Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Project : नाशिक जिल्ह्यातील वाघाड प्रकल्प म्हणजे समन्यायी पाणी वितरण व व्यवस्थापनाचे देशातील आदर्श मॉडेल आहे. प्रकल्पांतर्गत ३० गावे व १९ हजार शेतकरी असून, सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. त्यातून शेतकरी जलसाक्षर, प्रगतिशील झाले. फलोत्पादन, फुलशेती व उद्योग क्षेत्रात क्रांती घडली.
Waghad Project
Waghad Project Agrowon

मुकुंद पिंगळे

A Model of Equitable Water Distribution and Management : नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यात वाघाड येथे मध्यम प्रकल्पाचे धरण आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात ७५० ते १०००, तर पूर्व भागात ४०० ते ७०० मिमी पर्जन्यमान आहे. सन १९९० च्या सुमारास भागात सिंचन व्यवस्था पुरेशी विकसित नव्हती. उत्पन्न मर्यादित असल्याने येथील ग्रामस्थ रोजंदारीच्या कामाला जायचे.

समाज परिवर्तन केंद्राचे (ओझर, जि. नाशिक) पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते कै. बापू उपाध्ये व कै. भरत कावळे यांनी भागातील सिंचन कार्यक्षमता वाढविण्यासाठी व जलसाक्षरता रुजविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. घनमापन पद्धतीने पाणी मोजून त्याचे समान वाटप व उपलब्ध पाण्याचा नियंत्रित वापर हे सूत्र त्यांनी शेतकऱ्यांच्या मनात रुजविली. केंद्राने व जलसंपदा विभागाने एकसंधपणे कार्य केले.

वाघाड प्रकल्पाचा प्रवास

वाघाड प्रकल्पांतर्गत १९९० च्या सुमारास केवळ तीन पाणीवापर संस्था होत्या. आज त्यांची संख्या २४ पर्यंत आहे. या सर्व संस्थांची शिखर संस्था म्हणजे वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था. सन २००५ मध्ये शासनाने संपूर्ण प्रकल्पाचे सिंचन व्यवस्थापन या शिखर संस्थेकडे हस्तांतरित केले. आता २४ पाणी वापर संस्थांव्यतिरिक्त २२ ते २४ उचल पाणी वापर संस्थाही या शिखर संस्थेअंतर्गत कार्यरत आहेत.

यात वाघाड उजवा व डावा कालवा कक्षेत कामे झाली. पूर्वी जे शेतकरी कालव्याच्या विरुद्ध बाजूने पाणी अनधिकृत उचलत होते त्यांनाही सामावून घेऊन अधिकृत नियमाप्रमाणे पाणी देण्यात येऊ लागले. त्यामुळे पाण्यावरून उद्‍भवणारे वाद, पाणीचोरीला आळा बसला. सर्व पाणी ‘रेकॉर्ड’वर आले. ३० ते ४० टक्के पाणीबचत साध्य झाली. राज्य सरकारने पाणीवापर संस्थेच्या माध्यमातून पाणीवाटप धोरणासंबंधी कायदा केला. फेब्रुवारी २००६ मध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली.

Waghad Project
Vishnupuri Water Project : विष्णुपुरी प्रकल्प पुन्हा भरला शंभर टक्के

‘वाघाड’- ‘मॉडेल’ शिखर संस्थेची कार्यपद्धती

वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेस हस्तांतरित केलेला देशातील हा पहिलाच सिंचन व्यवस्थापन प्रकल्प. समन्यायी पाणी वितरण व व्यवस्थापनाचे देशातील आदर्श मॉडेल.

प्रवाही पद्धतीने ६७५० हेक्टर आणि उपसा पद्धतीने ६७५ हेक्टर असे एकूण ७,४२५ हेक्टर संपूर्ण लाभक्षेत्र. त्याअंतर्गत ३० गावे व १९ हजार शेतकरी.

एकेकाळी सिंचनाखाली क्षेत्र होते २५ हेक्टर. आजमितीला सिंचन व्यवस्थापन कार्यक्षम क्षेत्र १० हजार हेक्टरपर्यंत.

प्रत्येक हंगामापूर्वी संस्थेचे सभासद, शासकीय प्रतिनिधी यांची आढावा बैठक, धोरण, वसुली आदींबाबत चर्चा.

प्रत्येक वर्षी धरणातील पाणी उपलब्धता पाहून सिंचन आवर्तनाचा कालावधी निश्‍चित.

पाणी वापर संस्थांची मागणी पाहून घनमापन पद्धतीने पुरवठा.

आवर्तन सुटल्यानंतर ‘टेल’ भागाकडून ‘हेड’ भागापर्यंत न्याय्य पाणीवाटप.

प्रकल्प आठमाही असताना नियोजनातून फक्त रब्बीसाठी वर्षभरात एक हजार दलघफू पाण्यात कमाल तीन, किमान २ व उन्हाळी २ आवर्तने अशी एकूण सुमारे पाच आवर्तने.

तासावर सिंचन व पाणीपट्टी.

