्य असणाऱ्या कुरण प्रदेशात शेतजमिनी आहेत. उत्तरेकडील शेतकरी अल्प प्रमाणात पशुपालन आणि वनीकरणावर अवलंबून आहेत.

देशातील प्रमुख नागरी वसाहती दक्षिणेकडील भागात आहेत. किनारपट्टीजवळ भागात शहरी वस्ती आहे. हेलसिंकी हे त्यापैकी एक असून, देशाची राजधानी आणि सर्वांत मोठे शहर आहे. या शहराची लोकसंख्या ६.५७ लाख म्हणजे देशाच्या लोकसंख्येच्या १२ टक्के आहे. या शहराला ‘पांढरे शहर’ म्हटले जाते, कारण येथील अनेक इमारती बांधताना हलक्या पांढऱ्या रंगाच्या स्थानिक ग्रॅनाइटचा वापर करण्यात आला आहे. हेलसिंकीचे आर्थिक जीवन आणि विकास उत्कृष्ट बंदरावर अवलंबून आहे. फिनलँडच्या एकूण आयातीपैकी निम्म्याहून अधिक आयात हेलसिंकी बंदरातून होते. १९५२ चे ऑलिंपिक खेळ या शहरात आयोजित करण्यात आले होते. भारताचे प्रख्यात कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना येथील ऑलिंपिक स्पर्धेत कांस्यपदक मिळाले होते. स्वतंत्र भारताला मिळालेले हे पहिले ऑलिंपिक पदक आहे.

‘सांताक्लॉज व्हिलेज’ पर्यटकांचे आकर्षण :

फिनलँडच्या लॅपलँड प्रदेशातील रोव्हानेमी येथे ‘सांताक्लॉज व्हिलेज’ हे एक मनोरंजन उद्यान आहे. हे उद्यान १९८५ मध्ये वसविण्यात आले. सांताक्लॉज व्हिलेज रोव्हानेमीच्या ईशान्येस सुमारे ८ किलोमीटर आणि रोव्हानेमी विमानतळापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर आहे. सांताक्लॉजचे पहिले मूळ घर कोरवतंटुरी होते. १९८५ मध्ये रोव्हानेमीला सांताक्लॉजचे अधिकृत जन्मगाव म्हणून घोषित करण्यात आले.

पर्यटकांना छायाचित्रे घेण्यासाठी आणि सांताक्लॉजशी गप्पा मारण्यासाठी गावातील मुख्य इमारतीत सांताक्लॉजचे कार्यालय आहे. या शहरापासून आर्क्टिक सर्कल सुरू होते. १८६५ मध्ये आर्क्टिक सर्कल दर्शविणारी एक पांढरी रेषा ‘सांताक्लॉज व्हिलेज' मध्ये रंगविण्यात आली. जेव्हा पर्यटक ही रेषा ओलांडतात, तेव्हा अधिकृतपणे आर्क्टिक क्षेत्रात प्रवेश करतात. पर्यटकांच्यासाठी ही रेषा एक ‘ट्रेंडी फोटो स्पॉट’ आहे.

Finland
Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

जगातील आनंदी देश

गेल्या सहा वर्षांपासून जगातील सर्वांत आनंदी देश म्हणून फिनलँड या देशाला ओळखले जाते. येथील नागरिक श्रीमंत आहेत. असे असले तरी या लोकांमध्ये सामाजिक बांधिलकीची चांगली भावना आहे. फिन नागरिक आपल्या शेजाऱ्यांना मदत करण्यास नेहमीच इच्छुक असतात. फिनलँडमध्ये तुम्ही जे बोलता त्यापेक्षा तुम्ही काय करता याबाबीला जास्त महत्त्व दिले जाते. गरजू शेजाऱ्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी “नप्पी नापुरी”सारख्या सामाजिक संस्था कार्यरत आहेत. २०२०च्या जागतिक कोरोना संकट काळात, फिन नागरिकांनी त्यांच्या सहकाऱ्यांना आर्थिक मदत करण्यात कोणताही संकोच केला नाही. कोरोना काळात या देशाने नागरिकांवर कोणतेही निर्बंध लादले नाहीत. सोशल डिस्टन्सिंग ऐवजी नागरिकांचा मुक्तसंचार सुरू ठेवून हर्ड इम्युनिटी (सामूहिक रोगप्रतिकारशक्ती) वाढविण्यावर भर दिला. त्यामुळे हा देश कोरोना संकटातून लवकर सावरला. फिनलँडमध्ये सर्वांत स्वच्छ हवा आहे. जगातील हा सर्वांत सुरक्षित देश असून, जगातील सर्वोत्तम शिक्षणप्रणाली येथे आहे.

