Indian Agriculture : शेती हाच जीवनाचा मूलाधार

Indian Farmer : शेतकऱ्यांएवढा मातीशी एकरूप होणारा दुसरा जीव नाही. मातीचा रंग काळा आहे. शेतात राबून राबून शेतकरीही काळाठिक्कर होतो. अनेक लोक काळा रंग अशुभ मानतात. परंतु काळ्या ढगांशिवाय पाऊस पडत नाही, पंढरीचा पांडुरंग असो की द्वारकेचा कृष्ण असो, दोघांचाही रंग काळाच आहे.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

गंगा बाकले

Agriculture Life : मी दररोज सकाळी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात फिरायला जाते. सकाळची शुद्ध व मोकळी हवा आणि दुतर्फा असणारी झाडे यामुळे वातावरण खूपच प्रसन्न असते. मनालाही प्रसन्नता वाटते. रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली झाडे मनाला फुलवून जातात. अनेक वृद्ध-युवक-महिला आणि बालकेही फिरण्यासाठी येतात. तेही या वातावरणात रमून जातात. मी फिरायला गेल्यानंतर दररोज नवनवीन रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करते व तिथे कोणते नवनवीन झाडे आहेत का? त्यांची वाढ व्यवस्थित होते का? आदी बाबींचे निरीक्षण करते. त्या वेळी झाडाखालील माती पानांच्या-काड्यांच्या आणि इतर अवशेषांमुळे सजीव झाल्याचे दिसून येते. अनेक जिवाणू जमिनीमध्ये दिसतात.

विद्यापीठाच्या मुख्य कमानीतून आत मध्ये गेल्यावर डाव्या बाजूला मुख्य प्रशासकीय इमारत आहे. त्या इमारतीवरील एक महत्त्वाचे वाक्य मी वाचले. ‘कृषि मुलं हि जीवनम्...’ अर्थातच, सर्वांच्या जीवनाचा मूळ आधार शेती आहे. या वाक्याने माझ्या मनात अनेक विचारांचे काहूर उठले. या वाक्यात सखोलता आणि आशय व अर्थ दडलेला आहे, असे मला विचारांती जाणवले. या वाक्यामुळे मी एक जुलै या दिवसाचा ‘कृषी दिन’ म्हणून सर्व अर्थाने विचार करू लागले. हा दिवस महाराष्ट्रभर कृषी दिन म्हणून नुकताच साजरा केला गेला.

Indian Agriculture
Indian Agriculture : खरिपात नको अफवांचे पीक

सलग अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे शेतीचे महानायक स्व. वसंतराव नाईक यांच्या शेती कार्य स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. हरित क्रांती व रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा पायाभूत प्रयत्न वसंतराव नाईक यांनी केला. एकूणच कृषीसाठी त्यांचे योगदान अमूल्य राहिलेले आहे. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांच्या कष्टाची सर्वांना जाणीव व्हावी आणि शेतकऱ्यांच्या संदर्भाने समाजाने सकारात्मक विचार करावा, याकरिता कृषी दिन साजरा होणे महत्त्वाचेच आहे. ऊन-वारा-पाऊस सदैव अंगावर घेत शेतकरी सतत राबवत असतो. शेतकरी राबतो पण तो या राबण्याचे कधीच भांडवल करीत नाही. त्यामुळे या दिवसाकडे तो मुद्दामून लक्ष देत नाही, तरीही कृषिप्रधान देशात समाजानेच या दिनाच्या संदर्भाने शेतकऱ्यांची कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे.

‌कृषी व ऋषी ते दोन शब्द उच्चाराच्या दृष्टीने सारखेच वाटतात. पण माझ्या मते, ऋषी शारीरिक आणि मानसिक साधना करून आध्यात्मज्ञान व आत्मज्ञान मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. तर शेतकरी स्वतःच्या रक्ताचे पाणी करून जगासाठी धान्य पिकविण्याचे शाश्‍वत काम करतो. ऋषीचा उद्देश आत्म भाव जागवणे आणि मोक्षप्राप्ती याकरिता असतो. तर शेतकऱ्याचा उद्देश मानवी जीवन सुफल करण्याचा असतो. शेतकरी काळ्या मातीवर जिवापाड प्रेम करतो आणि त्यातच आपले आयुष्य खर्ची घालतो. म्हणून मला ऋषीपेक्षा शेतकऱ्यांचे मोल अधिकचे वाटते.

