
Ai Technology: ‘ए आय’चा उद्देश तंत्रज्ञानाचा उपयोग करून मानवी जीवन अधिक सोपे आणि कार्यक्षम बनवणे हा आहे. एआय ही एक मानवी बुद्धिमत्तेप्रमाणेच कार्य करू शकणारी संगणक प्रणाली आहे. यामध्ये तर्क म्हणजेच लॉजिक करण्याची, मशिनला शिकण्याची, निर्णय घेण्याची आणि समस्या समाधान करण्याची क्षमता दिली जाते.
‘एआय’चे प्रकार
नैसर्गिक बुद्धिमत्ता : यालाच नॅरो एआय म्हणतात. ही संगणक प्रणाली विशिष्ट कामे करण्यासाठी विकसित केलेली असते. उदाहरणार्थ, अलेक्सा, सिरी सारखे डिजिटल डिव्हाइस किंवा चेहरा ओळखणारी संगणकीय प्रणाली ही नैसर्गिक बुद्धिमत्तेमध्ये येते.
सामान्य बुद्धिमत्ता : म्हणजेच जनरल एआय यामध्ये सर्वसमावेशक क्षमता असलेली मानवी बुद्धिमत्ते सारखीच प्रणाली असते. या क्षमतेचा विकास अद्यापही सुरू आहे.
सुपर बुद्धिमत्ता : यामध्ये मानवी बुद्धिमत्तेपेक्षा अधिक शक्तिशाली प्रणाली म्हणजेच सुपर बुद्धिमत्ता. ही तशी पाहिली तर भविष्यातील संकल्पना आहे. याच्यावर देखील संशोधन सुरू आहे.
एआयचे मुख्य घटक
मशीन लर्निंग : यामध्ये डेटा दिलेला असतो, त्या डेटाचा उपयोग करून मशिन स्वतःहून शिकते.
नैसर्गिक भाषा प्रक्रिया (एनएलपी) : मानवी भाषा समजावून घेणे व त्यावर प्रक्रिया करणे याचा समावेश नैसर्गिक भाषा प्रक्रियेमध्ये होतो. चाट जीपीटीसारख्या एआयच्या माध्यमातून आपल्याला प्रादेशिक भाषेमध्ये सुद्धा माहिती उपलब्ध होते. हा देखील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
कॉम्प्युटर व्हिजन : यामध्ये प्रतिमा व व्हिडिओ ओळखण्याची क्षमता आणि त्याचे विश्लेषण करण्याची क्षमता असते.
रोबोटिक्स : सॉफ्टवेअर व हार्डवेअरचा वापर करून मशीनला स्वयंचलित पद्धतीने कार्य करण्यामध्ये सक्षम करणे याचा या घटकांमध्ये समावेश होतो.
एआयचा विकास
प्रारंभिक टप्पा (१९४० ते ५०) : दुरिंग टेस्ट ही संकल्पना १९५० मध्ये प्रस्तावित केली. ज्यामध्ये मशिनचे वर्तन माणसासारखी असल्याचे पाहिले गेले. गणितीय लॉजिकचा वापर करून बुद्धिमत्ता अनुकरण करण्याच्या शक्यता या कालखंडामध्ये तपासल्या गेल्या.
प्रायोगिक टप्पा (१९५६) : डार्ट माउथ कॉन्फरन्स : १९५६ मध्ये जॉन मेकार्थी, मर्विन मिन्स्की, नॅथनियल शेचेस्टर आणि क्लाड शेनॉन यांनी एआय शब्दाचा अधिकृत वापर सुरू केला. एआयला विज्ञान म्हणून याच कालखंडामध्ये मान्यता मिळाली. मशिन लर्निंग आणि लॉजिक प्रोग्रॅमिंगवर भर दिला गेला.
एआय संशोधन विस्ताराचा सुरुवातीचा काळ : (१९६० ते ७०) : बुद्धिमान सिस्टीमसाठी अल्गोरिदम आणि संवादात्मक प्रोग्रॅम्स तयार करण्यात आले. याच कालखंडामध्ये एआयने औद्योगिक आणि आरोग्य क्षेत्रामध्ये प्रवेश केला.
एआयचा विस्तार (१९९० ते २०००) : संगणक क्षमता या कालखंडामध्ये वाढली. डेटा प्रक्रिया सोपी झाली. त्याचबरोबर नेटवर्कमध्ये लक्षणीय प्रगती झाली. त्यामुळे एआय चा विस्तार या कालखंडामध्ये सुरू झाला.
आधुनिक काळ (२०१० च्या पुढे) : डीप लर्निंग आणि बिग डेटा यामुळे आधुनिक विकासाचा पाया रचला गेला. अलेक्सासारख्या व्हर्च्युअल असिस्टंटचा वापर सर्वसामान्य लोकांचे जीवनात वाढला. ऑटोनॉमस कार, रोबोटिक्स, हेल्थकेअर अशा क्षेत्रामध्ये एआयचा प्रभाव मोठा प्रमाणात वाढला.
एआयचा वापर
एआय शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणावर क्रांती घडवून आणत आहे. शिक्षण प्रक्रियेला अधिक सुलभ, प्रभावी आणि वैयक्तिक करण्यासाठी एआय चा केला जात आहे. एआयच्या मदतीने डिजिटल टेक्स्टबुक, व्हिडिओ, सजीव सादरीकरण आणि सिम्युलेशन्स तयार करता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय सखोल आणि आधुनिक पद्धतीने समजावून घेता येतो. केरळमध्ये तिरुअनंतपुरम येथील केटीसीटी या माध्यमिक विद्यालयाने पहिल्या एआय शिक्षिकेचा (आयरिस) उपयोग केला.
ही शिक्षिका मेकरलॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. शेती क्षेत्रातही उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता पर्यायाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी एआयचा वापर होऊ शकतो. बारामती येथील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने ऊस शेतीत एआय तंत्राचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्याचा विस्तार शेतकऱ्यांच्या शेतावर होत आहे. सायबर सुरक्षा, शिक्षण, चाट बॉट्स, वाहतूक, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, शेती अशा विविध क्षेत्रांमध्ये एआयच्या वापरास भविष्यात मोठ्या संधी निर्माण होतील.
- प्रा. मनोज भावसार, व्याख्याता, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.