या देशात लाकूड, खनिज (लोह, क्रोमियम, तांबे, निकेल आणि सोने) आणि गोड्या पाण्याचे मुबलक स्रोत आहेत. फिनलँड हा हजार तलावांचा देश (लँड ऑफ थाऊजंड लेक्स) म्हणून ओळखला जातो. मात्र प्रत्यक्षात, ही संख्या १८७ पट जास्त आहे. देशभरात ५,४०० चौरस फुटापेक्षा मोठ्या आकाराचे सुमारे १,८७,००० तलाव आहेत. देशात तलाव, नद्या आणि कालवे यांचा समावेश असलेल्या जलवाहतूक मार्गांचे विस्तृत जाळे आहे. त्यामुळे येथील बहुसंख्य नागरिकांकडे जलवाहतुकीसाठी बोटी आहेत. डेन्मार्क, स्वीडन, जर्मनी, इस्टोनिया, रशिया आणि पोलंड येथे जाण्यासाठी कार फेरी म्हणजे वाहन आणि प्रवासी घेऊन जाण्यासाठी मोठ्या बोटी आहेत.

फिनिश आणि स्वीडिश या दोन राष्ट्रीय भाषा आहेत. लोकसंख्येच्या जवळपास ९० टक्के लोक फिनिश बोलतात. स्वीडिश भाषक लोकसंख्या प्रामुख्याने दक्षिण, नैर्ऋत्य आणि पश्चिश्‍चिमेकडील किनारपट्टी भागात आणि आलँड बेटांमध्ये (जेथे स्वीडिश ही एकमेव अधिकृत भाषा आहे) बोलली जाते.

जगातील फिन लोक इतर कोणत्याही देशांतील नागरिकांपेक्षा जास्त कॉफी पितात. प्रत्येक फिन नागरिक दरवर्षी सरासरी १२ किलो कॉफी वापरतो. या देशात दररोज आठ कप कॉफी पिणे सामान्य मानले जाते.

फिनलँडमधील महिलांसाठी रोजगार हा फार पूर्वीपासून स्वयंस्पष्ट अधिकार आहे. फिनलँडमध्ये महिलांसाठी युरोप खंडातील सर्वाधिक रोजगार दर आहे. जवळजवळ ९० टक्के फिनिश महिला पूर्णवेळ नोकरी करतात. एकूणच महिला कामगार त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा किंचित चांगल्या शिक्षित आहेत आणि अधिक संघटित आहेत. कामाच्या ठिकाणी महिला आणि नवीन पालकांसाठी मातृत्व आणि पितृत्व रजेची सर्वसमावेशक प्रणाली अस्तित्वात आहे.

फिनलँडमध्ये इतर अनेक औद्योगिक देशांपेक्षा जास्त आयकर संकलित होतो. आपल्या देशाप्रमाणेच सरासरीपेक्षा जास्त उत्पन्नावर जास्त कर आकारणी केली जाते. फिनलँडचा मूल्यवर्धित कर हा युरोपियन युनियनमध्ये सर्वाधिक आहे. द्रव इंधन, वाहन, अल्कोहोल आणि तंबाखूवरील उत्पादन शुल्कदेखील जास्त आहे. मात्र अन्न, सार्वजनिक वाहतूक, पुस्तके आणि औषधांवरील उत्पादन शुल्क सरासरीने कमी आहे.

शेतीची परिस्थिती :

१९६० च्या दशकाच्या सुरुवातीपासून फिनलँड मूलभूत अन्नपदार्थांमध्ये स्वयंपूर्ण आहे. मांस उत्पादन वापराच्या बरोबरीचे आहे, तर अंडी आणि दुग्धजन्य उत्पादन घरगुती गरजांपेक्षा जास्त आहे. धान्य उत्पादनाच्या बाबतीत मात्र ब्रेड, धान्य (प्रामुख्याने गहू) आयात केले जाते. चारा निर्यात केला जातो. हवामानामुळे देशाच्या दक्षिणेकडील आणि पश्‍चिमेकडील प्रदेशांपुरती धान्यशेती मर्यादित आहे. शेतीसाठी वापरात असलेले एकूण क्षेत्र सुमारे २३ लाख हेक्टर म्हणजे एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या ७.५ टक्के आहे. या देशाची सर्वांत महत्त्वाची तृणधान्ये म्हणजे बार्ली आणि ओट. त्यानंतर गहू आणि मोहरी या पिकांची लागवड असते. देशाच्या काही भागांत तेलबिया, शुगर बीट व बटाटा लागवड असते.

