
Pune News : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ॲग्रोवनच्या दिवाळी अंकाचे पुणे येथे आयोजित ‘अॅग्रोवन’च्या एफपीसी महापरिषदेत रविवारी (ता. २९) थाटात प्रकाशन झाले. या वेळी सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, ॲग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, झुआरी फार्महब लि.चे व्यवस्थापकीय संचालक मदनमोहन पांडे उपस्थित होते.
कृषिमंत्री मुंडे या वेळी म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांबरोबर माझं जे नातं आहे, तसेच माझे अॅग्रोवनबरोबर नाते आहे. माझे वडील अॅग्रोवनचे नियमित वाचक होते. आज मी कृषिमंत्री आहे, ते असते तर त्यांना त्याचा आनंद झाला असताच, पण त्याहूनही अधिक ‘अॅग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन माझ्या हस्ते कृषिमंत्री म्हणून होते आहे, याचा आनंद त्यांना अधिक झाला असता.’’ या वेळी त्यांनी शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची गरज आहे, असे सांगताना आगामी ध्येयधोरणांबाबत माहिती दिली.
यंदाच्या दिवाळी अंकाची थीम आहे ‘ज्ञानाची किमया’ ॲग्रोवनसह विविध माध्यमांतून, स्रोतांतून ज्ञान आणि माहिती मिळवून शेतीत प्रयोगशीलतेची वाट धरलेले शेतकरी म्हणजे शेतीभातीतले ज्ञानेश्वरच. ज्ञानमार्गाची कास धरून आपल्या शेतीत नवे प्रयोग करणाऱ्या राज्यभरातील निवडक २५ शेतकऱ्यांच्या यशकथा हे यंदाच्या अंकाचे खास वैशिष्ट्य आहे. तसेच राज्याचे कृषिमंत्री मुंडे, महसूल व पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचा ‘ॲग्रोवन’बरोबरचा प्रवास शब्दबद्ध केला आहे.
त्याचप्रमाणे प्रताप चिपळूणकर, महारूद्र मंगनाळे, नागेश टेकाळे, चंद्रशेखर भडसावळे आणि डॉ. दत्तात्रय वने यांचे खास लेख या अंकात आहेत. सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी रानकवी ना.धों. महानोर यांच्यावर लिहिलेला दीर्घलेख ही या अंकाची वेगळी खासियत आहे.
आयएएस अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी असताना केलेल्या शेतकरीकेंद्रित कामाबद्दलची केस स्टडी या अंकात आहे. त्याच प्रमाणे श्रीकांत देशमुख, आबाजी ऊर्फ मिलिंद रंगराव पाटील, ऐश्वर्य पाटेकर यांचे मनोज्ञ लेख आहेत. याशिवाय कथा, कविता, ललित लेख, व्यंगचित्रे, राशिभविष्य असा ऐवज आहे.
दोन दिवसांत राज्यभर अंक उपलब्ध होणार
‘अॅग्रोवन’च्या दिवाळी अंकाने आपले वेगळेपण आणि वैशिष्ट्यपूर्णतेमुळे शेतकऱ्यांची पसंती मिळवली आहे. त्यामुळेच दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांसह अन्य वाचकांचा उत्तम प्रतिसाद या अंकाला मिळतो, ‘अॅग्रोवन’च्या दिवाळी अंकाचा खास असा वाचकवर्ग आहे. असा हा दिवाळी अंक राज्यात सर्वत्र दोन दिवसांत उपलब्ध होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.