Rural Story : गावाकडची नातीगोती विसरता येत नाहीत!

गाडी डांबरी सडकेहून एकामागून एक फाटा मागे टाकत पुढे जात होती, ह्या डांबरी सडकेचे वैशिष्ट्य म्हणजे सडकेवर कुठेच गाव लागत नाही. लागतात फक्त फाटे.
Rural Story
Rural Story Agrowon
Published on
Updated on

- विकास गोडगे

“ तसं असतंय कारं बापू, चल कि वत्सा मावशीचं सराद्ध हाय, सगळं पावनं रावळं येत असत्यात, जावं लागतं बाबा.”

आई म्हणाली आणि मी मोबाईल मधलं मुंडकं काढून , “ जा बरं तू टम टम करून, हे घे पैसे “ असं म्हणून आईसमोर पाकीट टाकून पुन्हा मोबाईल मधे मुंडकं घातलं. तेवढ्यात मामी पण आल्या, मागोमाग चुलत मामी, आणि त्यांच्या भावकीतल्या अजून दोन चार माम्या आल्या. आईचं आणि वडिलांचं एकंच गाव असल्याने सगळं जनगोत गावातच आहे. किंबहुना एका वार्डातचं आहे. ह्या चार पाच बायांना जावंचं लागणार होतं, कारण ज्या वत्सा मावशीचं श्राद्ध होतं, ह्या सगळ्या बायकांची ती माहेरून आज्जी, मावशी, चुलती असंच काहीतरी लागत होती.

“बापू चलकिरं लेकरा, वळकी पाळकी होत अस्त्यात्या ....”

खरं तर आईला, तिच्या आजोळच्या पाव्ह्ण्यात आपलं लेकरू दाखवायचं असतं, आपल्या लेकराच्या कारमधून रुबाबात उतरून, “बघा माझा वाघ कसा हाय “ हे दाखवायचं असतं. ह्यापेक्षा एखाद्या आईला दुसरा कोणता मोठा आनंद असतो? पण मला आमच्या मित्रा सोबत रानोमाळ बोंबलत हिंडायचं असतं म्हणून मी टाळत होतो. पण सगळ्याच बाया घरी येऊन बसल्या आणि चला म्हणून निघालो. जाताना गाडीत मराठी गाणी लावायची काळजी घेतली. आमचा गाव सोडून तिकडं मेन ल्यांड मराठवाड्यात जायला मला नको वाटतं. म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यात्तील भूम तालुक्यापासून मेनल्यांड मराठवाडा चालू होतो असं माझं मत आहे.

गाडी डांबरी सडकेहून एकामागून एक फाटा मागे टाकत पुढे जात होती, ह्या डांबरी सडकेचे वैशिष्ट्य म्हणजे सडकेवर कुठेच गाव लागत नाही. लागतात फक्त फाटे. आणि कायम त्या फाट्यावर एखाद्या झाडाखाली वाहनाची वाट बघत बसलेली दोन चार मंडळी. त्यात एकदोन बाया पोरी आणि दोनचार गडी माणसं, आणि उगीच सडकेवरून लांबपर्यंत येणाऱ्या वाहनाची वाट बघत असलेल्या नजरा. हे चित्र गेल्या तीस वर्षात बदललेले नाही. भारत कितीही महासत्ता झाला तरी बदलणार नाही, आर्टीफिशियल इंटेलीजंसचे रोबॉट सगळी मानव जात ताब्यात घेऊन अमेरिकेचा उध्वंस करत सुटले तरी आमच्याकडे फाट्यावर एसटीची वाट बघत बसलेळी मंडळी दिसतीलच याबाबत मी अजिबात साशंक नाही. अशाच एका फाट्याहून गाडी वळवताना सावकाश केली आणि फाट्यावर एसटीची वाट बघत बसलेल्या एका म्हातारीवर माझ्या एका मामीची नजर गेली.

“अहो ती, तिकडची पाथरुडाकडली म्हातारी व्हती कावं, तशीच दिसली बगा मला तर....”

“व्हय बया, ती हिकडं कशाला मरायला येतीय”

असा काहीतरी बाया माणसात संवाद चालू झाला.

“कोण म्हातारी, कुणाची कोण” माझी उत्सुकता जागी झाली

“इकास बापूला म्हाईत न्हाई व्हय, आवं आपल्या कोंडीराम तात्याची दुसरी बायकू, तिकडचीच व्हती, ठूल्याली व्हती.......” एक मामी डिटेल मध्ये चालली आणि आमच्या आईने तिला तात्काळ थांबवले.