शेतीकामासाठी शेतमजुरांची कमतरता असल्याने शेतातील ८० टक्के काम शेतकरी आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य करतात. कृषी क्षेत्राचे रोजगार निर्मितीत महत्त्वाचे स्थान आहे. उर्वरित अन्नसाखळीसह कृषी क्षेत्र प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ३ लाख लोकांना रोजगार देते. सर्वांत लक्षणीय कृषी उत्पादने म्हणजे दूध, मांस, अंडी, तृणधान्ये आणि बटाटे. देशात कायम २५ अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमान असल्याने घरगुती वापरासाठी लोक दूध न तापवता वापरतात. आपल्याकडे दुधाचे पाश्‍चरायझेशन केले जाते. इथे असे न करता निरसे दूध ३ ते ४ दिवस चांगले राहते. देशाच्या भौगोलिक परिस्थितीस अनुसरून लागवडीखालील एकूण क्षेत्राच्या सुमारे ७२ टक्के क्षेत्रावर धान्य उत्पादन आणि २२ टक्के क्षेत्रावर इतर पिके घेतली जातात. उर्वरित क्षेत्रावर फळबागा आहेत.

युरोपीय संघामध्ये प्रवेश करण्यापूर्वी येथील शेतीला मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात होते. मात्र गॅट करारामुळे यावर मर्यादा आल्या असल्या तरी युरोपीय संघाबरोबर वाटाघाटी करून सामाईक कृषी धोरणांतर्गत फिनलँड आपल्या शेतकऱ्यांना सर्वाधिक अनुदान उपलब्ध करून देणाऱ्या देशांपैकी एक देश ठरला आहे. फिनलँडच्या ८० टक्के जंगलांची मालकी खासगी व्यक्ती किंवा संस्थांकडे असल्याने घरगुती वापराच्या लाकडाच्या किमती ही मंडळी नियंत्रित करतात. असे असले तरी वन उत्पादने (विशेषतः कागद) हा देशाच्या निर्यातीचा प्रमुख स्रोत आहे. येथील कृषी क्षेत्र फिनिश खाद्य अर्थव्यवस्थेचा पाया आहे. फिनलँड हा जगातील सर्वांत उत्तरेकडील कृषिप्रधान देश मानला जातो.

मत्स्य शेती :

फिनलँडला विस्तृत किनारपट्टी लाभली आहे. तसेच इतर कोणत्याही युरोपीय देशापेक्षा सरोवरांनी व्यापलेला जास्त भूभाग आहे. सुमारे २००० व्यावसायिक मच्छीमारांसाठी मासेमारी हा उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. समुद्र आणि गोड्या पाण्यातील मत्स्यपालन प्रामुख्याने घरगुती वापरासाठी केले जाते. अर्थव्यवस्थेसाठी व्यावसायिक मासेमारी हळूहळू कमी होत चालली आहे. फिनलँडमध्ये सॅल्मन, रेनबो ट्राउट, व्हाइट फिश आणि पाईक या मुख्य प्रजाती आहेत. सॅल्मन हा अत्यंत स्वच्छ पाण्यात राहणारा मासा आहे. प्रचंड प्रथिनयुक्त असल्याने जगात सर्वाधिक मागणी असणारा हा मासा आहे.

नदीतील प्रदूषण तसेच जलविद्युत कामांसाठी बांधण्यात आलेल्या धरणांमुळे नैसर्गिक मत्स्य बीजोत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. यासाठी सॅल्मन आणि समुद्री ट्राउट या जातींच्या मत्स्य बीजोत्पादनासाठी मोठ्या संख्येने मत्स्य-प्रजनन केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी बीजोत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. सुमारे १५ लाख फिन नागरिक वर्षातून किमान एकदा तरी मासेमारी करतात. या देशात मासेमारी पर्यटन वेगाने वाढत आहे. देशातील अनेक नद्यांमध्ये माशांची संख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. बाल्टिक समुद्राची पर्यावरण स्थिती सुधारण्यासाठी फिनलँड दीर्घकालीन काम करीत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com