DCM Ajit Pawar
DCM Ajit PawarAgrowon

Electricity For Farmers: शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar Electricity : बिबटे, रानगवे अशा वन्यप्राण्यांचं संकट आहे. त्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना भीती वाटते. म्हणून शेतकऱ्यांना सूर्य उगवला की, वीज पुरवठा आणि दिवस मावळला की, वीज पुरवठा बंद. जेणेकरून शेतकऱ्यांना रात्री घरीच झोपता येईल. असं अजित पवारांनी सांगितलं.
Published on

Electricity In Maharashtra: शेतकऱ्यांना रात्री नाही तर फक्त दिवसाच वीज देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित 'संवाद-उद्योजकांशी' या कार्यक्रमात अजित पवार रविवारी (ता.४) बोलत होते. यावेळी अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची घोषणा केली.

अजित पवार म्हणाले, "आता आम्ही तुम्हाला दिवसाच वीज देणार. रात्रीची वीज शेतकऱ्यांना देणार नाही. आत्ता आठवड्यातील निम्मे दिवस दिवसा आणि निम्मे दिवस रात्री वीज दिली जाते. परंतु बिबटे, रानगवे अशा वन्यप्राण्यांचं संकट आहे. त्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना भीती वाटते. म्हणून शेतकऱ्यांना सूर्य उगवला की, वीज पुरवठा आणि दिवस मावळला की, वीज पुरवठा बंद. जेणेकरून शेतकऱ्यांना रात्री घरीच झोपता येईल." असं अजित पवारांनी सांगितलं.

DCM Ajit Pawar
Farmers Selling Electricity : 'वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना होणार लागू'

राज्यातील शेतकऱ्यांना रात्री शेती पिकांना पाणी देण्यासाठी जावं लागतं. रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जीव जोखमीत घालून शेतात जावं लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास कृषी पंपासाठीअखंडित वीज पुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी मागील कित्येक वर्षांपासून करत आहेत.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु वीज पुरवठा रात्री होत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात हजर राहावं लागतं. राज्यातील विविध जिल्ह्यात बिबटे, रानडुक्कर, रानगवे यासारख्या वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. वन्यप्राणी शेतकऱ्यांवर हल्ले करू लागले आहेत, असं शेतकरी सांगतात.

शेतकऱ्यांना दिवसा वीज घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला तर शेतकऱ्यांना फायदा होईल. सध्या उष्णता वाढली आहे. पिकाला पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावं लागतं. आमच्या भागात वन्यप्राण्यांचा वावर कमी आहे. परंतु मनात भीती असते, असं अखतवाडे येथील शेतकरी अशोक उगले (ता. शेवगाव जि. अहमदनगर) सांगतात.

राज्य सरकार शेतकऱ्यांना मोफत वीज देतं. परंतु दिवसा वीज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जावं लागतं. मागच्या वर्षी बिबट्याने शिवारात धुमाकूळ घातला होता. राज्य सरकारने मोफत विजेसोबत दिवसा वीज द्यावी. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची घोषणा केलेली आहे. पण अजूनही दिवसा वीज मिळत नाही, असं कुंभारी पिंपळगाव येथील शेतकरी कैलास काळे (ता. घनसावंगी जि. जालना) निरीक्षण नोंदवतात.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कृषीपंपासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबवली आहे. परंतु अखंडित वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होत नाही, असा आक्षेप शेतकरी नेते घेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com