Aonla Farming : कोरडवाहू जमिनीत, कमी पाण्यात होणारी आवळा शेती

Aonla Production : औषधी आणि गुणकारी फळ म्हणून आवळा सर्वांनाच माहिती आहे. आवळ्याचा उपयोग अनेक प्रकारच्या आयुर्वेदीक औषधांमध्ये होतो. आवळ्यापासून विवध पदार्थ बनविता येतात.
Aonla Farming
Aonla Farming Agrowon

Aonla Cultivation : औषधी आणि गुणकारी फळ म्हणून आवळा सर्वांनाच माहिती आहे. आवळ्याचा उपयोग अनेक प्रकारच्या आयुर्वेदीक औषधांमध्ये होतो. आवळ्यापासून विवध पदार्थ बनविता येतात. प्रक्रिया उद्योगामध्येही आवळ्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

त्यामुळे येत्या काळात आवळ्याला मोठी मागणी राहणार आहे. हे लक्षात घेऊन तुम्हीही आवळा शेतीचा विचार करु शकता. आवळा शेतीसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत. 

कोरड्या उष्णकटिबंधीय, उष्ण आणि समशीतोष्ण प्रकारच्या हवामानात आवळ्याची लागवड करता येते. आवळा लागवडीसाठी महाराष्ट्राच हवामान पोषक आहे त्यामुळे कोणत्याही भागात आवळ्याची लागवड होऊ शकते. विशेष करुन आवळा अत्यंत काटक असल्याने आवळ्याची लागवड कोरडवाहू किंवा जिरायती जमिनीतही होते.

जातींची निवड

महाराष्ट्रामध्ये आवळा लागवडीसाठी कृष्णा, कांचन, एनए-१० व एनए-७ या जातींची शिफारस आहे. आवळ्याच्या बनारसी, चकय्या आणि देशी अशा जाती विकसित करण्यात आल्या आहेत. बनारसी जातीची फळे आकाराने मोठी, पिवळसर आणि चमकदार असतात. चकय्या जातीची फळे मध्यम आकाराची असून उत्पादन भरपूर मिळते, तसेच फळाचा टिकाऊपणा जास्त असतो. देशी जातीची फळे आकाराने लहान असतात.

बनारसी जातीची फळे मोरावळा आणि रस करण्यासाठी, चकय्या जातीची फळे कँडी, सुपारी, रस, पावडर करण्यासाठी तर देशी जातीची फळे पावडर, लोणची तयार करण्यासाठी तर कांचन जातीची फळे गरासाठी फायदेशीर ठरतात.त्यामुळे लागवड करताना आवळ्याच्या तीन ते चार जातींची लागवड करण फायदेशीर ठरतं.

Aonla Farming
Dry Farming Technology : कमी पाण्यात शेती? ड्राय फार्मिग म्हणजे काय?

जमीन

आवळा लागवडीसाठी सुपीक, चिकण मातीचे प्रमाण जास्त असलेली आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन चांगली मानली जाते. चुनखडीयुक्त किंवा रेताड जमिनीत आवळ्याची लागवड शक्यतो टाळावी.

आवळ्याच्या बियांपासून तयार केलेली रोपे प्रामुख्याने रूटस्टॉक म्हणून कलमे तयार करण्यासाठी वापरली जातात. कारण बियांपासून तयार केलेल्या रोपांपासून आकाराने छोटी, कमी दर्जाची आणि खूप कालावधीनंतर फळे मिळतात. म्हणून व्यापारीदृष्ट्या लागवडीमध्ये ती वापरत नाहीत.

Aonla Farming
Dry Land Farming : कोरडवाहू शेतीतील खर्च करा कमी

लागवड हंगाम 

जून ते जुलै महिन्यामध्ये लागवड केल्याने रोपांची उत्तम वाढ होते. लागवडीपूर्वी, उभी-आडवी खोल नांगरणी करून जमीन तयार करावी. ६० बाय ६० बाय ६० सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदून प्रत्येक खड्ड्यात १०-१५ किलो कुजलेले शेणखत, २५० ग्रॅम निंबोळी खत आणि २५० ग्रॅम १९:१९:१९ खत मातीमध्ये मिसळून खड्डे भरून घ्यावेत. लागवड करताना परागीभवन आणि जास्तीत जास्त उत्पादनाच्या हेतूने २:२:१ च्या गुणोत्तरामध्ये किमान तीन जातींची लागवड करावी.

पाणी आणि खत व्यवस्थापन 

नवीन कलमे जगविण्यासाठी गरजेनुसार प्रत्येक झाडाला २० ते ३० लिटर पाणी  १० ते १५ दिवसांच्या अंतराने द्यावे. जून, जुलै महिन्यांत पाऊस नसेल तर बागेला पाणी द्यावे. उन्हाळ्यामध्ये १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

आंतरपिके घेतल्यास पाणी आणि खते देण्याची विशेष गरज लागत नाही. जुलै महिन्यामध्ये पूर्ण शेणखत आणि अर्धी रासायनिक खताची मात्रा द्यावी. अर्धी रासायनिक खतांची मात्रा ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये पावसाचा अंदाज घेऊन द्यावी. 

खतांचा वापर केल्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदा पाणी दिले जाते. फूलधारणेच्या काळात म्हणजेच मार्च-एप्रिलदरम्यान पाणी तोडावे. फळगळती कमी करण्यासाठी एखादे संरक्षित पाणी द्यावे.

तोडणीचा हंगाम 

कलमे केलेली झाडे लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासून फळे देण्यास सुरुवात करतात, तर बियांपासून लागवड केलेल्या झाडांना ६ ते ८ वर्षे लागतात. आवळ्याला मार्च-एप्रिल महिन्यात फुले येतात. फूल ते परिपक्व फळासाठी सामान्यपणे ५ ते ६ महिने लागतात.

फळधारणा झाल्यानंतर फळे सुप्तावस्थेत जातात. या काळात कोणत्याही प्रकारची आंतरमशागत करू नये. मृगाचा पाऊस पडल्यानंतर फळाची वाढ होण्यास सुरुवात होते. तोडणीचा हंगाम जातीनूसार सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंत चालतो.

चांगली तयार झालेली फळे काढावीत. फळे आकडीने किंवा बांबूने हलवून काढावी लागतात. तोडणीच्या विलंबामुळे काही जातींच्या बाबतीत फळे मोठ्या प्रमाणात गळतात. तोडणी सहसा दिवसाच्या लवकर किंवा उशिरा करावी. पूर्ण वाढलेल्या १० वर्षांपुढील झाडापासून १०० ते १२० किलो फळे मिळतात. हेक्टरी १५ ते २० टन उत्पादन मिळते.

आकारानुसार फळांचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते. मोठ्या आकाराची फळे मुख्यतः कँडीसाठी वापरतात. लहान आकाराची च्यवनप्राश आणि त्रिफळा तयार करण्यासाठी वापरतात. उरलेली फळे पावडर आणि शाम्पू बनवण्यासाठी वापरतात.

त्यामुळे मागणी असलेले प्रक्रिया उद्योग, बचत गटाची माहिती गोळा करुन तुम्ही आवळ्याची विक्री करु शकता. याशिवाय आवळा शेतीसोबतच तुम्ही आवळा प्रक्रिया करुन विविध पदार्थ तयार करुन अजून चांगला नफा मिळवू शकता. 

माहिती आणि संशोधन - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com