Akola News : अत्यंत कमी कालावधी मिळणाऱ्या अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी पोट निवडणुकीची घोषणा झाली आहे. या ठिकाणी भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी सलग सहा वेळा विजय मिळवत रेकॉर्ड स्थापन केला होता. ३ नोव्हेंबर २०२३ रोजी आमदार शर्मा यांचे निधन झाल्याने निवडणूक आयोगाने नुकतीच ही पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
अकोला पश्चिम मतदार संघ भाजपचा गड मानला जातो. आता गोवर्धन शर्मा यांचा हा वारसा पुढे जातो की निवडणूक निकाल वेगळा येतो याची उत्सुकता लागली आहे. शिवाय यावेळी उमेदवार कोण राहील हेही उत्सुकतेचे बनले आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीचा बिगूल वाजला असून २६ एप्रिललाच मतदान होत आहे.
या मतदारसंघात २९ वर्षे आमदार गोवर्धन शर्मा हे लोकप्रतिनिधी राहिले. विधानसभेचा कार्यकाळ याच वर्षात संपणार आहे. त्यामुळे पुन्हा काही महिन्यांनी पुन्हा निवडणूक होऊ घातली आहे. तत्पूर्वी ही पोटनिवडणूक होत आहे. गोवर्धन शर्मा यांनी या मतदार संघात ज्या पद्धतीने पकड टिकवून ठेवली तितक्या ताकदीचा वारसदार आज कुणीही दिसत नाही.
गेल्या काही विधानसभा पोटनिवडणुकीचा अनुभव लक्षात घेता भाजपचे नेतृत्व कुटुंबात उमेदवारी देणार की इतरांना संधी मिळेल हे आता महत्त्वाचे आहे. शर्मा यांचे पुत्र कृष्णा शर्मा, विजय अग्रवाल, ॲड. मोतीसिंह मोहता, हरीश आलिमचंदानी, डॉ. अशोक आळंबे आदी भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
यापैकी कुणाला संधी मिळते हे महत्त्वाचे आहे. दुसरीकडे विरोधात महाविकास आघाडी, भारीप बहुजन महासंघ सुद्धा कुणाला उतरवतो हेही तितकेच महत्त्वाचे असेल. या मतदार संघात निवडणूक निकाल बदलणार, अशा चर्चा आतापासून आहेत. या महिना अखेर या पोटनिवडणुकीच्या रिंगणात कोण असेल याची नावे निश्चित झालेली असतील. सध्या केवळ चर्चा व शक्यतांचा बाजार भरलेला आहे.
पोटनिवडणूक बनली टीकेचा धनी
अकोला पश्चिम मतदार संघात निवडणूक आयोगाने लागू गेलेली पोटनिवडणूक समाज माध्यमात टीकेची धनी बनली आहे. एप्रिलमध्ये निवडणूक, जूनमध्ये निकाल येईल. त्यानंतर मोजके काही महिने या नवीन आमदाराला मिळतील. पुन्हा विधानसभेची या वर्षाअखेर निवडणूक होत आहे. अशा स्थितीत काही महिन्यांसाठी नवीन आमदार निवडणे व पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणे गरजेचे होते, काय असा प्रश्नही सामान्य जनता समाज माध्यमात व्यक्त करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.