शेतकऱ्यांएवढा मातीशी एकरूप होणारा दुसरा जीव नाही. मातीचा रंग काळा आहे. आपलाही रंग राबून राबून काळा ठिक्कर करणारा शेतकरी बंधू आहे. अनेक लोक काळा रंग अशुभ मानतात. काळे कपडे परिधान करत नाहीत. कदाचित त्यांना संपूर्णपणे काळ्या रंगाचे महत्त्व आणि सौंदर्य माहीत नसेल का? काळ्या ढगांशिवाय पाऊस पडत नाही, पंढरीचा पांडुरंग असो की, द्वारकेचा कृष्ण असो, दोघांचाही रंग काळाच आहे. खऱ्या अर्थाने हे दोन दैवत कष्टकरी माणसांचे आदर्श मानायला हवेत. त्यांनीही कष्टकरी माणसांनाच स्वीकारलेले आहे.

Indian Agriculture
Indian Agriculture : शेती क्षेत्राची आर्थिक घसरगुंडी

छत्रपती शिवाजी राजांनी सुद्धा अमावास्येच्या काळोखाला आपला सोबती करून अनेक मोठमोठ्या मोहिमा फत्ते केलेल्या आहेत. काळ्या मातीत सर्वच पिके भरघोस येतात. म्हणूनच ‘काळ्या मातीत तिफन चालते’ हे गाणे सर्वाधिक लोकप्रिय झालेले आहे. विठ्ठल वाघांना ‘तिफन चालते म्हणजे...’ जगाचे जीवन सुरू होते, ते काळ्या मातीत पेरणी झाल्यामुळे आणि पिके आल्यामुळे, असेच सूचित करायचे आहे. हे सर्व मान्य ही आहे. या काळ्या मातीत राबणारे आदर्श आपल्याच आजूबाजूला आहेत. आपण ते डोळसपणाने बघूयात. महाराष्ट्रात किंवा आपल्या राष्ट्रात अनेक शेतकरी शेतीतील आदर्श ठरलेले आहेत, ठरत आहेत. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर यानिमित्ताने आपण करत आहोत.

शेतीचा शोध लागल्यानंतर मानव स्थिर जीवन जगू लागला. कालांतराने शेतीमध्ये अनेक सुधारणा झाल्या. त्यामुळे मानवी जीवन सुखकर झाले. शेतीमध्ये पहिल्यापासून महिलांचे कष्ट अतोनात आहेत. आजही त्यांच्याच जिवावर शेतीचे अनेक कामे होत आहेत. असे असतानाही शेतकऱ्यांकडे आणि शेतीत राबणाऱ्या महिलांकडे समाज समृद्ध नजरेने पाहत नाही. शेती करणे म्हणजे कमी दर्जाचे आहे, असा गैरसमज अनेकांनी करून घेतलेला आहे. कष्ट संस्कृती शेतकऱ्यांनी आबादी आबाद केलेली आहे. सर्वांनी विशेषतः शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची किंमत केलीच पाहिजे.

भारतात सुमारे ६० टक्के जमीन शेतीसाठी वापरात आहे. ऋतुमानानुसार खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणावर काढत आहेत. उन्हाळी पिके ही सातत्याने काढली जात आहेत. मानव आणि जनावरे जगण्यासाठी शेतकऱ्यांचा ‘पोशिंदेपणा’ अतुलनीय आहे. पण शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाची योग्य किंमत होताना दिसत नाही. निसर्ग-व्यापारी आणि सरकारही शेतकऱ्यांना चार पैसे देण्याच्या बाबतीत हुलकावणी देतात. हातात आलेला घास तोंडात येईपर्यंत शेतकऱ्यांना धाकधूक असते.

बदललेले हवामान आणि रोगराई यामुळे तर शेती फारच बेभरवशाची झालेली आहे. शेतीवरील सगळ्याच गोष्टींचा खर्च अतोनात आहे. खते-बी-बियाणे आणि औषधे यावर शेतकऱ्यांचा खिसा प्रचंड प्रमाणात रिकामा होतो. त्यांची ओंजळ कधी भरणार? शेती सोडून प्रत्येक जण आपापल्या वस्तूची किंमत ठरवतो. कोणताही दुकानदार स्वतःच्या मर्जीनुसार आपल्या मालाची विक्री करतो. शेतकरी ग्राहकांच्या मर्जीने आपल्या मालाची विक्री करतो. हे सर्वांत वाईट आहे. घामाच्या बदल्यात दाम नसतील तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा रोखल्या जातील?

शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाच्या बाबतीत आता अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे. खेड्यातील शेतकऱ्यांच्या मुलींनाही सरकारी नोकरदार नवरदेव पाहिजेत. त्यामुळे मुलांचे लग्नाचे वय पुढे सरकत आहेत. त्याचा परिणाम एकूणच शेतकऱ्यांच्या जीवनावर होतो. आता तरी शेतकऱ्यांच्या संदर्भात सर्व पायाभूत सोयीसुविधा पुरवून सरकारने कृतार्थता जपावी, एवढीच शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी कन्येची अपेक्षा आहे.

(लेखिका प्राथमिक पदवीधर शिक्षिका आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com