“तुला तर कायबी सुचतं बघ....” असं आपल्या एका भावजयीला दापित मला म्हणली...”चलरं बापू, उगच आपलं......कायतरी....” हे भयंकर इंटरेस्टिंग असतं, जनगोताचं डीप नॉलेज असंच मिळत असतं असा माझा अनुभव आहे.

Rural Story
Rural Story : माझं माहेर आंबेठाण गाव गं

गाडी वळणं वळणं घेत जात होती, आमच्या भागात असलेला सपाट प्रदेश सोडून आता माळावरून जाऊ लागली होती. आमच्या शिवारात दूर दूर पर्यंत दिसणाऱ्या तुरीच्या शेती सोडून आता माळावरची सुंदर कुसळ दिसू लागली होती.

“इकडली माळरानं किती भारी दिसतात...लांब लांब पसरलेले डोंगर आणि त्यावर डोलणारं हे पिवळ, करडे, तपकिरी गवत.....गाडी चालू असताना सुद्धा ह्या माळावरील वार्याने हलणाऱ्या गवताचा आवाज किती भारी वाटत आहे.”

हे ऐकून आई म्हणाली, “काय भारीय, जनावरं सुद्धा खात न्हाईत ती कुसळं, दुधावर जगत्यात हिकडली लोकं, आपल्या पोरी हिकडं देत न्हाईत, हिकडल्या पोरी आपल्या गावात करून घेत्यात”

“व्हय!!!!! आता किती बागाईत झालंय कि, मिरच्या, द्राक्षे, ऊस लावत्यात लोकं, आता काय पहिल्या सारखं राहिलंय का?” एका मामीला तिच्या माहेरच्या गावांना नावे ठेवलेले आवडले नाही. व्हय व्हय व्हय म्हणून दुसऱ्या माम्यानी साथ दिली आणि मला जाणवलं ह्या सगळ्या माम्यांची माहेरं हिकडचीच आहेत.

वत्सा मावशीचं गाव आलं. ते लोक रानात राहत होते. खूप साऱ्या कार लागलेल्या होत्या. मला कार लावायला जागा हुडकावी लागली, मी कार लावून तिथे समोरच असलेल्या एका टेकडीवरच्या झाडाखाली जाऊन बसलो. हिकडच्या पावण्या रावळ्यात एखादी दुसरी कार असेल आणि आपण म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी असू हा माझा गैरसमज मोडला. श्राद्धा निमित्त एक तरुण पोरगी कीर्तनाच्या नावाने अतिशय शुद्ध भाषेत त्या जमलेल्या हजार लोकापुंढे आभाळ हाणत होती. मला तिथे जाऊन, तुझ्या सात पिढ्यात असं पुस्तकी कोण बोलतं कागं? असं विचारू वाटलं. पण तो विचार मनातच ठेवला.

उगीच त्या डोंगरावर म्हसुबा सारखं बसून कंटाळा आला म्हणून खाली आलो आणि गर्दीत ओळखीची माणसं बघून शेजारी जाऊन उभा राहिलो. एका बाजूला सगळे पटके, इजारी, टोप्या अशी नव्वद टक्के मंडळी तर दुसऱ्या बाजूला बोडकी माणसं उभा राहून त्या तरुण तुर्क कीर्तनकार पोरीचे ज्ञानकण जमेल तेवढे गोळा करून घेत होते. मला ते ज्ञानकण सहन होत नव्हते म्हणून मी इकडे तिकडे नजर फिरवली तर अजून दोन चार तोंडावर तेच भाव होते. त्या बोडक्या मंडळीत काही शिक्षक, वकील वगैरे मंडळी होती.

“धंदा करून टाकलाय ह्या लोकांनी कीर्तनाचा..” असा आवाज आला आणि मला “आपल्याच जातीचे” कोणतरी भेटल्याचा आनंद झाला. कीर्तन संपलं, त्या कीर्तनकार पोरीने डोक्यावर पदर घ्यायचा म्हणून घेतलेली ओढणी आता खांद्यावर घेतली आणि पैशाचं पाकीट घेऊन आपल्या कार मधून भुर्र निघून गेली.

कीर्तन झाल्यावर सगळी बायका आणि पुरुष मंडळी जिथे वत्सा मावशीचा अंत्य विधी केलाय तिथे दर्शनाला गेली.

