
Increase in fruit and vegetable production India 2025 : देशातील फलोत्पादन ३६२.०९ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने नुकताच पहिल्या पीक उत्पादन अंदाज अहवालात वर्तवला आहे. तसेच देशातील एकूण भाजीपाला पिकांच्या उत्पादनात वाढ होण्याची कृषी मंत्रालयाला अपेक्षा आहे. देशात गेल्यावर्षी २०७२.०८ लाख टन भाजीपाला उत्पादन झालं होतं.
यंदा मात्र भाजीपाला उत्पादन २१४५.६३ लाख टनांवर जाईल, असा अंदाजही कृषी मंत्रालयाने वर्तवला आहे. परंतु रब्बी हंगामात ढगाळ वातावरणामुळे तसेच देशातील विविध भागात अवकाळीने हजेरी लावली. त्यामुळे भाजीपाला पिकांना किडरोगांचा मोठा फटका बसला. तर आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच उष्णतेचा पारा चढू लागला आहे. तर जलसाठयातही घट होऊ लागली आहे. त्यामुळे भाजीपाला आणि फळ उत्पादकतेत घट येण्याची शक्यता शेतकरी आणि जाणकार व्यक्त करत आहेत.
पहिल्या अंदाज अहवालात केंद्रीय कृषी मंत्रालयाने चालू वर्षात देशातील कांद्याचे उत्पादन १९ टक्के तर टोमॅटो उत्पादन १.६ टक्के आणि बटाट्याच्या उत्पादनात मागील वर्षीच्या तुलेनेत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु प्रमुख कांदा, टोमॅटो आणि बटाटा उत्पादन राज्यात पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे शेतकरी नाराज देखील आहेत. दरम्यान जून २०२५ मध्ये चालू पीक वर्ष संपणार आहे.
देशात मागील वर्षात कांद्याचं २४२.६७ लाख टन उत्पादन झालं. परंतु यंदा मात्र २८८.७७ लाख टन कांदा उत्पादन होईल. म्हणजे कांदा उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत १९ टक्के वाढ होईल, असा अंदाज कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे. तसेच टोमॅटो उत्पादन गेल्यावर्षी २१३.२३ लाख टन झालं होतं. यंदा मात्र त्यामध्ये १.६ टक्के वाढ होऊन उत्पादन २१५.४९ टक्क्यांवर पोहचेल. तर बटाटा उत्पादन यंदा ५९५.७२ लाख टनांवर पोहचून गेल्यावर्षीच्या तुलनेत २५.१९ लाख टन अधिक उत्पादनाची केंद्र कृषी मंत्रालयाला अपेक्षा आहे.
देशातील फळ उत्पादनातही वाढ होण्याची कृषी मंत्रालयाला अपेक्षा आहे. फलोत्पादनात २.४८ लाख टनांची वाढ अपेक्षित असून उत्पादन ११३२.२६ लाख टन होईल असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आंबा, द्राक्ष आणि केळी या फळ पिकांचं उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच मसाले पिकांचं उत्पादन ११९.९६ लाख टनांवर पोहचण्याचा अंदाज आहे. देशांतर्गत लसूण आणि हळद पिकांच्या उत्पादनातही वाढ केंद्रीय कृषी मंत्रालयाने वर्तवली आहे. एकूण फलोत्पादन लागवडीखालील क्षेत्र गेल्यावर्षीच्या २८.९४ दक्षलक्ष टनांवरून २९.०९ दशलक्ष टनांवर पोहचण्याचा अंदाजही केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
२०२४ मध्ये मॉन्सून हंगामात पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. परंतु अनेक अवकाळी आणि पुरस्थिती निर्माण झाली. त्याचा फटका फळ आणि भाजीपाला पिकांना बसला. रब्बी हंगामात ढगाळ वातावरण आणि कमी थंडीमुळे पिकांना किड रोगांचा सामना करावा लागला. तर केंद्र सरकार धोरण लकव्याचा शेतकऱ्यांना झटका सोसावा लागला. परिणामी शेतकऱ्यांची उत्पादकता आणि उत्पन्न घटलं. आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाचा पारा चढू लागला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.