
Chhatrapati Sambhaji Nagar News : ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या ‘ॲग्री एक्स्पो-२५’ मध्ये सोमवारी (ता.१३) शेवटच्या दिवशी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत संशोधित तुरीचे उत्पादक, शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी जमले. या वेळी तुरीचे प्रश्न आणि उत्पादकतेवर सर्वांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत बदनापूर कृषी संशोधन केंद्राने संशोधित केलेल्या बीडीएन-७११, बीडीएन-७१६ व अलीकडे बीडीएन २०१३-४१ (गोदावरी) या वाणांना शेतकऱ्यांची विशेष पसंती मिळते आहे. प्रदर्शनामध्ये सोमवारी वैजापूर तालुक्यातील बळेगाव, अघुर, चिकटगाव या तीन गावांतील शेतकऱ्यांचा गट कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आला होता.
त्याचवेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ब्रिडर डॉ. डी. के. पाटील, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे, आत्माच्या प्रकल्प संचालक धनश्री जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी अश्विनी पाठारे हे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. योगायोगाने शास्त्रज्ञ, अधिकारी आणि तूर शेतकऱ्यांची भेट झाली अन् शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या तुरीच्या गोदावरी वाणावर चर्चा सुरू झाली.
प्रदर्शनाला आलेल्या तीन गावांतील शेतकरी कशा पद्धतीने तुरीच्या गोदावरी वाणाकडे वळले, याची माहिती शेतकऱ्यांपैकी रुपेश डूबे, अनिल सूर्यवंशी व नानासाहेब घायवट यांनी दिली. या तीन गावांत सुमारे ११० शेतकरी गोदावरीच्या तुरीचे उत्पादन घेत आहेत. एक पाणी देऊन घेतलेल्या गोदावरी तुरीची काढणी आता सुरू होण्याच्या टप्प्यात आहे. एकरी १२ ते १३ क्विंटलपर्यंतचे उत्पादन काही शेतकऱ्यांनी घेतले आहे. शेतकऱ्यांचा हा फीडबॅक पाहून शास्त्रज्ञ डॉ. पाटील यांच्यासह विभागीय कृषी सहसंचालक डॉ. मोटे चांगलेच समाधानी झाले. शास्त्रोक्त व्यवस्थापन आणि वाणांची योग्य निवड केल्यास उत्पादन मिळू शकते, याचाच हा प्रत्यय असल्याची भावना डॉ. मोटे यांनी व्यक्त केली.
साडेसात हजारांच्या पुढेच दराची अपेक्षा
विविध राज्यांतील तुरीच्या पिकाची अवस्था व उत्पादन लक्षात घेता आपल्याकडील तुरीचे उत्पादन चांगले आहे. शेतकऱ्यांना किमान साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पुढेच दर मिळतील, अशी आशा असल्याचे मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले. ॲग्रोवन कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने शास्त्रज्ञ, शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या भेटीचा योग आला आणि हा संवाद चांगलाच रंगला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.