
Nagpur News: शेतीतील उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर ऊस, सोयाबीन, कापूस, संत्रा आदी पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी फायद्याचा ठरू शकतो, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
ॲग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे ऊस शेतीसाठी एआय तंत्रज्ञान या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन रविवारी (ता. ६) करण्यात आले. एनबीबीएस सभागृह, (राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग संस्थान) अमरावती रोड येथे झालेल्या या कार्यशाळेला श्री. गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तर बारामती कृषी विज्ञान केंद्रातील संशोधक डॉ. विवेक भोईटे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला ॲग्रोव्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र बोरटकर, मार्गदर्शक डॉ. सी. डी. मायी, आनंदराव राऊत, रमेश मानकर, सुधीर दिवे, डॉ. समय बनसोड, भोजराम कापगते, अनिल जोशी, जयकुमार वर्मा, एनबीबीएसचे संचालक डॉ. नितीन पाटील, डॉ. कलंत्री आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री. गडकरी म्हणाले, की शेतकऱ्याचे उत्पादन थेट बाजारात जाणे. त्याच्या मालाला चांगला भाव मिळणे खूप आवश्यक आहे. त्यादृष्टीने काम सुरू आहे. शेतकऱ्यांना गोडाऊन, कोल्ड स्टोरेज उपलब्ध करून देण्याची गरज आहे. विदर्भात विशेषतः सोयाबीन, कापूस, संत्रा, ऊस या पिकांवर फोकस ठेवावा लागेल.
योग्य तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि संशोधन मिळाले तर विदर्भातील शेतकरी नक्कीच प्रगती करू शकेल. त्यासाठी नवे तंत्रज्ञान आणि संशोधन शेतकऱ्यांना समजून घ्यावे लागेल. एकमेकांच्या समन्वयातूनच हे शक्य आहे. त्यासाठी नॉलेज ट्रान्सफॉर्मेशन चेन निर्माण करावी लागेल. या वेळी श्री. गडकरी यांनी बांबू लागवडीचे महत्त्व देखील सांगितले. सूत्रसंचालन नितीन कुलकर्णी यांनी केले.
शेतकऱ्यांना होईल फायदा
शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष उपयोग आणि फायदे यांची सखोल माहिती बारामती कृषी विज्ञान केंद्रातील संशोधक डॉ. विवेक भोईटे यांनी दिली. उत्पादकता व उत्पन्न वाढीसाठी या तंत्रज्ञानाचा वापर विदर्भातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतो, असे डॉ. भोईटे या वेळी म्हणाले. ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून लवकरच विदर्भातील प्रगतिशील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ बारामती कृषी विज्ञान केंद्राला भेट देणार असून तेथील तंत्रज्ञान अवगत करून घेणार आहे.
शेतकऱ्यांमध्ये बसून साधला संवाद
श्री. गडकरी यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या मध्ये बसूनच ‘एआय’ वापराच्या संदर्भातील सादरीकरण बघितले. तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन ऐकले. त्यानंतर त्यांनी बराचवेळ खाली बसूनच शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर गेले असता काही मुद्यांवर विचार मांडले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.