
Kolhapur Sangli News : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारचा दिवस गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत दिलासादायक ठरला. राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे तब्बल बारा दिवसांनी बंद झाले. कोयना धरणातून दहा हजार तर वारणा धरणांतून तीन हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोमवारी (ता. ५) दुपारपर्यंत कमी करण्यात आला. जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी श्रावणाच्या पहिल्याच दिवशी श्रावण सरी झाल्या. कधी ऊन कधी पाऊस तर कधी ढगाळ हवामान असेच चित्र दिवसभर जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी राहिले.
जोरदार पाऊस थांबल्याने तसेच धरणांतील विसर्गही घटल्याने गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात काहीसे समाधान होते. पुराचा धोका सध्या तरी टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजूनही पाणी संथगतीनेत उतरत असल्याने पूर पूर्णपणे ओसरण्यास आणखी आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मार्ग हळूहळू सुरू होत असले तरी पाण्याखालील पिकांची मात्र लवकर सुटका होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. दिवसातून केवळ एकच फूट पाणी उतरत असल्याने नद्यांचे पाणी अनेक ठिकाणी विस्तारलेलेच राहील, अशी शक्यता आहे.
कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. जोपर्यंत धरणांचा विसर्ग पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत गतीने पाणी उतरण्याची शक्यता कमी असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली. पंचगंगा नदीची पातळी अजूनही इशारा पातळीच्या वरून वाहात आहे. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत नदीची पाणीपातळी ४०.२ फूट इतकी होती. इशारा पातळी ३९ फुटांची आहे. कृष्णेच्या पाण्याची पातळीही आयर्विन पुलानजीक ३९ फुटापर्यंत कमी झाली.
वारणा नदीच्या पाण्यातही संथपणे घट झाली. काळम्मावाडी धरण क्षेत्रामध्येही अतिवृष्टी झाल्याने या धरणाची पाणीपातळी स्थिर करण्यासाठी वक्राकार दरवाजातून दूधगंगा नदीपात्रात ९८०० क्युसेकने विसर्ग सुरूच आहे. २२ टीएमसीपर्यंत पातळी स्थिर करण्यात येणार असल्याने धरणाच्या पाणलोटक्षेत्रातून येणारे पाणी तितक्याच आवकेने बाहेर सोडण्यात येत आहे. यामुळे दूधगंगा वेदगंगा नद्यांचे पाणी मात्र स्थिर होते याचा फटका कागलमधील काही गावांना बसत आहे.
कागल तालुक्यातील वेदगंगा व दूधगंगा नदीकाठाच्या ३५ गावातील सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. नदीकाठावरील ऊस पिकाची अवस्था जळणासाठी वापरण्यात येणाऱ्या कांडीसारखी झाली आहे. तालुक्यातील वेदगंगा नदीच्या दोन्ही तीरावर असणाऱ्या १७ गावांतील शेतीला पुराचा फटका बसला आहे.
जुलै महिन्यापर्यंत वेदगंगा व दूधगंगा दोन्ही नदीकाठा शेजारील ऊस पीक जोमात होते. परंतु जुलै महिन्याच्या अखेरीस आलेल्या महापुरामुळे नदीकाठचे भात, सोयाबीन, भुईमूग तसेच ऊस पीक १० ते १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाण्याखाली राहिले. बहुतांश क्षेत्रामधील पीक पूर्णपणे कुजून गेले आहे. सध्या महापुरामध्ये बाधित झालेल्या उसाची अवस्था तर फारच बिकट झाली आहे.
अलमट्टीतून दोन लाख क्युसेकने विसर्ग
सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील धरण पाणलोट क्षेत्रात दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर मंदावला असून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. धरणातून दोन लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरणातून विसर्ग स्थिर ठेवण्याची शक्यता असल्याची माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे अलमट्टी धरणात पाण्याची आवक ही कमी होऊ लागली आहे.
सध्या धरणात ३ लाख ३ हजार ६०८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. तीन ते चार दिवसांपासून अलमट्टी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे पन्नास हजार क्युसेकने विसर्गात घट केली जात असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. सलग तिसऱ्या दिवशी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. सध्या धरणातून दोन लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे. हिप्परगी बंधाऱ्यावर पाणीपातळी ५२६ मीटर असून राजापूर बंधाऱ्याजवळ पाणीपातळी ५२.४ फूट आहे. अलमट्टी धरणाची साठवणूक क्षमता १२३.०८ टीएमसी आहे. सध्या धरणात ७८.०४ टीएमसी इतका पाणी साठा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.