Polluting Spent Wash : प्रदूषकारी स्पेंट वॉशचे मूल्यही जाणा...

Water Pollution : साखर कारखान्यातील एक उपपदार्थ स्पेंट वॉश हा सर्वात प्रदूषणकारी घटकांमध्ये मोडतो. त्यामुळे कारखाना परिसरातील जलस्रोत आणि जमिनीत प्रदूषित होतात. हे खरे असले तरी ते योग्य प्रमाणात विरल करून शेतात खत म्हणून वापरता येते.
Spent Wash
Spent WashAgrowon
Published on
Updated on

सतीश खाडे

Value of Spent Wash Water : साखर कारखान्यातून साखर बनवताना बाहेर पडते ती मळी. त्या मळीवर प्रक्रिया करून स्पिरीट, अल्कोहोल, इथेनॉल यांसारख्या रसायनांची निर्मिती करतात. या रासायनिक प्रक्रियेत एक उपपदार्थ तयार होतो, तो म्हणजे स्पेंट वॉश! तपकिरी पिवळसर रंगाच्या या रसायनाचा पी.एच. तीव्र आम्लधर्मी (३ ते ४.५ इतका) असतो.

त्याची जैविक ऑक्सिजन मागणी निर्देशांक (BOD) ४५ ते ६० हजार पीपीएम, तर सीओडी ८० हजार ते १ लाख ६० हजार पीपीएम इतका असतो. मळीपासून वरील रसायने मिळवण्याची विविध प्रक्रिया तंत्रज्ञान असले तरी त्यात प्रति लिटर अल्कोहोल किंवा इथेनॉल मिळवताना ६ ते १५ लिटर स्पेंट वॉश तयार होतो. एका डिस्टिलरी प्रतिदिन हजारो लिटर अल्कोहोल तयार होत असल्याने स्पेंट वॉश ही मोठ्या प्रमाणात तयार होते.

या स्पेंट वॉश परिसरातील शेती, पाणी व वातावरणामध्ये प्रदूषण करते. म्हणूनच अधिक प्रदूषणकारी पदार्थांच्या यादीत ते वरच्या क्रमांकावर आहे. प्रदूषणकारी असूनही त्याचा परिणाम कमी करणाऱ्या प्रक्रिया किंवा तंत्रज्ञानाचा अवलंब न केल्याने महाराष्ट्रासह देशातील डिस्टलरीच्या परिसरातील हजारो हेक्टर जमिनी, जलस्रोत आणि प्रामुख्याने भूजल मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचा अनुभव आपल्या सर्वांनाच येत आहे.

स्पेंट वॉशमध्ये वरील नकारात्मक गुणधर्म असले तरी उपयुक्तता मूल्यही मोठे आहे. फक्त त्याचा वापर करताना थोडे नियोजन आणि काळजी घेण्याची आवश्यकता आहे. डिस्टलरीतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याला कच्चे स्पेंट वॉश म्हणतात. त्यावर प्रक्रिया करून मिथेन (बायोगॅस) मिळवतात. या प्रक्रियेमध्ये स्पेंट वॉशचा सीओडी ६० ते

७० टक्क्यांनी तर बीओडी ८० ते ९० टक्क्यांनी कमी होतो. त्याला Biomethanated स्पेंट

वॉश म्हणतात. या स्पेंट वॉशमध्ये पाच पट पाणी मिसळून शेतात वापरल्यास अमूल्य असे खत ठरू शकते.

Spent Wash
Water Pollution : जलप्रदूषणामुळे ‘रामसर’चे अस्तित्व धोक्यात

स्पेंट वॉशची विल्हेवाट लावण्याच्या सध्या वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती

काही ठिकाणी त्यापासून मिथेन बनवला जातो. त्यानंतर काही प्रक्रिया करत त्यापासून अन्य रसायने मिळवली जातात. (महाराष्ट्रात मोजक्याच कारखान्यांनी ही यंत्रणा बसवली असून, त्याच्या प्रदूषण कमी करण्याच्या कार्यक्षमतेबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही.) नंतर तुलनेने कमी प्रदूषित पाणी नजीकच्या जमिनीवर किंवा जलस्रोतात सोडले जाते.

बऱ्याच ठिकाणी साखर कारखान्यातील प्रेसमड बरोबर स्पेंट वॉश मिसळून त्यांचे कंपोस्टिंग करून खत बनवले जाते. मात्र या प्रक्रियेमध्ये एकच अडचण आहे, ती

बहुतांश कारखान्यामध्ये स्पेंट वॉशच्या तुलनेत फारच कमी प्रेसमड उपलब्ध होतो. उरलेले

स्पेंट वॉश तसेच कारखान्यातून बाहेर टाकले जाते.

अनेक कारखान्यात वा डिस्टलरीमध्ये उप इंधन म्हणून स्पेंट वॉश सर्रास जाळला जातो. पण या पद्धतीत बॉयलरमध्ये याची राख साचते. ती काढणे व तिची विल्हेवाट लावणे, ही वेगळीच समस्या निर्माण होते.

स्पेंट वॉशला उष्णता देऊन त्यातील पाण्याचे बाष्पीभवन करून पावडर बनवली जाते. त्यावर पुन्हा रासायनिक क्रिया करून ते खत म्हणून वापरले जाते.

