Indrajit Bhalerao : महानोरांनी भालेरावांना लिहीलेलं पत्र !

Article by Indrajit Bhalerao : नागनाथांनी इथे येऊन मला दर्शन दिलं.’’ परभणीला आल्यावर महानोर माझ्या घरी आले. आई-वडिलांना भेटले. त्यांना या गोष्टीचा खूपच आनंद झाला. महानोरांच्या पुस्तकांच्या बाइंड केलेल्या संचावर त्यांची मी सही घेतली.
N D Mahanor
N D MahanorAgrowon
Published on
Updated on

इंद्रजित भालेराव

Na. Dho. Mahanor : पुढं १९९३ मध्ये योगायोगानं श्यामलालजी अग्रवाल यांच्या राधा या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने महानोर वसमतला आले. श्यामलालजींनी मला बोलावूनच घेतलं होतं. त्यामुळं मीही सेवकाच्या भूमिकेत दोन दिवस महानोरांसोबत राहिलो. सुलोचनाबाईही होत्या. मी मागचं सगळं विसरण्याचा प्रयत्न केला. महानोरही विसरलेच. खूप प्रेमानं माझ्याशी वागले. मी त्यांना आग्रहाची विनंती केली, की आपण परत जाताना परभणीहून यावं आणि माझ्या घरी पण यावं. अर्थात, तेव्हा मी भाड्याच्या घरात राहत होतो.

पण महानोरांनी माझी विनंती मान्य केली. मी त्यांच्याच गाडीत बसून त्यांना घेऊन परभणीला आलो. प्रवासात दुपारच्या उन्हात एक प्रचंड मोठा नाग आमच्या गाडीसमोरून गेला. सुलोचनाबाईंनी गाडी उभी करायला सांगितलं आणि खाली उतरून त्यांनी त्या नागाला नमस्कार केला. गाडीत बसल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘आपण परभणीऐवजी औंढा नागनाथकडून जायचं ठरलं होतं. आपणाला नागनाथांचं दर्शन घ्यायचं होतं. तुम्ही तुमच्या या कवीमित्रामुळे नागनाथाला टाळून मला परभणीहून आणलं.

N D Mahanor
Indrajit Bhalerao : महानोर रोमॅंटिक कवी होते ?

नागनाथांनी इथे येऊन मला दर्शन दिलं.’’ परभणीला आल्यावर महानोर माझ्या घरी आले. आई-वडिलांना भेटले. त्यांना या गोष्टीचा खूपच आनंद झाला. महानोरांच्या पुस्तकांच्या बाइंड केलेल्या संचावर त्यांची मी सही घेतली. तेव्हा सही करून त्यांनी, ‘इंद्रजितच्या घरी’ असं लिहून, सहीखाली तारीख टाकली १६ सप्टेंबर १९९३. परत गेल्यावर त्यांनी एक रसरशीत पत्र मला लिहिलं.

त्या दिवशी त्यांचा शोध घेत परभणीच्या कृषी विद्यापीठाचे तेव्हाचे कुलगुरू माझ्या त्या भाड्याच्या घरी आले. महानोरांना भेटले. त्यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ संपत आलेला होता. आपणाला मुदतवाढ मिळावी यासाठी महानोरांनी शरद पवार साहेबांना शिफारस करावी म्हणून ते भेटायला आलेले होते. याच भेटीत महानोरांच्या एक भगिनी परभणीत असतात हे मला समजलं.

N D Mahanor
Indrajit Bhalerao : महानोर आणि आनंद यादव यांच्यात मैत्री होती का ?

सुलोचनावहिनींनी त्यांच्याकडे जाण्याचा हट्ट धरला. कृषी विद्यापीठातच शिंदे नावाचे प्राध्यापक महानोरांचे मेहुणे होते. त्यांच्या घरी आम्ही गेलो. त्यांच्या बहीणबाईंना महानोरांची सगळी गाणी पाठ होती. त्यांनी आणि आम्ही चढाओढीने महानोरंच्या समोरच त्यांची गाणी आणि कवितांचा उरुस केला. नंतर महानोर निघून गेले. त्यांनी गेल्यावर मला लिहिलेलं पत्र मी इथे मुद्दाम देत आहे.

प्रिय, इंद्रजित
स. न.
वसमतनगरला तू काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला आल्याने, सहभागी झाल्याने मला खूप बरं वाटलं. दोन दिवस मजेत गेले. विशेषतः तुझ्या घरी मला खूप समाधान वाटलं. आई-बाबा भेटले. त्यांच्या डोळ्यांत तू चांगली कविता लिहिल्याचा, तुझ्या यशाचा हरिक दाटून होता. बोलण्यातून त्यांचा ओलावा मला हुरूप देऊन गेला.

शेतीतून शंभर क्विंटल कापूस काढणार असल्याचा आत्मविश्‍वास मला अभिमानाचा वाटला. आई-बाबांना माझे नमस्कार सांग. त्यांची जपणूक कर. तू चांगलं लिहितो, वाचतो. शेतीतला, खेड्यातला निसर्ग त्यातलं सुखदुःख दरवेळी नवीन असतं. कलावंताला ते आव्हान आहे. तुझ्यासारख्यांनी नवी मराठी कविता देताना फार सामर्थ्याने टवटवीत लिहावं. आमच्याही पुढे जावं. खूप मोठं होता येईल. भेटीत कधी अधिक. घरच्या बाईचं, लहान मुलांचं कळव.

तुझा,
ना. धों. महानोर
४ ऑक्टोबर १९९३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com