जेवणं चालू झाली, मी पंगतीला बसलो, बोलाकुंडली....हरीविठ्ठल ...श्रीरीतज्ञानदेवतुकाराम च्या घोषा नंतर वाढपे वाढू लागले. जेवणात, पनीर नाही हे बघून मला अत्यानंद झाला, ह्या लोकांचा अजून विकास झालेला नाही हे बघून बरं वाटलं, तसेच , जेवणात वरण भात नसून, फोडणीचा मसाला भात, वांग्या बटाट्याची भाजी, चपाती, नुक्ती हे सगळं ऑथेंटिक बघून अजून लोक फारच मागास असल्याचं जाणवून अजून बरं वाटलं. लग्नात जेवायच्या अगोदर पाणी पुरी, सामोसा, आणि जेवणात पनीर, पळीच्या आकारा एवढी पुरी आणि वरण भात चारनारांना मोदिजींनी देशद्रोही जाहीर करायला पाहिजे हा विचार करत करत मी चार चपात्या, भात आणि पसाभर नुक्ती खाऊन उठलो आणि वत्सा मावशीला धन्यवाद दिले.

आता निघायची वेळ झाली होती ,वत्सा मावशीची एक बहिण म्हणजे अगदीच मावळतीला पोचलेल्या म्हातारी भोवती सगळ्या बायकांनी गर्दी केली होती. आईने मोठ्याने आवाज देऊन मला बोलावून घेतलं. मी तिकडे निघालो , बायका मला त्या म्हातारी जवळ जायला जागा देत होत्या आणि कौतुकाने माझ्याकडे बघत होत्या.

“कौसा आकाचा इकास हाय ....”असा आवाज माझ्या कानावर पडत होता, मी गर्दीत म्हातारी जवळ जाऊन वाकून पाया पडलो, म्हातारीनं जवळ घेऊन मुका घेतला आणि माझ्या डोक्यावर बोटं मोडली. मला भारी वाटू लागलं. तिथंच म्हातारीनं माझ्या सारख्याच काही शिकलेल्या लेकरांना बोलवून घेतलं होतं. दोन तीन आधुनिक दिसणाऱ्या मुली होत्या,

म्हातारीने वोळख करून दिली, “ हि बघ हि डाक्टरकीचा कोर्स करतेय तिकडं लांब दिल्लीला....हि दुसरी पण डाक्टरकीचाच कोर्स करतीय ....मला नेमकं समजलं नाही म्हणून मी त्या मुलींकडे बघितलं, एक म्हणाली M.B.B.S, करतेय, AIMS दिल्लीला तर दुसरी म्हणली M.B.B.S झालंय M.D करतेय paediatricians. त्या अडवळणाच्या गावातील मुली जिथं एसटी कधीच जात नाही , फक्त चौथी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे तिथल्या मुली AIMS ला पोचल्या, त्या मुलींचा आणि त्यांच्या पालकांचा खरंच मोठा सत्कार करायला हवा असं माझ्या मनात आलं.

तीनचार तास तिथं असताना मला शहराचा, फेसबुकवर काय चाललंय याचा, किंबहुना जगात काय चाललंय याचा विसर पडला होता. आपण जगात अजिबात गरजेच्या नसलेल्या किती लोकांना, किती गोष्टींना महत्त्व देतो आणि आपल्या असणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करतो याची पण जाणीव होत होती.

ते हजारां पेक्षा जास्त रक्ताने बांधलेले स्त्री पुरुष एकत्र पाहून मला कौतुक वाटत होतं आणि समोर त्या म्हातारीचा चेहरा येऊन तिचे शब्द मनात घोळत होते. आपल्या बहिणीच्या श्राध्दाला जमा झालेलं हे हजारो लोकांचं गणगोत बघत ती भरल्या आवाजात म्हणाली होती, "बघितलं का माझं गणगोत......? आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. किती ते समाधान. खडतर आयुष्य अडखळत अडखळत जगत मावळतीला जाताना दिसणारी खरी श्रीमंती.

परतताना गाडी चालवत, मला घेऊन आली म्हणून आईला धन्यवाद देऊ वाटत होते पण तशी आपल्याकडे पध्दत नाही म्हणून म्हणालो, बरं केलं आई मला घेऊन आलीस. खुप बरं वाटलं खुप दिवसा नंतर. खोट्या खोट्या लोकांत राहुन मनावर आलेलं दडपण निघुन गेलं.

शहरातल्या चौकोनी कुटुंबात राहून एकटे एकटे वाटणारा समाज निर्माण होत असताना, एखाद्या माणसाच्या अंत्ययात्रेला फक्त चौघं किंवा पाच जनंच बघायची सवय लागत असताना, इकडे गावाकडे एका म्हातारीसाठी हजार लोकांचा गोतावळा जमा होतो, हे माझ्यासाठी खूपच आनंदायी होतं. उदारीकरण, शहरीकरण आणि भांडवलवाद माणसाला ह्या गावगाड्यातून बाहेर काढून एकटं पाडतो, हे किती तंतोतंत खरंय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com