काही ठिकाणी रिव्हर्स ऑस्मॉसिस प्रक्रियेने त्यातील प्रदूषित घटक काढून टाकले जातात.

काही ठिकाणीच वर उल्लेखल्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात पाणी मिसळून ते सौम्य करून शेतात पसरले जाते. त्याचा खत म्हणून वापर होतो. या व्यतिरिक्तही इतर काही पद्धती अवलंबल्या जातात.

वरीलपैकी अपवाद वगळता सर्व प्रक्रियांसाठी यंत्रसामग्री, जमीन, पायाभूत बांधकामे व मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते. देखभाल खर्चही भरपूर असल्याने हे सर्व खर्चिक प्रकरण होते. परिणामी, बहुतेक डिस्टलरी स्पेंट वॉशवर प्रक्रिया न करता तसेच कारखाना आवाराच्या आसपास व जवळच्या जलस्रोतात सोडून देतात. परिसरातील प्रदूषण वाढविण्यात हातभार लावतात.

Spent Wash
River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

स्पेंट वॉशची शेतासाठीची उपयुक्तता

प्रति स्पेंट वॉशमध्ये पाच लिटर पाणी मिसळून विरल केलेले द्रव्य एकरी ५ ते ७ हजार लिटर या प्रमाणे मोकळ्या शेतात खरीप वा रब्बी हंगामापूर्वी किमान आठ दहा दिवस आधी फवारून टाकावे. ही फवारणी तीन वर्षांतून एकदा करावी. (दरवर्षी नाही.) फवारण्यापूर्वी जमिनीतील क्षारांच्या तीव्रतेचे मोजमाप करून घेतलेले चांगले. कारण स्पेंट वॉशमध्येही क्षारांचे प्रमाण जास्त असते.

या सौम्य केलेल्या स्पेंट वॉशमध्ये जमिनीची सुपीकता वाढविणारे अनेक वनस्पतिजन्य घटक असतात. त्यात फॉस्फरस, नत्र, कार्बन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सल्फर, झिंक, लोह, मॅंगेनिज इ. अन्नघटक मुबलक आहेत. मुख्य म्हणजे यातील सेंद्रिय कर्ब हा पाण्यात विरघळणारा असतो. उच्च प्रतीची अमायनो ॲसिड्स, विटामिन्स आणि दर्जेदार प्रोटीन मुबलक असतात. ही खनिज संयुगे वनस्पतिजन्य असल्याने त्यांचे विघटन मातीत वेगाने होते. ती पिकांना सुलभतेने मिळतात. याबरोबरच वनस्पती वाढीसाठी उपयुक्त असे जिबरेलिक ॲसिड, ह्युमिक ॲसिड, इंडोल ॲसिटिक ॲसिड घटकही मिळतात. हे सर्व घटक वनस्पतीची वाढ, फुलोरा, फळांची संख्या वाढविण्यासाठी महत्त्वाची ठरतात. महत्त्वाचे म्हणजे त्यात कोणत्याही जड धातू नसल्याने प्रदूषण होत नाही.

स्पेंट वॉशमधील जवळजवळ सर्वच घटक मातीतील उपयुक्त जिवाणू, बुरशी व अन्य सूक्ष्मजीवांचे अन्न असून, त्याची संख्या वेगाने वाढत. यातील सेंद्रिय कर्ब हा पाण्यात विरघळणाऱ्या प्रकाराचा असल्याने त्याचाही फायदा जिवाणू, ॲक्टिनोमायसेट्स, ॲझोटोबॅक्‍टर तसेच विविध उपयुक्त बुरशींच्या वाढीमध्ये होतो. परिणामी, त्याचा बियांच्या अंकुरणापासून वाढीच्या सर्व टप्प्यांमध्ये फायदा होतो. पिकाची सुदृढता वाढल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सौम्य स्पेंट वॉश खत म्हणून वापरल्यामुळे गहू, भात, मका, डाळी, सूर्यफूल, सोयाबीन या आणि अशा अनेक पिकांच्या उत्पादनात भरघोस वाढ झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. माझ्याही शेतात स्पेंट वॉश मिसळल्यामुळे उत्पादन वाढ मिळाली आहे. डाळीमध्ये प्रथिनांची गुणात्मक, संख्यात्मक वाढ होते. तेलबियांमध्ये तेलाचे प्रमाण वाढते. उसाची वाढ भरघोस होऊन वजन चांगले मिळतेच, पण त्यातील साखरेचे प्रमाणही वाढते.

या विषयावर विविध देशात संशोधन झाले असून, स्पेंट वॉशचा खत म्हणून व्यावसायिक वापरही मोठ्या प्रमाणात केला जात आहे. खरेतर वीस वर्षापूर्वीच महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातही यावर विविध पातळ्यांवर व विविध प्रकारे उपयुक्त ठरणारे संशोधन करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष शेतामध्ये त्यांचा वापर वाढण्यासाठी त्याला हवी तशी दिशा व गती देण्यात आपण सर्वच जण कमी पडलो आहोत.

सतीश खाडे, ९८२३०३०२१८, (लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com