हंगामात पाण्याचा हिशेब करून आकारणी व वसुली प्रक्रिया. भरणा वेळेत केल्याने संस्थेला वेळेत पाणी उपलब्ध. उन्हाळी हंगामात संस्थांकडून बांधावरच आगाऊ वसुली. वसुली प्रक्रिया १०० टक्के.

शासन व संस्थाकडून पाण्याचे संयुक्त मोजमाप.

व्यवस्थापन, वितरण, सिंचन विषयक पायाभूत सुविधांचे परीक्षण करण्याची संस्थांकडे जबाबदारी.

लाभक्षेत्रातील पीकपद्धती

पूर्वी खरीप, रब्बी आदी हंगामी पारंपरिक पिके होती. आता खालील व्यावसायिक पिके शेतकरी घेत आहेत.

फळबागा- द्राक्षे, पेरू, डाळिंब,चिकू,लिंबू, आंबा.

भाजीपाला- टोमॅटो, वांगी, मिरची, कोबी, फ्लॉवर, वेलवर्गीय व पालेभाज्या.

अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ आदी संकटांवर मात करण्यासाठी संरक्षित शेती.

सुमारे ४८५ पॉलिहाउसेस व ४७० पर्यंत शेडनेट्‍स. यात शेवंती, जरबेरा, कार्नेशन, गुलाब, ऑर्किड, विविध फिलर्स. तसेच काकडी, ढोबळी मिरची.

एकरी उत्पादन (टन) (प्रातिनिधिक)

द्राक्षे- १० ते १२

टोमॅटो-१८ ते २० टन

ढोबळी मिरची- २० टन

काकडी- २० ते २५ टन

Waghad Project
Water Project : जुई मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता वाढणार

वाघाड प्रकल्पाचे झालेले फायदे

लाभक्षेत्रातील शेवटच्या भागातील गावांना पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर जायचे. आता टॅंकरमुक्ती झाली.

उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर. त्यासाठी शेततळी, नाला बांध निर्मिती, स्वयंचलित ठिबक सिंचन

जलसाक्षर व प्रगतिशील अशी शेतकऱ्यांची ओळख झाली. त्यांच्यात आर्थिक व सामाजिक जी समृद्धी आली. शिवारात टुमदार बंगले, चारचाकी, मुलांचे दर्जेदार शिक्षण, निर्यातक्षम शीतगृहे, पॅक हाउसेस आदी सुविधा झाल्या.

कृषी पूरक व प्रक्रिया उद्योगांची उभारणी. त्यातून राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या परिसरात आल्या.

वाघाड कार्यक्षेत्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अजिबात नाही ही विशेष बाब.

स्थलांतर थांबून स्थानिकांसह परराज्यांतील मजुरांनाही रोजगार.

‘सह्याद्री’सारखी देशभर ओळख निर्माण केलेली शेतकरी उत्पादक कंपनी याच कार्यक्षेत्रात.

खासगी बाजार समित्याही कार्यरत.

हवामान सुसंगत बदल

हवामान बदल, उत्पादन खर्च, जागतिक बाजारपेठेतील मागणी आदी गोष्टी अभ्यासून ‘सह्याद्री’ कंपनीने ‘आरा’ सारख्या ‘पेटंटेड’ द्राक्ष वाणांचे प्रयोग भागात रुजविले आहेत. क्रिमसन रेड, फॅंटसी, रेडग्लोब अशी वाणांची विविधता दिसते आहे. गारपीट, अवकाळी पावसापासून संरक्षणासाठी द्राक्ष बागेवर प्लॅस्टिक आच्छादनाचे प्रयोगही भागात झाले आहेत. हवामान बदलाला सुसंगत प्रतिकूल हवामानास प्रतिकारक्षम व बाजारपेठांच्या मागणीनुसार निर्यातक्षम वाणांची अजून उपलब्धता झाल्यास द्राक्षशेतीचे चित्र अजून बदलेल अशी आशा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागीय मानद सचिव बाळासाहेब गडाख यांनी व्यक्त केली आहे.

हवामान केंद्रांचा वापर

हवामानाचे पाऊस, हवामान, आर्द्रता, तापमान आदी विविध घटक जाणून घेण्यासाठी व हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बागांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली आहेत. सेन्सर्स आधारित या तंत्रज्ञानातून पाणी, माती, मुळांजवळचा ओलावा व एकूण पीक व्यवस्थापन आदी बाबी काटेकोर करता आल्या. रोग- किडीची पूर्वसूचना मिळून फवारणीचे नियोजन करता आले. दोनशेहून अधिक शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर करून हवामानसाक्षर झाले.

हवामान बदलांच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी विविध अंगाने बदल घडवीत आहेत. कमी पर्जन्यमान हे संकट आहे. त्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी बंदिस्त जलवाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करणे, ‘डिजिटल मीटर’ आधारे वितरण करून आकारणी करणे हे आगामी काळातील आमचे उद्दिष्ट आहे. केंद्र व राज्य सरकारच्या पाठबळाची अपेक्षा आहे.

शहाजीराव सोमवंशी ९८९०६३१८९०

संस्थापक, संचालक, वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था, मोहाडी, जि. नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com